Jump to content

कॉम्रेड शरद पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कॉम्रेड शरद तानाजी पाटील (जन्म : १७ सप्टेंबर १९२५, - १२ एप्रिल २०१४)

प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारिक मांडणी करणारे, जातीव्यवस्थेविरोधात प्रखर लढा देणारे ज्येष्ठ विचारवंत.

धुळे तालुक्यातील कापडणे हे पाटील यांचे मूळ गाव. मेंदूतील रक्तस्त्रावाने त्यांचे धुळे येथे निधन झाले.

"मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद विश्लेषण पद्धती", त्यातूनच विकसित झालेली "सौत्रान्तिक मार्क्सवादी पद्धती" आणि "वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद", असे तीन मुख्य सिद्धांत हे त्यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप सांगता येईल.

भारतीय समाजाचे विश्लेषण करणे व उपाय सुचविणे यासाठी केवळ मार्क्सवाद अथवा फुलेवाद किंवा आंबेडकरवाद पुरेसा नाही. भारतीय समाजवास्तव इतके भीषण आहे की या तिन्हींचा मेळ घालून काहीएक नवी विश्लेषण पद्धती रचली तरच भारतीय वास्तवाचे अस्सल भान येऊ शकेल, हे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे "दार्शनिक सत्य आणि भौतिक मुक्ती कधी चिरस्थायी, त्रिकालाबाधित नसते. कालचे सत्य आजचे असत्य बनून (त्या) अस्थिर सत्याला अधिक दुर्बोध करते. कालची मुक्ती आजची गुलामगिरी बनून (त्या) अस्थिर मुक्तीला आणखी अस्थिर करते" असे त्यांचे प्रतिपादन होते.[]

कॉम्रेड शरद पाटील हे मुळात कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) या पक्षाचे धुळे जिल्ह्याचे संघटक होते. ब्राह्मणेतर चळवळीशी संबद्ध असलेल्या घराण्याची पार्श्वभूमी लाभलेल्या शरद पाटलांना त्या चळवळीची व्याप्ती जातीय समतेपुरतीच सीमित असल्याचे वाटल्याने पाटील समतेसाठी व्यापक वर्गलढा उभारणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाकडे आकृष्ट झाले. पण तेथे वर्गविषमतेवर अधिक भर दिला जाऊन जातीय विषमतेकडे दुर्लक्ष होते, असा अनुभव आल्यावर ते साम्यवादी चळवळीत जाति‍अंताची भाषा बोलू लागले. दरम्यान, त्यांना स्त्री-पुरुष, म्हणजेच लिंगविषमतेच्या समस्येचीही जाणीव होऊन त्यांनी वर्ग आणि जाती यांच्या अंताबरोबरच स्त्रीदास्यंताची चळवळही व्हायला हवी असा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना मार्क्‍सवाद्यांनी केलेल्या आदिम समाजाच्या विश्लेषणाला आव्हान द्यावे लागले. पण मार्क्‍सवादी विज्ञानाच्या चौकटीत जातीच्या आणि लिंगविषमतेच्या भाषेला थारा नाही, हे लक्षात आल्याने पाटील मार्क्‍सवाद्यांवर वर्गांधळेपणाचा आरोप करीत, त्यासाठी त्यांनी मार्क्सवादाचा तत्त्वज्ञानात्मक विकास करून बहुप्रवाही, विधायक, अब्राम्हणी ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण (विश्लेषण) सिद्ध केले. कारण मार्क्सवादाची मर्यादा, केवळ वर्गकलहच क्रांतिकारक मार्गाने सोडवला पाहिजे, जातिभेद - स्त्रीदास्य हे संघर्ष क्रांतिकारक मार्गाने सोडविण्याची आवश्यकता नाही - याला आव्हान देत भारतीय परिप्रेक्षात जातिव्यवस्था ही विषम उत्पादन संस्था असल्याचे त्यांनी पुढे आणले. यातून एकप्रवाही मार्क्सवादी अन्वेषण बहुप्रवाही बनले. क्रांतिकारी संघर्षात स्त्रीदास्यान्ताला प्राधान्य देऊन ते अन्वेषण अब्राम्हणी बनविले. नवसमाजनिर्मितीसाठी ते इतिहासातील प्रस्थापित संकल्पनांचे ऐतिहासिक योगदान मांडत त्यांच्या कालबाह्यतेला नकार उभा करत आले, त्यातून ते विधायक बनले. बहुप्रवाही, अब्राम्हणी, विधायक ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण हा त्यांनी मार्क्सवादाच्या व्यवहारी तत्त्वज्ञानाचा भारतीय परिप्रेक्षात केलेला विकास होय.(म्हणजे काय??)

