Jump to content

राजा रविवर्मा (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजा रविवर्मा - कादंबरी या पानावरून पुनर्निर्देशित)
राजा रविवर्मा

राजा रवि वर्म्याचे एक चित्र
लेखक रणजित देसाई
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठसंख्या ३७८
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-४५१-४

राजा रविवर्मा या अजरामर चित्रकाराच्या जीवनावरील श्रेष्ठ कादंबरी

पुस्तकाबद्दल

[संपादन]

आजवर भारतीय साहित्यात चित्रकाराच्या जीवनावर कोणीही काहीही लिहिलेले नाही. मानवी जीवनाला सांस्कृतिक, भावनिक समृद्धतेकडे घेऊन जाणाऱ्या विविध कलांचे महत्त्व महान कलाकारांनीच सिद्ध केलेले आहे. जीवनात येणाऱ्या सुख-दुःख, मान-अपमानाला सामोरे जातानाही या कलावंतांची दृष्टी आणि अभिव्यक्ती कलात्मकतेचे दर्शन घडवते.

भारतीय चित्रकलेला एक वेगळे वळण लावणाऱ्या थोर चित्रकाराच्या जीवनाचे कलात्मक व भावात्मक दर्शन ही कादंबरी घडवते. काव्यमय भाषाशैली आणि नाट्यपूर्ण अभिव्यक्ती ही देसाईंची लेखन वैशिष्ट्ये राजा रविवर्मा मध्ये रणजित देसाईंमधल्या कलावंताचे आणि माणसाचे उत्स्फूर्तपण मधून मधून कारंजासारखे उसळताना आढळते. माणसाला कलेची भूक का लागते? जीवन आणि कला यांचा संबंध कोणत्या प्रकाराचा असतो? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ वाचकाच्या मनात उठतं आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद वाचकाला मिळतो.

राजा रविवर्मा या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी लिहून लेखकाने १९८४ मध्ये प्रसिद्ध केली. सुमारे पाच वर्षांच्या अविश्रांत परिश्रमानंतर ही कलाकृती लेखकाने सादर केली.

एका कलावंताने आपला मौलिक वेळ खर्च करून दुसऱ्या कलावंताच्या भावमनाचा कलात्क दृष्टीकोनातून उत्कटपणे घेतलेला शोध म्हणजे ही कलाकृती होय.

एखाद्या क्षेत्रात अत्युच्च स्थान संपादन करणाऱ्या व्यक्तिचे जीवन रणजित देसाईंना मोहित करायचे आणि त्यायोगे एखादी सर्वांगसुंदर कलाकृती जन्माला यायची. माधवराव पेशवे, शिवाजी महाराज, महारथी कर्ण आणि राजा राविवर्मा ही सर्व याचीच उदाहरणे आहेत.

कथानक

[संपादन]

भारतीय चित्रकलेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या राजा रविवर्मा यांच्या बालपणापासून कथानकाला प्रारंभ होतो. लहानपणापासूनच मामांच्या प्रेरणेमुळे त्याच्या मनात निर्माण होत गेलेले चित्रकलेविषयीचे आकर्षण, नायकर, ब्रूक यांसारख्या शिक्षकांचे मार्गदर्शन, विवाह, पत्नी पुरूतार्थीला चित्रकलेचं वेड मान्य नसल्याने निर्माण झालेला दुरावा, कामिनी नावाच्या सुंदर तरुणीशी झालेली जवळीक, त्रिवेंद्रच्या राजघराण्यातील अंतर्गत कलह, दिवाण माधवरावांच्या सल्ल्याने रविवर्मांचे मुंबईत स्थायिक होणे इत्यादी तपशील येतो.

