क्लाडनी एर्न्स्ट फ्लोरेन्स फ्रीड्रिख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लाडनी, एर्न्स्ट फ्लोरेन्स फ्रीड्रिख (३० नोव्हेंबर १७५६–३ एप्रिल १८२७) जर्मन भौतिकीविज्ञ. ध्वनिशास्त्रात महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म विटनबर्ग येथे झाला. लाइपसिक विद्यापीठातून १७८२ मध्ये कायदेशास्त्राची पदवी त्यांनी मिळविली. परंतु संगीताच्या आवडीमुळे पुढे ते ध्वनिशास्त्राकडे वळले.

पदार्थातील ध्वनीच्या कंपनांचा मार्ग ठराविक गणितीय सूत्रानुसार असतो, असे त्यांनी सिद्ध केले. त्याकरिता त्यांनी एक नवीन दृश्य पद्धत शोधून काढली. कंप पावणाऱ्या तबकड्यांवर बारीक वाळू पसरली असता त्या वाळूच्या विशिष्ट आकृत्या (क्लाडनी आकृत्या) बनतात व त्यांवरून कंपनांचा मार्ग ठरविता येतो, असे त्यांना आढळून आले. तारा, सळया, तबकड्या यांसारख्या घन पदार्थांच्या कंपनांचा व लंबकाच्या पिळाकार कंपनांचाही त्यांनी अभ्यास केला. हवेव्यतिरिक्त इतर वायूंतील ध्वनीच्या वेगाचे मापन त्यांनी ऑर्गन पाइपच्या (ऑर्गनमधील ध्वनी निर्माण करणाऱ्या नलिकेच्या) साहाय्याने केले. यांशिवाय त्यांनी युफोनियम व क्लॅव्हीसिलिंडर ही नवीन वाद्ये तयार केली. त्यांनी आपल्या ध्वनिविषयक प्रयोगांबद्दल व वाद्यांविषयी दोन ग्रंथ लिहिले होते. उल्का या पृथ्वीबाहेरील उद्‌गमांपासून येतात असा विचार त्यांनी मांडला होता. ते ब्रेस्लौ येथे मृत्यू पावले.