जातीच्या प्रश्नावर क्रांतिकारक लढा उभा करण्यास मार्क्सवाद्यांचा सातत्याने नकार मिळत राहिला. त्याची परिणती कम्युनिस्ट पक्ष सोडण्यात झाली. त्यानंतर शरद पाटलांनी इ.स. १९७८साली, जातवर्गस्त्रीदास्यान्तक, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष या नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाची धोरणे कार्ल मार्क्स, जोतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसणीवर आधारित आहेत.

अशी विचारसरणी असलेल्या शरद पाटील, यांनी स्वैराचारी म्हणून बदनाम ठरलेल्या शाक्त तंत्राकडे अब्राम्हणी, विधायक इतिहासलेखनशास्त्राच्या दृष्टीने पाहून, शाक्त तंत्र हे जाती आणि स्त्रीदास्य यांचा अंत घडवून आणणारा विज्ञानपूर्व मार्ग होता, हे पुढे आणले. ब्राम्हणी शाक्त प्रवाहाच्या उपासनेत मद्यमांसमैथुनादी पंच मकारांवर भर दिला जातो. अब्राम्हणी शाक्त प्रवाहाच्या परंपरेत पंचमकार हा मुक्तीचा मार्ग या अर्थाने स्वीकारला गेला होता, हे ऐतिहासिक सत्य पुढे आणले. त्यामुळे, शरद पाटलांना हे एक जातिमुक्त समाजासाठीच क्रांतिकारक पाऊल वाटले.

जातिभेद आणि लिंगभेद यामुळे निर्माण झालेल्या दास्याचा अंत घडवून आणण्याची कॉ. पाटलांची प्रेरणा अस्सल होती व तळमळही पराकोटीची होती, यात शंका नाही. त्यासाठी त्यांनी शाक्त तंत्राच्या अब्राम्हणी प्रवाहाचे जात्यंतक रूप पुढे आणले. दास-शूद्रांची गुलामगिरी या द्विखंडी अभिजात ग्रंथाद्वारे त्यांनी इतिहासपूर्व काळातील दास-शूद्रांच्या गुलामगिरीचा मूलभूत प्रश्न सर्व इतिहासकारांच्या विरोधात जाऊन पुढे आणला. प्राथमिक साम्यवादाच्या कम्युनिस्टांच्या गंधर्वनगरीला अनैतिहासिक ठरविले. मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक समाजांचा इतिहास सर्वप्रथम साधार मांडला.

कॉ. शरद पाटील यांचे वेगळे संशोधन

[संपादन]
  • इ.स. १६७४ साली गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केल्यानंतर काही दिवसांनंतर महाराजांनी निश्चलपुरी या पंडिताकडून तांत्रिक पद्धतीने अभिषेक करवून घेतला. त्या अभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी एका अस्पृश्य जातीच्या स्त्रीशी विवाह केला. ब्राह्मण इतिहासकारांनी ही गोष्ट लपवून इतिहास लिहिला.
  • शैव-संस्कार-सम्पन्ने जातिभेदं न कारयेत्

(शैवसंस्काराने दीक्षित झालेल्यांनी जातिभेद पाळू नये) - भृगुसंहिता व वातुलतंत्र.
स्त्रीप्राधान्यातच जातिलिंगभेदविरहितता असते, या तंत्राच्या पायाभूत धारणेची जननी स्त्रीसत्ताक समाजाची 'स्मृती'च होती, कारण पुरुषसत्तेतच वर्णजातलिंगभेद असल्याचे तंत्र पाहत होता. शिवाजी महाराजांचा दुसरा राजाभिषेक आणि त्यातील अस्पृश्य स्त्रीशी विवाह, ही कृती शिवचरित्र उजळवून टाकते, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उच्चतर समतावादी आयाम प्रदान करते. (काॅ. शरद पाटील)

