Jump to content

सदस्य:Manoj Killedar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिक्षण प्रणालीत तंत्रज्ञानाचा वापर कशाकरीता ?[संपादन]

जागतिकीकरण[संपादन]

आजचे युग हे जागतिकीकरणाचे आहे. जागतिकीकरण ही ठळकपणे पुढे येणारी अपरिहार्य वस्तुस्थिती झाली आहे. कुठल्याही देशाची इच्छा काहीही असो, त्यांना जागतिकीकरणात सामील व्हावेच लागते आहे. जागतिकीकरणाचे दोन ठळक परिणाम आहेत. त्यामुळे जगातील सर्व देशांना एकमेकांशी सहकार्य करावे लागते आहे. परंतु त्याचसोबत ते जगाचे दोन भागात विभाजन करते आहे. जागतिकीकरणामुळे जगातील देशांमध्ये आणि प्रत्येक देशात सुद्धा, आर्थिक दरी रुंदावतेय. मानवाच्या प्रगतीमागे जागतिकीकरण हे महत्वाचे कारण आहेच. पण त्यामुळे संपूर्ण मानव समुहात एक दरी सुद्धा निर्माण झालेली आहे. जसे, अजूनही फक्त काहीच लोकांना संगणक व महाजाल (Internet or Web) उपलब्ध आहेत आणि वापरता येतात. बहुतेक लोकांना अजूनही संगणक व महाजाल उपलब्ध नाहीत किंवा वापरता येत नाहीत. ह्यालाच “Digital Divide” असे म्हणतात.

आधुनिक काळात तंत्रज्ञानात झालेली प्रचंड प्रगती हे जागतिकीकरणाचे प्रमुख कारण आहे. ह्या प्रगतीमुळे आपले संपूर्ण सामाजिक जीवन सुद्धा ढवळून निघत आहे. तंत्रज्ञानातील प्रगती “Digital Divide” च्या दोन्ही बाजूला प्रचंड बदल घडवत आहे. जुन्या रोजगार संधी नामशेष होत आहेत. परंतु, त्याचसोबत आजपर्यंत अस्तित्वात नसलेल्या, नवीन रोजगार संधी निर्माण होत आहेत. समाज जीवनावर होणारा हा परिणाम, कधी कधी भयावह वाटावा, एवढा मोठा आहे.

आज तंत्रज्ञान जीवनातील प्रत्येक अंग व्यापत आहे. तरीदेखील, तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रणालीत फार मोठा शिरकाव अगदी आता आता पर्यंत तरी झालेला नव्हता. मुद्रण तंत्रज्ञानानंतर, जवळ जवळ गेल्या ५०० वर्षांपासून, आपल्या शिक्षणप्रणालीने कुठल्याही महत्वाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर फारसा आत्मसात केलेला नाही. परंतु संगणक महाजालाच्या (Internet or Web) निर्मिती नंतर मात्र, आता शिक्षण प्रणालीत देखील आमुलाग्र बदल होण्यास सुरवात झालेली आहे. ह्या लेखमालेत आपण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणालीची (ELearning) ओळख करून घेणार आहोत.

तंत्रज्ञानच का ?[संपादन]

बहुतेक देशांच्या (किंवा राज्याच्या) शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या शिक्षणप्रणालीकडून असलेल्या अपेक्षा सर्वसामान्यपणे खालीलप्रमाणे असतात.

  1. उपलब्धता (Access): जास्त असायला हवी
  2. गुणवत्ता (Quality): उच्च असायला हवी
  3. किंमत (Cost): कमी असायला हवी

वरील प्रत्येक उद्दिष्टाचा आता थोडा सखोल विचार करुयात.

