आलाय मोठा शहाणा (नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

‘आलाय मोठा शहाणा’ हे वैभव परब यांनी लिहिलेले आणि संतोष पवार यांनी दिग्दर्शित केलेले एक मराठी नाटक आहे.

कथानक[संपादन]

दादासाहेब नावाच्या गावातील वजनदार असामीने आपल्या सिंड्रेला नामक एकुलत्या एक पण ढ मुलीला शिकवण्यासाठी आपल्या नोकराकरवी एका मास्तरला गोणत्यात घालून पकडून आणला आहे. आपल्या मुलीला काहीही करून एस.एस.सी. पास करायचेच असा पण दादासाहेबांनी केलेला असल्यामुळे आणि ती एस.एस.सी. झाल्याशिवाय तिचे गुलाबरावाशी लग्न लावून दिले जाणार नसल्यामुळे मास्तरवर मोठी आफत ओढवली आहे. हरप्रकारे सिंड्रेलाला शिकवण्याचा प्रयत्न करूनही ते वाया जातात तेव्हा मेटाकुटीला आलेला मास्तर शेवटी तिच्या डोक्यातल्या सिनेमावेडाचाच शिकवणुकीत वापर करतो आणि मिशन फत्ते करतो.

'आलाय मोठा शहाणा'मध्ये सिंड्रेलाच्या डोक्यावर जे सिनेमाचे भूत सवार आहे त्या सिनेमाची, सिनेसंगीताची पॅरडी दिग्दर्शक नाटकभर रंगभाषेतून वेगवेगळ्या प्रकारे करतो. मग तो कधी 'नागिन' चित्रपटातल्या बीनच्या तालावर गोणत्यातून वळवळत बाहेर पडणारा मास्तर असतो. तर कधी रहस्यमय चित्रपटाप्रमाणे हातात कंदील घेऊन सतत गूढ इशारे देत फिरणारे गायब झालेल्या पूर्वीच्या मास्तराचे भूत असतो. कधी कधी तो स्पायडर मॅन, बॅटमॅन, क्रिश अशा फिल्मी वेषात आपल्या मर्दुमकीची बेटकुळी दाखवत फिरणारा लुकडा गुलाबराव असतो.

सिंड्रेलाच्या तर प्रत्येक उक्ती-कृतीत सिनेमाच भरला आहे. ती कधी 'पिंजरा'तली तमासगिरीण होते तर कधी हातात ग्लोव्हज घालून 'मेरी कोम' होते. मास्तरने हिंदी गाण्यांचाच आधार घेऊन सिंड्रेलाला विज्ञान, गणित, इतिहास शिकवणे, सैराटच्या 'झिंग झिंग झिंगाट'च्या गाण्यावर वेडेपिसे होणे हे या ‘आलाय मोठा शहाणा’ नाटकातले हायलाईट आहेत.

सतत घरातून पळू बघणाऱ्र्‍या मास्तरची सुटकेची धडपड आणि तो बेडरूममध्ये सिंड्रेलाची शिकवणी घेत असताना बाहेर गुलाबरावची होणारी तडफड ह्या संदर्भातले प्रसंग उघडपणे फार्सिकल आहेत आणि त्यांची रचनाही दिग्दर्शकाने तशीच केली आहे. प्रत्येक पात्राचे व्यक्तिवैशिष्ट्य जाणवत राहील असा आकार त्यांना मिळालेला आहे. त्यांत विडंबनात्मक नृत्यरचना आणि संगीताच्या तुकड्यांनी अधिक मजा आणली आहे.

नायक-नायिका[संपादन]

आशिष पवारचा लवचिक अभिनय कॉमेडीची नस पकडणारा आहे. सुरुवातीच्या गोणत्यातल्या आगमनापासून ते शेवटच्या फिल्मी शिकवणीपर्यंत तो कायेने वाचेने सळसळत असतो. हे नाटक त्याला उसंत घेऊ देत नाही आणि तोही तारांबळ उडालेल्या मास्तरचे बेअरिंग पकडत धावत असतो. त्याचे अनेक द्रुतगती विभ्रम नाटकाला एक चक्रम आणि भन्नाट वेग देतात. सिंड्रेलाच्या भूमिकेतल्या अपूर्वा नेमळेकर देशपांडेने दाखवलेला मॅडनेस अफलातून आहे.