विकिपीडिया:मराठीत लिहिताना शुद्धलेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका का होतात?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीत लिहिताना शुद्धलेखनाच्या आणि वाक्यरचनेच्या चुका का होतात? याची कारणे अशी :-

  1. मराठी माणसे पुस्तके-वर्तमानपत्रे-नियतकालिके वाचताना त्यांतल्या शब्दांच्या ऱ्हस्व-दीर्घाकडे आणि वाक्यरचनेकडे दुर्लक्ष करतात.
  2. स्वत: एखादा मजकूर लिहिल्यानंतर तो परत वाचून पहात नाहीत.
  3. पाहिलाच तर त्यांत झालेल्या चुका दुरुस्त करीत नाहीत.
  4. लिहिलेले दुसऱ्याला समजतेय ना मग बस्स झाले, ही मराठी माणसाची प्रवृत्ती असते.
  5. मुळात शाळेत शिकताना मुलांना चांगले मराठी शिकवले जात नाही. ब्रिटिशांच्या काळात असे नव्हते. त्याकाळी मुलांना शिकवायला पंतोजी असत, त्यांच्या देखरेखेखाली चुकीचे मराठी लिहिताच येत नसे.
  6. हल्ली शाळेत 'शुद्धलेखन घालायची' पद्धत नाही.
  7. भारतातील (मराठी-गुजराती सोडून) त्यांच्या त्यांच्या भाषेतील लिखाण अचूक लिहितात. अगदी भोजपुरी मातृभाषा असलेला माणूसही हिंदी लिहिताना चुका करीत नाही.
  8. लिहिताना जर इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग चुकत नाही, तर मराठी शब्दाचे लिखाण का सदोष असते? कारण शुद्धलेखन ही निव्वळ आवड किंवा गरज न राहता ती सवय असली पाहिजे, हे अंगात न भिनल्यामुळे..

मराठी लिहिताना हमखास होणाऱ्या चुका[संपादन]

  • अस्सल मराठी शब्दांतल्या अंत्य आणि उपान्त्य शब्दातली मात्रा (इ-कार/उकार) दीर्घच असते, ती हमखास ऱ्हस्व (ऱ्हस्व म्हणजे पहिली मात्रा; काढली जाते. (अपवाद : आणि, नि, परंतु, तथापि, यद्यपि. या शब्दांतले अंत्याक्षर दीर्घ असते. कारण - पी म्हणजे पिणारा. मध्यपी म्हणजे दारू पिणारा; तथापी म्हणजे 'तसे' पिणारा! 'तथापि'मध्ये पिणारा हा अर्थ अपेक्षित नाही, म्हणून 'तथापि'तला 'पि' ऱ्हस्व..) त्यामुळेच मी, ही, तू, ऊ या एकाक्षरी शब्दांतला ई-कार/ऊ-कार दीर्घ असतो.
  • तत्त्व, महत्त्व या शब्दांची फोड तत्+त्व, महत्+त्व अशी होते. दॊन त शेजारी आल्याने तत्त्व-महत्त्व-सत्त्वमध्ये त्त्व हे अक्षर येते.
  • पुरुषत्व शब्दाची फोड पुरुष+त्व. 'त' एकदाच आला, म्हणून पुरुषत्वात त्त्व येत नाही. असेच ममत्व, शूरत्व, स्वत्व, कर्तृत्व, अंधत्व या शब्दांत त्त्व येत नाही.
  • उपान्त्य शब्दांतली मात्रा दीर्घ म्हणून करीन, करून, माहीत, बसून, वगैरे. संस्कृत शब्दांना हा नियम लागू नाही. उदा० उपयोजित, गणित, त्वरित, पारंपरिक, भाषांतरित, सामाजिक, वगैरे.
  • मराठीतला एक खास नियम - अस्सल मराठी शब्दांतल्या उपान्त्यपूर्व अक्षराची मात्रा ऱ्हस्वच असते. उदा० गरीब, परंतु गरिबाला. (यांतला रि उपान्त्यपूर्व अक्षर). रीत-रितीने (परंतु रीति-रीतीने), धाकधूक-धाकधुकीमुळे, दूध-दुधाची, वगैरे. हा नियम संस्कृत-इंग्रजी शब्दांना लागू नाही. उदा० स्वाधीन-स्वाधीनतेला, शरीर-शरीराचा, क्लोरीन-क्लोरीनमुळे, लीबिया-लीबियात, सल्फाईट-सल्फाईटपासून, वगैरे.
  • चा-ची-चे-हून हे प्रत्यय आहेत, आणि पासून, मधून ही शब्दयोगी अव्यये आहेत. त्यांतले इ-कार/उ-कार दीर्घ असतात.