Jump to content

केशव नारायण काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(के. नारायण काळे या पानावरून पुनर्निर्देशित)

के. नारायण काळे, पूर्ण नाव -केशव नारायण काळे (२४ एप्रिल, इ.स. १९०४; - २० फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक होते. ते बी.ए. एल्‌‍एल.बी. होते, आणि त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ग्रीक आणि युरोपियन रंगभूमीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. नाटकाच्या आवडीमुळेच के. नारायण काळे हे नाटककार झाले.

सुरुवातीच्या काळात के.नारायण काळे यांनी ’भावशर्मा’ या नावाने कविता आणि कथा लिहिल्या. इ.स.१९३२साली त्यांचा ’सहकारमंजिरी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.

के. नारायण काळे यांनी ’अभिजात’ ही चित्रपट कंपनी स्थापन केली आणि ’म्युनिसिपालिटी’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात चित्रसंस्थेवर के. नारायण काळे यांनी एक लघुपट काढला होता.

के. नारायण काळे यांनी आठ चित्रपटांत कामे केली होती. नाट्यकलेच्या आकर्षणातून त्यांनी इ.स.१९३३मध्ये ’नाट्यमन्वंतर’ ही नाट्यसंस्था काढली. त्यांनी ’मुद्रा राक्षसम्‌’ या संस्कृत नाटकाचे ’कौटिल्य’ या नावाचे भाषांतर करून ते त्या संस्थेतर्फे रंगमंचावर आणले. त्यागराज कैलासम्‌ यांचे दि पर्पज हे नाटक त्यांनी ’प्रयोजन’ या नावाने रंगभूमीवर आणले.

नाट्यमन्वंतर या संस्थेने ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक रंगमंचावर सादर केले. परंपरेने आलेलेल संगीत पौराणिक-ऐतिहासिक नाटक नाकारून के. नारायण काळे, अनंत काणेकर, पार्श्वनाथ आळतेकर, ग.य. चिटणीस आदी नाट्यविचारवंतांनी एकत्र येऊन”आंधळ्यांची शाळा’ची निर्मिती केली. यासाठी के. नारायण काळे यांना त्यांचा परदेशी रंगभूमीचा व्यासंग कामी आला. १ जुलै १९३३ रोजी झालेल्या या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात केशवराव दाते, नाटककार वर्तकांच्या पत्नी सौ. पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, पितळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर आणि के. नारायण काळे यांच्या भूमिका होत्या. नाटकाच्या नायिका अठरा वर्षे वयाच्या ज्योत्स्ना भोळे होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्या आसपास प्रयोग झाले होते.

के. नारायण काळे हे कलातत्त्वचिंतक, साहित्यसमीक्षक व पुरोगामी विचारवंत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे १९७४साली निधन झाले.

के.नारायण काळे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अभिनयसाधना (’ॲन ॲक्टर प्रिपेअर्स' या स्टॅनिलाविस्कीच्या नाट्यशास्त्रावरील ग्रंथाचे भाषांतर- १९७१)
  • कौटिल्य (रूपांतरित नाटक-१९६१)
  • प्रतिमा, रूप आणि रंग (१९७४)
  • मराठी नाटक व मराठी रंगभूमी यासंबंधी समीक्षा-१९६३
  • सहकारमंजिरी (कवितासंग्रह-१९३२)

के.नारायण काळे हे संपादक असलेली नियतकालिके

[संपादन]
  • रत्नाकर (१९२९)
  • प्रतिभा (१९३३-३४)
  • मराठी साहित्य पत्रिका (१९४०-४२; १९४६-७०)