धूळपाटी/बापूजी साळुंखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बापूजी साळुंखे या पानावरून पुनर्निर्देशित)

मला भावलेले बापूजी[संपादन]

पंचगंगा नदीकाठावर वसलेल्या जुना बुधवार पेठेने अनेक युगपुरुष जन्माला घातले. हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या तोरस्कर चौकातील भुसारी वाड्यात माझे बालपण गेले. या भुसारी वाड्यातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षण प्रसाराचा भगिरथ महाराष्ट्रातील खडोपाडी वाहू लागला. विवेकांनद शिक्षण संस्थेचे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे हे माझे आजोबा. लहानपणापासून त्यांच्याकडून शिक्षणाचे महत्व समजू लागले. बापूजींच्या १०३ व्या जयंतीनिमित्त मला भावलेले बापूजी हे लिहिण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे.

बापूजींचे पूर्ण नाव गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे. त्यांचे सख्खे थोरले भाऊ परशराम माझे आजोबा. माझे वडील सूर्याजी उर्फ गजानन साळुंखे हे बापूजींचे पुतणे. माझी आई विमलचे सख्खी मावशी म्हणजे बापूजींच्या धर्मपत्नी सुशिलादेवी. सुशिलादेवी आणि बेळगाव तारिहाळची आजी लिलाबाई या सख्ख्या बहिणी. त्यामुळे बापूजींचे माझ्या वडिलांकडे पुतण्या म्हणून तर सुशिलादेवी यांचे भाची म्हणून माझ्या आईकडे लक्ष असायचे. पूर्वी तोरस्कर चौकातील भुसारी वाड्यात विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यालय होते. त्या वाड्यात आम्ही रहायचो. तर बापूजी केसापूर पेठेतील घरी रहायचे. बापूजी नेहमी सकाळी आंबेवाडी, वडणगेला फिरायला जायचे. सकाळी मी उठल्यावर तोरस्कर चौकात दूध आणि वरक्या (बटर) खरेदीला जायचो. त्यावेळी फिरून आलेल्या बापूजींची भेट व्हायची. आठवड्यातून एकवेळ थोरल्या भावाला परशराम यांना भेटायला येत असत. त्यामुळे बापूजींचा सहवास लहानपणापासून लाभला. भुसारी वाड्यात संस्थेचे कार्यालय असल्याने संस्थेचे तत्कालिन सचिव राजाभाऊ मराठे, अधीक्षक उत्तमराव गायकवाड, प्रा. नानासाहेब साळुंखे रहात होते. आईची मावशी सुशिलादेवी म्हणजेच संस्थामाताही आमच्या घरी येत असत. घरात नोकर चाकर नसल्याने त्या स्वतःच कामे करत. संस्थेच्या कामानिमित्त घरी येणाऱ्यांच्या योग्य पाहुणचारही त्या करत असत. दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, गणपतीला बापूजींच्या घरी जात असे. सणासुदीला बापूजींचा आशिर्वाद घेतल्यावर समाधान मिळत असे.  सत्यनारायण पुजेच्यावेळी ते आमच्या घरी जेवायला यायचे. माझी आजी राजाबाई यांच्या हातच्या पुरणपोळ्या त्यांना आवडायचा. सर्व पै पाहुण्याच्या कार्यक्रमाला नुसते हजर रहायचे नाहीत तर कार्य सिद्धिस नेण्यासाठी कार्यतत्पर असायचे. माझी बहिण महानंदाचे प्रा. वसंतराव कदम यांच्याशी विवाह झाला. विवाहात अक्षता न उधळता फुलांच्या पाकळ्या उधळण्यास सांगितले. अक्षताचे तांदूळ वसतीगृहास देण्यास सांगितले. त्यांचा सामाजिक दृष्टीकोनही मला चांगलाच भावला.

संस्थेचे कार्यालय भुसारी वाड्यात असल्याने मोठा राबता असायचा. बापूजींच्यामुळे प्राचार्य एम.आर. चिटणीस, प्रिन्सिपॉल अमरसिंह राणे, प्राचार्य विजयाताई पाटील, हणमंतराव पाटील, माजी आमदार सुरेश पाटील, माजी आमदार गजेंद्र ऐनापुरे, मुख्याध्यापक व्ही.डी. पाटील, डी.एल. ऐनापुरे, रमेश पाटील, शिंदे महाराज (कापशी), शाहीर कुंतीनाथ करके, कुरणे मामा (रुकडी़) या गुरुदेव कार्यकर्त्यांना जवळून पाहण्याचा योग आला.  

