ऑटोबायग्राफी ऑफ ए योगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीचे मुखपृष्ठ

ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी (शब्दशः एका योग्याची आत्मकथा) हे परमहंस योगानंद (इ.स. १८९३ - १९५२) यांचे आत्मचरित्र आहे. १९४६ मध्ये ते पहिल्यांदा प्रकाशित झाले. योगानंदांचे मूळ नाव मुकुंदलाल घोष असे होते. त्यांचा जन्म गोरखपूरमध्ये एका बंगाली हिंदू कुटुंबात झालेला होता.

ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी हे पुस्तक वाचकास परमहंस योगानंद यांच्या जीवनाचा आणि पौर्वात्य व पाश्चिमात्य जगतातील आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांच्या झालेल्या संपर्काचा परिचय करून देते. बालपणातील कौटुंबिक काळापासून पुस्तकाची सुरुवात होते. नंतर क्रमाक्रमाने पुस्तकात आपल्याला गुरूचा शोध, साधू होणे आणि त्यानंतर क्रियायोग ध्यानाची शिकवण प्रस्थापित करणे अशा गोष्टी दिसतात. सन १९२० मध्ये योगानंद यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे झालेल्या धार्मिक काँग्रेसमध्ये भाषण देण्याचे आमंत्रण स्वीकारले होते याचाही पुस्तकात उल्लेख आहे. या भाषणानंतर त्यांनी अमेरिकेत प्रवास केला आणि विविध ठिकाणी व्याख्याने दिली. १९३५ मध्ये ते वर्षभरासाठी भारतात परत आले.

या पुस्तकाने पौर्वात्य जगातील परमात्म साक्षात्कारासाठीच्या पद्धती आणि पौर्वात्य जगतातील आध्यात्मिक ज्ञानाचे प्रथमच जगाला दर्शन घडवले. सन १९४६ पर्यंत अशी माहिती खूप कमी प्रमाणात उपलब्ध होती. लेखकाचा असा दावा आहे की असे पुस्तक लिहिले जाईल अशी भविष्यवाणी एकोणिसाव्या शतकातच लाहिरी महाशयांनी करून ठेवलेली होती.

हे पुस्तक ७० वर्षांहून अधिक काळ मुद्रणात आहे आणि पन्नासहून अधिक भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

१९४६ची आवृत्ती : https://www.holybooks.com/autobiography-of-a-yogi-paramahansa-yogananda/ Archived 2020-08-06 at the Wayback Machine.