साखरपुडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोमिनाचा साखरपुडा समारंभ

पत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न 'पक्के' करण्यासाठी साखरपुडा हा विधी करतात. पूर्वी या विधीला 'कुंकू लावणे' म्हणत. अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्त्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक विधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता चार नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच्या पित्याकडे जातो व आपल्या मुलासाठी त्यांच्या कन्येला विवाहाची मागणी घालतो त्यानंतर लगेच साखरपुडा हा विधी केला जातो. वरपिता मुलीला कुंकू लावून साडी-चोळी व नारळ देतो आणि या शुभप्रसंगी तोंड गोड करण्यासाठी साखर देतो. म्हणून या विधीला 'साखरपुडा' असे नाव प्राप्त झाले आहे.


वाङ्‌निश्चय साखरपुडा[संपादन]

विवाह जमविण्याची प्राथमिक तयारी झाली की पहिला सोहळा साखरपुड्याचा होतो. पूर्वी वराकडील चार माणसे जाऊन वधूच्या घरी हा ओटी भरण्याचा कार्यक्रम करीत. वधूकडील भाऊबंद मंडळी जमविली जात व त्यांचे समक्ष हा साखरपुडा होई. वराकडील महिला वधूची ओटी भरीत. ह्या साखरपुड्याचेसुद्धा आता समारंभात रूपांतर होत आहे. जागेच्या अभावी हा कार्यक्रम सभागृह घेऊन केला जातो. गावी खळ्यांत कार्यक्रम करतात. सर्व मंडळी जमल्यावर वधूकडील कुणीतरी जाणता माणूस वराकडील मंडळींचे स्वागत करतो व आपल्या मंडळीस सांगतो की,अमक्या गावचे अमके पाहुणे आपली अमक्याची मुलगी पाहण्यास आले आहेत. दाखवायची का? इतर मंडळी संमती देतात.त्यानंतर मुलगी हातात तांदूळ घेऊन, गाव असेल तर प्रथम तुळशीला नमस्कार करून, व नंतर पाहुण्यांच्या समोर येऊन तांदूळ डावीकडून उजवीकडे गोलाकार टाकून बसून नमस्कार करते. तेथेच तिला उभी करून 'काही विचारायचे ते विचारा' असे तो जाणता माणूस सांगतो. वराकडील जाणता माणूस मुलीला नाव, भावंडे, शिक्षण,नोकरी इत्यादी जुजबी प्रश्न विचारतो. मुलीला घरात नेले जाते. जाणता माणूस विचारतो मुलगी पसंत आहे का? मुलाकडून होकार असतोच.त्यावर आता मुलगा आणला असल्यास आमच्या मंडळीना दाखवा असे सांगितले जाते. नंतर मुलगा उभा राहून नमस्कार करतो. त्याला देखील मुलीकडचा जाणता माणूस नाव,शिक्षण, नोकरी वगैरे प्रश्न विचारतो व खाली बसण्यास सांगतो. वधुपक्षाकडून मुलगा पसंत आहे असे सांगितले जाते. व्यवहारबाबत काही बोलायचे असल्यास सांगा असे सांगितल्यावर मालको-मालकी व्यवहार पटले आहेत.ते आम्ही पाळू, इथे उघड करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते. काहीजण तो उघड करतात. वरपक्षाकडील मंडळी साखरपुड्याची तयारी करूनच आलेली असतात.त्यामुळे पुढच्या कामाची मांडणी होते.


संदर्भ[संपादन]