Jump to content

अमृत उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुघल गार्डन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

अमृत उद्यान, पूर्वीचे मुघल गार्डन, हे भारताच्या राष्ट्रपती भवनाच्या परिसरातील एक भव्य आणि ऐतिहासिक उद्यान आहे. २०२३ मध्ये, आज़ादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने या उद्यानाचे नाव बदलून अमृत उद्यान ठेवण्यात आले.[] हे उद्यान भारताच्या शाही आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, तसेच त्याचे सौंदर्य व विविध फुलांचे वर्गीकरण, आणि प्राचीन मुघल स्थापत्यशास्त्राची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली रचना यासाठी प्रसिद्ध आहे. १५ एकरावररील या उद्यानामागे जम्मू-कश्मीरची मुघल गार्डन, ताजमहलभोवतीचा बगीचा, जुनी पेंटिंग्स यांचा आधार घेण्यात आला. पर्शियन म्हणजे फारशी बगिच्यांच्या शैलीपासून प्रेरणा घेऊन या बागा तयार करण्यात आल्या.[]


अमृत उद्यान

इतिहास

अमृत उद्यानाची रचना ब्रिटिश वास्तुशास्त्रज्ञ एडविन लुटियन्स यांनी केली होती, ज्यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाची संपूर्ण योजना आखली होती. उद्यानाचे बांधकाम १९१७ साली पूर्ण झाले, आणि ते मुघल काळातील बागांच्या शैलीने प्रेरित आहे, ज्यामध्ये पाण्याचे कारंजे, लांब पायवाटा आणि सिंचन व्यवस्था दिसून येते. उद्यानात पाश्चात्त्य बागांच्या डिझाइनचा देखील प्रभाव आहे, ज्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक शैलींचे मिश्रण दिसते.


रचना

अमृत उद्यान सुमारे १५ एकर क्षेत्रफळात पसरलेले असून, याची रचना अनेक विभागांत केली आहे,त्यातील काही महत्वाचे;

१. मुख्य मुघल गार्डन- उद्यानाचा मुख्य भाग, जो पारंपारिक मुघल स्थापत्यशास्त्रावर आधारित आहे. येथे पाण्याचे कारंजे, लांब पायवाटा, आणि चारबाग प्रकारची विभाजित रचना आहे. हा भाग विविध प्रकारच्या फुलांनी सुशोभित केलेला असतो, ज्यामुळे तो अत्यंत आकर्षक दिसतो.

२. प्रेसिडेंट गार्डन- राष्ट्रपतींच्या व्यक्तिगत वापरासाठी रचलेला हा विभाग आहे, जिथे फळझाडे, औषधी वनस्पती, आणि फुलझाडांची विविधता पाहायला मिळते.

३. हर्बल गार्डन- भारतातील आयुर्वेदिक औषधी परंपरेवर आधारित या उद्यानात औषधी वनस्पतींचे संग्रह आहे. येथे तुळस, आल्यासारख्या औषधी वनस्पतींची काळजीपूर्वक लागवड केली जाते.

४. बटरफ्लाय गार्डन- विविध प्रकारची फुलझाडे लावून फुलपाखरांसाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणारे उद्यान. येथे रंगीबेरंगी फुलपाखरे आकर्षित केली जातात, ज्यामुळे हा विभाग पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो.

५. बाल वाटिका - अमृत उद्यानातील मुलांसाठी विशेष विभाग आहे, जिथे मुलांना निसर्गाशी जवळीक अनुभवण्याची संधी मिळते. येथे सुरक्षित खेळणी, खुली जागा, आणि शैक्षणिक घटक आहेत, जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला प्रोत्साहन देतात.


विशेष फुले आणि वनस्पतींची विविधता

अमृत उद्यानात फुलांच्या विविध जातींचा अद्भुत संग्रह आहे. येथे सुमारे १०० प्रकारच्या फुलझाडांचे वर्गीकरण पाहायला मिळते, ज्यात गुलाब, ट्यूलिप, लिली, डहलिया, आणि सूर्यफूल यांसारख्या फुलांचे समावेश आहे. विशेषतः इथे गुलाबाच्या १५९ प्रजाती आहेत ज्याचं एडोरा, मृणालिनी, ताज महल, आयफल टॉवर, मॉडर्न आर्ट, ब्लॅक लेडी, पॅराडाइज, ब्लू मून आणि लेडी एक्सचा समावेश आहे. ज्यामुळे हे उद्यान 'गुलाबांचे स्वर्ग' म्हणून ओळखले जाते. गुलाबांच्या अनोख्या प्रकारात जर्मनी, नेदरलँड्स, आणि जपानमधून आणलेल्या अनेक जातींचा समावेश आहे.