  • शिवाजी महाराजांची ही तथाकथित अस्पृश्य पत्‍नी संस्कृत पंडित होती. त्या स्त्रीला संस्कृत पंडित बनवण्याची कामगिरी संत तुकाराम महाराजांच्या ब्राह्मणशिष्या बहिणाबाई सिऊरकर यांची होती.
  • तुकाराम आणि बहिणाबाई हे दोघे शाक्तपंथीय होते.
  • तुकोबांचे (आणि बहिणाबाईंचेही) शाक्तांच्या अनाचारावर टीका करणारे जे अभंग उपलब्ध आहेत, ते त्यांच्या नावावर काही ब्राह्मणांनी लिहिलेले आहेत.
  • बहिणाबाई ज्या शाक्तांवर टीका करतात ते ब्राह्मणी शाक्त होते. त्यांनी अनाचार करून अब्राह्मणी शाक्तांची बदनामी केली.
    • संत तुकारामांच्या गाथा क्रमांक १, ३४३२, ३४३६ स्पष्ट करतात,

गुरूमार्गामुळे भ्रष्ट झाले सर्वकाळ (सकळ)
म्हणते यातीकुळे नाही |१|
नसता करूनी होम खाती एके ठायी
म्हणती पाप नाही मोक्ष येणे |३४३२|
चारी वर्ण, अठरा याती
भोजन करिती एके पंक्ती |३४३६|
संत तुकाराम शाक्त होते.
(काॅ. शरद पाटील)

निष्कर्ष

[संपादन]

कॉ. शरद पाटील यांनी आयुष्यभर भारताच्या अपूर्ण - जातवर्गस्त्रीदास्यान्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीच्या - आपूर्तीचे विचार उराशी बाळगले. त्यातून अनेक जनसंघटनांना वैचारिक आधार, भूमिका मिळाली. जातीय अस्मितेभोवती फिरणारी पुरोगामी संघटनांची भूमिका क्रांतिकारी जात्यंतक बनविण्यामध्ये त्यांनी दिलेल्या तत्त्वज्ञानात्मक अधिष्ठानाचा मोठा वाटा आहे.

सौत्रांतिक मार्क्सवाद हे नवप्रमाणशास्त्राच्या आधारे बनविलेले काॅ. शरद पाटील यांचे तत्त्वज्ञान आवर्तात सापडलेल्या, दिशाहीन झालेल्या सामाजिक चळवळींना क्रांतिशास्त्र आणि क्रांतिशस्त्र बहाल करण्यात यशस्वी झाले आहे असे त्यांच्या या क्रांतिकारक भूमिकेवर उभ्या राहिलेल्या जनसंघटनांकडे, संशोधन संस्थांकडे पाहून म्हणावे लागेल. सत्यशोधक जात्यंतक कष्टकरी सभा, नैर्ऋत्य समाज विज्ञान अकादमी (पुणे), मानव मुक्ती मिशन (औरंगाबाद-महाराष्ट्र), राष्ट्रमुक्ती आंदोलन, छंदांसि कला आणि साहित्ये महासभा, काॅ. शरद पाटील इतिहास परिषद, काॅ. शरद पाटील संशोधन संस्था (मुंबई).

काॅम्रेड शरद पाटील यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक (भाग १), दोन इंग्रजी व एक मराठी खंड
  • रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग ३(इंग्रजी व मराठी)
  • जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १
  • शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण?
  • जात्यंतक भांडवलदारी, लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, तीन खंड
  • याच पुस्तकाच्या ४थ्या खंडात 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता', 'स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद' हे विषय आले आहेत.
  • अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र
  • मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद
  • भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुद्ध
  • भारतीय इतिहासातील लोकशाही
  • स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत
  • पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका
  • स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा
  • शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा?
  • नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे
  • बुद्ध
  • भिक्खू आनंद
  • धम्म-आनंद-वधू विशाखा , वगैरे
  1. ^ हेमाडे, श्रीनिवास. "विरचनावादी भारतीय दार्शनिक". लोकसत्ता.