Jump to content

राजवाडे संशोधन मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे या पानावरून पुनर्निर्देशित)

इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ ही धुळे शहरातील एक संस्था आहे.

इतिहास

[संपादन]

भारत इतिहास संशोधन मंडळातील पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यानंतर इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी पुणे सोडून धुळे गाठले. तेथील आपल्या सव्वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी इतिहास संशोधनाचे काम केले. या कार्यकाळात त्यांनी इतिहास आणि संपूर्ण साहित्य विश्वाला दिशा देणाऱ्या ग्रंथांची निर्मिती केली.

३१ डिसेंबर १९२६ रोजी इतिहासाचार्य राजवाडे यांचे निधन झाले. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेले काम अखंडितपणे सुरू राहावे म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलावलेल्या सभेतच म्हणजे ९ जानेवारी, इ.स. १९२७ रोजी, त्यांच्या अनुयायांनी इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली आणि राजवाडे यांनी जमविलेले ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथसंपदा जतन करून ते संशोधन व संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले.

राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालय

[संपादन]

९ जानेवारी १९२७ रोजी या ग्रंथालयाची स्थापना झाली. संशोधकांसोबत अभ्यासकांना या ग्रंथालयाचा उपयोग व्हावा हाच यामागे हेतू होता. सुरुवातीला अगदी दोन-अडीच हजार ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयातली ग्रंथसंख्या हळूहळू २५ हजारांवर गेली. ७५० पेक्षा अधिक सभासद नियमित ग्रंथालयाचा लाभ घेतात.

दुर्मीळ ग्रंथ

[संपादन]

ग्रंथालय पुरातन असल्याने त्यात दुर्मिळ अमूल्य असे ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. संशोधनाच्या निमित्ताने येणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना या ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचा अभ्यास करायला मिळतो.

या दुर्मीळ ग्रंथांसोबतच येथे धार्मिक, ज्योतिष, पर्यावरण, संदर्भ, शिक्षण अशा नानाविध ग्रंथांचे संग्रह केले आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेतील ग्रंथही उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाकडून मिळालेल्या अनेक ग्रंथांचा समावेश आहे. दानशूर व्यक्तींकडूम मिळालेल्या ग्रंथांमुळेही हे ग्रंथालय समृद्ध झाले आहे.

ग्रंथालयाच्या सामान्य सभासदांसाठी ललित पुस्तके, मासिके

[संपादन]

या ग्रंथालयाला मोठ्या संख्येने वाचक लाभले आहेत. बालवाचकांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा यांत मोठा सहभाग आहे. येथे कथासंग्रह, कादंब्ऱ्या, चरित्रे आदी ललित पुस्तकेही आहेत.

याशिवाय सामान्य, वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी ग्रंथालय दीडशे ते दोनशे दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करून देते. तसेच दररोज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ३५ वर्तमानपत्रे, ४४ मासिके, १६ पाक्षिके आणि १४ साप्ताहिके मागविले जातात. त्यामुळे एकाच ठिकाणी वाचकांना सर्व प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध होते. वाचकांसाठी वेळोवेळी स्पर्धा, नामवंत मार्गदर्शकांची व्याख्याने, चर्चासत्रे, ग्रंथालय कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

ऐतिहासिक, पुरातन इमारत

[संपादन]

या ग्रंथालयासाठी ब्रिटिशकाळातील पुरातन वास्तू मिळाली आहे. ही वास्तू पूर्णतः दगडी असून, पुरातन काळातील वास्तुशिल्पाचा एक सुंदर नमूना आहे. या वास्तूत लाकडाचा कुठेही वापर केलेला आढळत नाही. त्यामुळे ही इमारत अदाहय म्हणून ओळखली जाते. इमारत दुमजली असल्यामुळे विविध प्रकारच्या ग्रंथालयांच्या विभागांकरिता तिचा सहज वापर केला जातो.

बाह्य दुवे

[संपादन]