पांढरा रंगाचा पायजमा, नेहरु शर्ट, डोक्यावर टोपी आणि अंगावर चॉकलेटी रंगाची शाल अशी बापूजींची साधी राहणी असे. माझे शालेय शिक्षण शाहू हायस्कूलमध्ये झाले असल्याने बापूजींचे सतत दर्शन घडत असे. जुने विवेकानंद कॉलेज आणि शाहू हायस्कूलच्या बांधकामावर त्यांची नजर असे. त्याकाळी सर्व बांधकामे दगडात केली होती. ती दर्जेदार व्हावीत म्हणून त्यांचा कटाक्ष असे. ते स्वतः बांधकामावर पाणी मारत. संस्थेमध्ये शिपायांची भरती करताना त्याला सुतारकाम, गवंडीकाम, बागकाम येणे आवश्यक होते. त्यांच्याकडून बरीचशी कामे करून घेत. त्यांच्याशी त्यांचा वैयक्तिक परिचयही असे. सध्या ताराबाई पार्क येथे संस्थेच्या कार्यालयात पूर्वी उसाची शेती होती. बापूजी उसाची लावण, उसतोड, मोळ्या बांधणे, मोळ्या बैलगाडीत भरण्याचे काम स्वतः करायचे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी वसतीगृहातील मुले, कर्मचारी असत.

मला चारचाकीत बसण्याचा योगही बापूजींच्यामुळेच मिळाला. त्यांची भगव्या रंगाची इंपाला कार होती. त्याची गाडी भुसारी वाड्यात आली की आमचे आजोबा म्हणत ‘भगवा झेंडा फडकत आला. हरहर महादेव बोला’. बापूजींच्या इंपाला कारमधून फिरण्याचा बऱ्याच वेळ योग आला. माझे वडील गजाननराव शिवाजी विद्यापीठात नोकरीस होते. लहान असताना त्यांच्यासोबत प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाच्या कॅम्पमध्ये गगनबावड्यात गेलो. त्यावेळी बापूजी गगनगिरी महाराजांच्या बोलत असल्याचे पहायला मिळाले. गगनगिरी महाराजही पाटणच्या साळुंखे परिवारापैकी आहेत हे कळाले.  

दरवर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनाला बापूजींच्याकडून अनेकवेळा बक्षिसे घेण्याचा योग आला. त्यावेळी बक्षीस म्हणून प्रमाणपत्राबरोबर ताट, वाटी, पेला अशी भांडी दिली जात. त्यामुळे आमची आई खूष असायची. दरवर्षी एक मे ला निकाल लागल्यावर बापूजींना दाखवायला जायचे. त्यावेळी ते बक्षीसही देत. दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर बापूजींचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो. माझे गुण पाहून त्यांनी खिशातून शंभर रुपयांची नोट काढली सर्वांना पेढे वाटण्यास सांगितले. तसेच माझा शिक्षणात कुठे कल आहे हेही जाणून घेतले.

बापूजी साळुंखे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. शरद साळुंखे यांच्यामुळे मला थोर राजकीय, सामाजिक नेत्यांच्या विवकांनदच्या प्रांगणात भेटण्याचा योग लाभला. संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. संस्थेच्या कामानिमित्त ते बापूजींना भेटण्यास येत. त्यांच्या ताफ्यात अनेक वाहने असायची. ती वाहने आम्ही लहानपणी मोजायचो. लहानपणी बापूजी आपले आजोबा आहेत हे कळायचे. जसजसा मोठा होऊ लागलो तेव्हा बापूजींना उभारलेला विवेकानंद शिक्षणाचा विस्तार पाहून छाती अभिमानाने फुलुन यायची. संस्थेच्या शाळा, महाविद्यालयातून अनेकजण शिकून मोठे झाले. त्यांनी देशकार्यात मोलाची भर घातली आहे. संस्थेचे अध्यक्ष वसंतदादा पाटील यांनी सुरू केलेल्या सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथील शेतकरी शिक्षण मंडळाच्या पी.व्ही.पी.आय.टी.आय या संस्थेत मला नोकरी मिळाली हे माझे भाग्य समजतो. तिथे मी १७ वर्षे काम करून मी बापूजींचे गुरू शिवाजी पीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या शिवाजी विद्यापीठात व तत्कालिन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या तंत्रज्ञान अधि विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. शिवाजी विद्यापीठ अधिसभेतील बापूजींचे तैलचित्र आणि विद्यापीठाच्या आवारातील शिक्षण विभागासमोर उभारलेल्या बापूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर शैक्षणिक कार्यात मोठा उत्साह येतो. त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार वंदन.

प्रा. महेश साळुंखे

सहाय्यक प्राध्यापक, तंत्रज्ञान अधि विभाग

शिवाजी विद्यापीठ