पार्टनर (पुस्तक)
पार्टनर (पुस्तक) | |
लेखक | व. पु. काळे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे |
प्रथमावृत्ती | १९७६ |
पृष्ठसंख्या | १६४ |
आय.एस.बी.एन. | 8177664298
9788184985917 |
पार्टनर ही वपु काळे यांची मराठी कादंबरी आहे.[१] ही कादंबरी प्रथम १९७६ साली प्रकाशित झाली आणि त्यानंतर तिच्या तीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या. सुरुवातीच्या काही आवृत्त्या मेनका प्रकाशनाच्या असून त्यानंतरच्या सर्व आवृत्त्या मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
विषय :
या कादंबरीत एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी तरुणाच्या आयुष्यातले चढउतार, नातेसंबंध, योगायोग इत्यादी विषय चित्रित करण्यात आले आहेत.
प्रमुख पात्रे :
श्रीनिवास (किंवा श्री)
पार्टनर (श्रीचा मित्र)
आई
अरविंद (श्रीचा थोरला भाऊ)
मनोरमा (अरविंदची बायको)
किरण वर्तक (श्रीची बायको)
दमयंती (किरणची मैत्रीण)
देवधर (श्रीचे बॉस)
कथानक :
लेखकाने ही कादंबरी सरळसोट पद्धतीने न दाखवता रेखीय अर्थात नॉनलिनियर पद्धतीने मांडली आहे. मोठा भाऊ अरविंद याच्या तब्येतीमुळे त्याला सतत मिळणाऱ्या सहानुभूतीपायी आणि त्या सहानुभूतीचा वापर करणारा अरविंद आणि त्याची बायको मनोरमा यांच्या स्वार्थी वागण्यापायी आणि आईच्या बोटचेप्या वृत्तीपायी घरात धाकटा असलेला श्री हा कमालीचा वैतागलेला असतो. दरम्यान पार्टनर नावाच्या एका विलक्षण माणसाशी श्रीची मैत्री होते आणि बघता बघता ते जिवाभावाचे मित्र बनतात. आणि तरीही श्रीला पार्टनरचं नाव माहीत नसतं कारण पार्टनरच्या मते "खरं तर आपल्याला नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं". हा पार्टनर अतिशय गुलछबू परंतु तितकाच व्यवहारी माणूस असतो. काव्य, साहित्य इत्यादींवर त्याचं विशेष प्रेम असतं. लवकरच किरण वर्तक नावाची एक अतिशय सुस्वरूपी आणि सुस्वभावी मुलगी श्रीच्या आयुष्यात येते. त्यानंतर बघता बघता प्रेम आणि लग्न हे महत्त्वाचे टप्पे आपसूकच पार होतात.
पार्टनरच्या आणि त्याचप्रमाणे किरणची मैत्रीण दमयंती या दोघांच्या मदतीने घराचा प्रश्न सुटतो. पार्टनर नोकरीसाठी पुण्याला निघून जातो. दरम्यान अमितचा जन्म होतो आणि तेवढाच अकाली त्याचा मृत्यूही होतो. या संपूर्ण प्रवासात श्रीला आई, भाऊ, वहिनी, बायको इत्यादी लोकांचे विलक्षण अविश्वसनीय अनुभव येतात आणि आपण खरंच यांना ओळखतो का असा प्रश्नही त्याला पडतो. अखेरीस सगळ्याला कंटाळून तो पार्टनरला परत येण्याची आणि या दुःख आणि मानसिक असमाधानानाने काळवंडलेल्या या आयुष्यातून आपली सुटका करण्याची विनंती करतो आणि आपल्यावर "एवढे अनंत उपकार करणारा पार्टनर तरी खरा होता की ती देखील अशीच आपल्या मनाची एखादी कल्पना होती?" असा विचार श्री करत असतानाच कादंबरी संपते.
अवतरणं :
या कादंबरीवर लोकांनी जीवापाड प्रेम केलं ते या कादंबरीत पावलोपावली आपल्या भेटीला येणाऱ्या अवतरणांमुळे अर्थात क्वोट्समुळे. कादंबरी अतिशय प्रवाही असून या प्रवासात पावलोपावली आपल्याला अशी एकाहून एक सरस अवतरणं वाचायला मिळतात. प्रचंड लोकप्रिय झालेली या कादंबरीतील काही अर्थपूर्ण अवतरणं.
- आपल्याला हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक!
- खरं तर आपल्याला नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.
- कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.
- पोरगी म्हणजे झुळूक! अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही.
मुखपृष्ठ :
या कादंबरीचं मुखपृष्ठ अतिशय बोलकं असून त्यातून कादंबरीचा समग्र विषय सोप्याशा चित्रातून मांडला जातो. यात राजा आणि राणीचे एकमेकांच्या विरुद्ध दिशांना असलेले चेहरे असलेला एक पत्ता दाखवला असून तो मध्यभागी बऱ्यापैकी फाटलेला दाखवला आहे. आणि या सगळ्याकडे त्रयस्थपणे पाहून अखेरीस (कदाचित) कंटाळून तोंड फिरवून लांब जाणारा पार्टनर (किंवा कदाचित स्वतः श्री) वरच्या कोपऱ्यात दाखवला आहे. कादंबरीत दिसणारे स्त्री-पुरुष किंवा नवरा-बायको संबंधांतले तणाव, इगो आणि टाळता न येणारा शेवट या सगळ्यावर हे मुखपृष्ठ अतिशय चपखलपणे भाष्य करते. हे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी रेखाटले आहे.