Jump to content

सदस्य:Su patel

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेतीचे प्रकार : शेतकर्‍याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरुन शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात.शेती हा खुप महत्वाचा भाग आहे भारतामधील.

नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकावर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तृहेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.