  1. उपलब्धता (Access): आज बहुसंख्य लोकांपर्यंत शिक्षण पोचतच नाही. त्यातही बहुसंख्य लोकांपर्यंत पुरेसं शिक्षण पोचत नाही. आजपण जगातील अंदाजे १० कोटी मुले कधीही शाळेत जात नाहीत. त्याहीपेक्षा जास्त मुलांना उपयुक्त ज्ञान व क्षमता देऊ शकेल एवढे शिक्षण आपण देऊ शकत नाही. जगातील अंदाजे ८० कोटी प्रौढ आजही निरक्षर आहेत. जगातील सर्व लोकांना आज शिक्षणाची नितांत गरज आहे. फक्त हे शिक्षण बहुसंख्य लोकांना कसे द्यायचे हाच खरा आपल्या शिक्षण प्रणाली समोरचा मोठा प्रश्न आहे.
  1. गुणवत्ता (Quality): सर्व विद्यार्थी आणि समाज, यांच्या आपल्या शिक्षणप्रणालीकडून, अध्याहृत किंवा नमूद केलेल्या, सर्व इच्छा, गरजांची व आकांक्षाची, कमीत कमी खर्चात होणारी पूर्तता म्हणजेच गुणवत्ता. शिक्षणाची गुणवत्ता हा आपल्या शिक्षणप्रणालीसमोरचा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या आणि विकसनशील देशातील शिक्षण प्रणालीवर होणारा खर्च लक्षात घेता गुणवत्ता हा प्रमुख मुद्दा ठरतो. येथे बहुतेक गरीब घरातील मुले, काहीना काही काम करून मिळणारे उत्पन्न देऊन, घरखर्चामध्ये आपला वाटा उचलत असतात. साहजिकच, शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला तर त्यांच्या कुटुंबाला ह्या उत्पन्नाला मुकावे लागते. केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण असल्यास, चांगले उत्पन्न देऊ शकेल असे “ज्ञान व क्षमता” शिक्षणाकडून भविष्यात मिळेल ह्या अपेक्षेने, हा तोटा आज सहन करण्यास मुलांची कुटुंबे तयार होऊ शकतात. उच्च शिक्षणातील सुमार गुणवत्तेवर नेहमीच चर्चा होताना दिसते. शिक्षण प्रणालीची सुमार गुणवत्ता हा एक काळजीचा विषय झालेलाच आहे.
  1. किंमत (Cost): तिसरा मुद्दा म्हणजे किंमत. जास्त किंमतीमुळे सगळ्यांना शिक्षण परवडत नाही. ह्यामुळे ठराविक उच्च आर्थिक वर्गातील विद्यार्थीच शिक्षण घेऊ शकतील आणि जर गुणवत्ता म्हणजे कमीत कमी खर्चात इच्छा, गरजांची व आकांक्षाची होणारी पूर्तता असेल, तर जास्त किंमतीमुळे “उपलब्धता (Access)” आणि “गुणवत्ता (Quality)” दोन्ही कमी होतील.

शिक्षणाचा त्रिकोण[संपादन]

वरील तीन उद्दिष्टे त्रिकोणाच्या तीन बाजू म्हणून खालीलप्रमाणे दर्शवता येतात. कमीतकमी किमतीत उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता एकाच वेळेस देणे म्हणजेच शिक्षणप्रणालीचे चांगले प्रशासन होय.

शिक्षणाचा त्रिकोण

पण थोडासा विचार केल्यास अस्वस्थ करणारी एक वस्तुस्थिती लक्षात येईल. माहीत असलेल्या कुठल्याही मार्गाचा अवलंब करून, सध्याची पारंपारिक शिक्षणप्रणाली वरील अपेक्षित बदल घडवू शकत नाही.

  • जर आपण प्रत्येक वर्गात जास्त विद्यार्थी बसविले तर शिक्षणाची उपलब्धता वाढेल, फी कमी करता येईल, पण त्याचसोबत कमी गुणवत्तेचा देखील आपल्यावर आरोप होईल.
  • प्रत्येक वर्गात कमी विद्यार्थी संख्या असेल तरच शिक्षकाची परिणामकारकता सध्याच्या पारंपारिक शिक्षणप्रणालीत वाढते. उच्च गुणवत्तेसाठी ही परिणामकारकता वाढविली तर प्रत्येक वर्गातील कमी विद्यार्थी संखेमुळे उपलब्धता कमी होईल आणि त्यामुळे फी वाढवावी लागेल.

पारंपारिक शिक्षणप्रणालीत उच्च गुणवत्तेसाठी उपलब्धता कमीच करावी लागते आणि त्यासोबत फी सुद्धा वाढवावीच लागते. खरोखरच, पारंपारिक शिक्षणप्रणालीसमोरचा हा एक गहन व क्लिष्ट प्रश्न आहे. एका अर्थाने, हा प्रश्न म्हणजे आपल्या शिक्षण प्रशासनासमोरचे प्रमुख आव्हानच आहे.

जगातील संशोधनाचे निष्कर्ष हे दर्शवितात की फक्त तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीतच, कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता, एकाच वेळेस देणे शक्य आहे. तंत्रज्ञानाचा वापर ह्याकरिता कसा करायचा हे मात्र आपण ह्या लेखमालेतील पुढील लेखात बघणार आहोत.

ह्या लेखमालेची आगळी वेगळी वैशिष्टे[संपादन]

ह्या लेखमालेतील प्रत्येक लेखाचे “Online Version” खालील प्रत्येक संकेतस्थळांवर प्रत्येक व्यक्ती करिता नि:शुल्क उपलब्ध असेल:

  1. www.swselearn.com
  2. www.virtualuniversity.in
  3. www.killedar.org

वरील प्रत्येक संकेतस्थळ प्रत्येक शिक्षका करिता पूर्णपणे नि:शुल्क सेवा देते. ह्या “Online Version” खालील सुविधा पुरवतील:

  • ह्या लेखाचे पूर्ण शैक्षणिक दृकश्राव्य अनुभव देणारे “SCORM Module” मधील रुपांतर
  • ह्या लेखासंदर्भात, मी आणि जगातील तुमचे इतर मित्र, यांच्यासोबत विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी आणि आपल्या परखड विचारांसाठी “Discussion Forum” आणि थेट तात्काळ चर्चा करण्यासाठी “Chat Room”
  • आणि इतर खूप काही

एकदा तरी मित्रांसह आवर्जून अनुभव घेण्याची आग्रहाची विनंती.