धोळावीरा
धोळावीरा भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भचाऊ तालुक्यातील खदीरबेट या मोठ्या गावाजवळ असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.[१] कच्छ वाळवंटी वन्यजीवन अभयारण्याचा भाग असलेले हे प्राचीन गाव १०० हेक्टरमध्ये पसरलेले असून येथे इ.स.पू. २६५० ते इ.स.पू. २१०० पर्यंत वस्ती होती. काही शतके निर्मनुष्य राहिल्यावर इ.स.पू. १४५०च्या सुमारास येथे पुन्हा एकदा मनुष्यवस्ती आली.[ संदर्भ हवा ]
जागतिक वारसा
[संपादन]धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.[२] जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यातील मधील चौथे आणि भारतातील चाळीसावे ठिकाण आहे.[३]सिंधु संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व आहे.
पुरातत्त्वीय महत्त्व
[संपादन]येथील छोट्या टेकडीवर असलेल्या गढी सदृश्य जागेवर जगत पती जोशी या पुराशास्त्रज्ञाने १९६८ साली प्रथम उत्खनन केले. त्यानंतर रवींद्र सिंग बिष्ट यांनीही येथे संशोधन करून या स्थळाचे तत्कालीन व्यावसायिक व उत्पादक केंद्र म्हणून असलेले तत्कालीन महत्त्व जगासमोर आणले आहे. धोलावीरा येथील पुरातत्त्वीय अवशेषांत मजबूत बांधणीची संरक्षित भिंत असलेली किल्लेसदृश्य जागा, मध्यभागी असलेली वसाहत आणि खालच्या बाजूला असलेली वसाहत या गोष्टी संशोधकांना सापडलेल्या आहेत. भारतीय सभ्यतेची प्राचीनता सांगना-या मोहेंजोदडो, कालीबंगा, राखीगडी या ठिकाणांच्या जोडीने धोलावीरा हे ही महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.[२]
सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष
[संपादन]या ठिकाणी सिंधु संस्कृतीतील महत्त्वाची मानली जाणारी लाल रांगांच्या भांड्यावर काळ्या रंगाने नक्षी चितारलेली मातीची भांडी, सिंधू लिपीची अक्षरे असलेला एक मोठा फलक, मातीची मोठी साठवणुकीची भांडी, गोलाकार नाणे, छिद्र असलेली मातीची भांडी, छोटी पाणी पिण्याची भांडी, तांब्याच्या बांगड्या, शंखाच्या बांगड्या, वशिंड असलेल्या प्राण्यांच्या छोट्या मातीच्या मूर्ती अशा काही वस्तू सापडल्या आहेत. याद्वारे तत्कालीन समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करता येतो.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Possehl, Gregory L. (2002). The Indus Civilization: A Contemporary Perspective (इंग्रजी भाषेत). Rowman Altamira. ISBN 978-0-7591-0172-2.
- ^ a b "Explained: What UNESCO heritage site Dholavira tells us about the Indus Valley Civilisation". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-07-28. 2021-07-28 रोजी पाहिले.
- ^ "Unesco World Heritage tag: Here's list of all 40 Indian sites after Dholavira addition". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-07-27. 2021-07-28 रोजी पाहिले.
- ^ Wheeler, Mortimer; Wheeler, Sir Mortimer (1968-09-02). The Indus Civilization (इंग्रजी भाषेत). CUP Archive. ISBN 978-0-521-06958-8.