पोतराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कडकलक्ष्मी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण 'दार उघड बया आता दार उघड' असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागते. या कडकलक्ष्मीला पोतराज असेही म्हणतात.[१] हातातल्या कोरड्याने (हंटरने) स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती फिरणाऱ्या या पोतराजच्या मोकळ्या सोडलेल्या केसात जटा झालेल्या असतात, किंवा क्वचित केसांचा अंबाडा बांधलेला असतो. पोतराजाने दाढी राखलेली नसते पण मिशा मात्र असतात. कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र नेसलेला, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेला आणि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज लहान मुलांना भीतिदायक वाटतो. आपल्या हातातील कोरड्याचे कधी स्वतःच्याच शरीरावर प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत 'सट सट' आवाज काढीत तो मरीआईच्या नावाने दान मागतो.[२]

पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी डफडे वाजवत गावात येतो व गावात मरीआईचा फेरा आल्याची घोषणा करतो. मरीआईने प्रसन्न व्हावे म्हणून पोतराज आत्मपीडनाचा मार्ग अवलंबतो.[३] अंगाला डावी-उजवीकडे डोल देत नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वतःच्या अंगाभेवती मारणे, दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खुपसणे, दातांनी स्वतःच्या मनगटाचा चावा घेणे इ. प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो. त्यानंतर देव्हाऱ्याचे दार उघडते. मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

भटके कलावंत आणि भिक्षेकरी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पोतराज". प्रहार. १४ नोव्हेंबर २०१९. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ विशाल कुलकर्णी. "महाराष्ट्राची लोकधारा". २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
  3. ^ पवार, माधवी. "पोतराजाची लोकगीते". https://www.thinkmaharashtra.com/. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  4. ^ साळुंखे, आ. ह. "पोतराज". https://vishwakosh.marathi.gov.in/. १७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)