औपचारिक बागा आणि पाण्याचे कारंजे

अमृत उद्यानातील रचना अतिशय नियोजनबद्ध आणि शास्त्रीय आहे. मुघल स्थापत्यशास्त्राच्या प्रभावामुळे, येथे केंद्रस्थानी एक मोठा जलाशय आणि त्याभोवती विविध आकाराचे आणि रंगांचे फुलझाडांचे लेआउट तयार केले आहे. चारबाग पद्धतीने बांधलेली ही बाग चार विभागांमध्ये विभागली आहे, ज्यामुळे पाण्याचे प्रवाह प्रत्येक भागातून जाऊ शकतात. या कारंज्यांचे पाणी उन्हाळ्यात थंडावा निर्माण करते आणि बागेला सौंदर्यशास्त्राचा अनोखा अनुभव देतात.


वार्षिक फुलांचा महोत्सव

प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत अमृत उद्यान सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुले केले जाते. या काळात, उद्यानात वार्षिक फुलांचा महोत्सव आयोजित केला जातो, ज्यात विविध प्रकारच्या फुलझाडांची आकर्षक मांडणी केली जाते. या महोत्सवात हजारो पर्यटक येऊन विविध रंगांच्या फुलांनी नटलेले उद्यान पाहतात. गुलाब, ट्यूलिप, लिली, आणि अन्य आकर्षक फुलांचे प्रकार या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असतात.


महत्त्व आणि वारसा

अमृत उद्यान हे केवळ एक उद्यान नसून, ते भारतीय इतिहासाच्या, कला आणि वास्तुकलेच्या वारशाचे प्रतीक आहे. येथे प्राचीन मुघल स्थापत्यकलेचा वारसा जतन करण्यात आला आहे, तसेच आधुनिक काळातील बागांचे तंत्रज्ञान आणि सौंदर्यशास्त्रदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाचा हा हिस्सा, दिल्लीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.

या बागेत मदर टेरेसा, राजा राममोहन राय, जॉन एफ, केनेडी, महाराणी एलिझाबेथ, क्रिश्चियन डायोर अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचे गुलाबही आहेत. इथे महाभारतातल्या अर्जुन आणि भीमाच्या नावाची फुलंही हेत. बोगनवेली, गुलबहार, एलाइसमच्या रांगा आहेत. बहावा, पारिजात असे वृक्ष हेत.

अनेक माजी राष्ट्रपती किंवा कधीकधी त्यांच्या कुटुंबीयांनीही या बागेत भर घातली आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या सूचनेवरून इथे हर्बल गार्डन,  दृष्टिहीनांसाठी टॅक्चर गार्डन, संगीतमय बाग, जैवइंधन पार्क आणि पोषक बाग अशा बागा जोडण्यात आल्या.

के आर नारायणन यांनी इथे रेनन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम आणली. देशाचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसैन यांनी परदेशातून अनेक गुलाबांच्या जाती इते आणल्या आणि ग्रीनहाऊस तयार केलं.

राष्ट्रपती भवनातली माळीकाम करणारी टीम हे उद्‌यान कायम ताजंतवानं ठेवायचं काम करते. सैनी जातीचे हे कर्मचारी तीन पिढ्यांपासून इथं काम करत आहेत.

अमृत उद्यान हे पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण असून, दिल्लीतील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे.


संदर्भ[][]

  1. ^ https://divyamarathi.bhaskar.com/national/news/mughal-garden-now-named-amrit-udyan-130855331.html
  2. ^ https://www.bbc.com/marathi/articles/cpd0dy5753mo
  3. ^ http://it.delhigovt.nic.in/writereaddata/Cir2024525888.pdf
  4. ^ https://www.newsonair.gov.in/amrit-udya-to-open-for-general-public-on-friday/