कादंबरीच्या दुसऱ्या भागात रविवर्म्याच्या प्रेमजीवनाचाही दुसरा आध्याय सुगंधाच्या रूपाने पहायला मिळतो. दोघांची भेट, भेटीचे प्रेमात झालेले रूपांतर, मुंबईत छापखाना सुरू करण्यासाठी गोवर्धनदास व दादाभाई नवरोजी, न्या. रानडे यांचे सहकार्य व मार्गदर्शन, चित्रं काढण्याची घोडदौड सुरू असतानाच देवदेतांचे पावित्र्य नष्ट केल्याच्या आरोपावरून दाखल झालेला खटला व शेवटी रविवर्म्याच्या बाजूने लागलेला निकाल, विविध ठिकाणांहून मिळालेली पारितोषिके व झालेला गौरव, सुगंधाची आत्महत्या. शेवटचे आजारपण आणि प्रेतयात्रा बैलगाडीतून जाते त्या प्रसंगाला अनुसरून ‘एक प्रवास चालला होता. एक प्रवास संपला होता.’ अशा समर्पक शब्दांत कादंबरीचा केला गेलेला शेवट रणजित देसाई यांनी कौशल्याने रंगविला आहे.

रविवर्मा आणि पुरूतार्थी यांच्यातील मानसिक अंतर वाढत जाते. तेव्हा सासरी राहण्यात काही स्वारस्य नाही हे लक्षात घेऊन रविवर्मा परत आपल्या गावी येण्याचा निर्णय घेतो. पण तिथून निघताना पत्नीला बजावतो. “माझा पिंड कलावंताचा आहे. ज्या दिवशी कलावंत पतीची तुला ओळख होईल त्या दिवशी मी जरूर परत येईन. आश्रित म्हणून नव्हे, तर तुझा पती म्हणून” यातून स्वाभिमानी, पुरुषी अहंकार, कलावंत, असल्याची उत्कट जाणीव आणि संयम इत्यादी त्याच्या गुणवैशिष्ट्यांची प्रचिती येते. थोर कलावंत असूनही रविवर्मा निर्व्यसनी होता. मद्यसेवनाचा जेव्हा आग्रह होतो, तेव्हा तो नम्रपणे नकार देतो. “क्षमा असावी युवराज. मला असल्या नशेची गरज वाटत नाही. आम्हाला कलेची नशा भरपूर आहे.” अशा शब्दात तो आपले मत मांडतो. यातूनच कलेवरील त्याच्या निष्ठेचीही ओळख पटते. अनेक पुरस्कार मिळूनही त्याची लीनता ढळत नाही. कोणत्याही भौतिक सुख-सोयींच्यापेक्षा त्याला कलानिर्मिती आनंददायक आणि महत्त्वाची वाटते. सुगंधासारखी सौंदर्यसंपन्न आणि कलेची जाण असणारी प्रेयसी भेटल्यानंतर तो तिला सांगतो, “बाईसाहेब, मी एक अतृप्त चित्रकार आहे. चित्रकलेखेरीज मला काही दिसत नाही, सुचत नाही.” यावरूनही त्याच्या अढळ कलानिष्ठेची कल्पना येते.

पत्नी आणि भावाच्या मृत्युच्या प्रसंगी रविवर्माचा हळुवार स्वभाव प्रकट होतो. तर कोर्टात दाखल झालेल्या खटल्याच्यावेळी बचावादाखल त्याने केलेल्या भाषणातून त्याच्या अथांग बुद्धीमत्तेची, वक्तृत्वशैलीची कल्पना येते. अधिक पैसे मिळत असतानाही आपली प्रेस तो अल्प किंमतीला स्लायरसला विकतो. यावरून पैशापेक्ष स्लायरसने केलेली मदत, मार्गदर्शन आणि सेवा महत्त्वाची, मानण्याची त्याची भूमिका दिसून येते.

शिकागोतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्याला पुरस्कार लाभतो. पण एका बाजूला प्राप्त होणारा गौरव व दुसऱ्या बाजूला खालावर चाललेली प्रकृती अशा द्वंद्वावस्थेत त्याच्या जीवनाची अखेर होते. पुत्र, बंधू, पती, पिता, प्रियकर, चित्रकार, छापखान्याचा मालक, कोर्टातील आरोपी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कलावंत असणारा माणूस या दृष्टीने लेखकाने रविवर्म्याच्या जीवनाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.