Jump to content

शेळी पालन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आफ्रिकेतील बोयर बकरा

शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोगळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

भारतात असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे १२३ दशलक्ष इतकी आहे. तर जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या आहेत.असे जरी असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. या देशातील उत्पन्न बघू जाता, दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त ३% दूध, ४५ ते ५०% मांस व ४५% कातडी प्राप्त होते.भारतात शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त ५८ लिटर इतके आहे.या दुधाला मागणी असत नाही. [ संदर्भ हवा ]

शेळीपालनाचे फायदे

[संपादन]
  • हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो.
  • काही जातीच्या शेळ्या या 14 महिन्या मध्ये दोनदा वितात या मुळे अधिक उत्पन्न मिळते.
  • शेळ्यामध्ये दोन पिलांना जन्म देणाची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर आहे.
  • पैशाची गरज भासल्यास शेळ्या विकुन तो उभा करता येऊ शकतो.
  • शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवुन घ्यायची असते.
  • यांना खाण्यास निकृष्ट प्रतिचाही चारा चालतो.त्याचे रूपांतर त्या दूध व मांसात करतात.
  • त्यांचे वेत लवकर येतात म्हणून त्यांचे उत्पादन लवकर वाढते.
  • लहान चणीच्या असल्याने त्यांना निवाऱ्यास जागा कमी लागते.
  • त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते.
  • बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे.
  • यांचे शिंगापासून व खुरापासून पदार्थ बनतात.
  • यांचे मांस चविष्ट असते.

शेळ्यांच्या जाती

[संपादन]
पाला खाण्यासाठी बकऱ्या झाडावर चढतात

भारतीय जाती

[संपादन]

भारतात बकऱ्यांच्या सुमारे २५ जाती आहेत.जमनापरी, बिटल, सुरती,मारवाडी, बारबेरी वगैरे जाती दूध उत्पादनास तर बिटल, उस्मानाबादी,सुरती,संगमनेरी, अजमेरी वगैरे जाती मांसासाठी वापरल्या जातात. यांची वाढ मंद गतीने म्हणजे वर्षास सुमारे २५ किलो इतकी होते.[ संदर्भ हवा ]

अंगोरा जातीचा विदेशी बकरा

विदेशी जाती

[संपादन]

सानेन, टोगेनबर्ग,अल्पाईन,एग्लोन्युबियन, अंगोरा या बकऱ्यांच्या विदेशी सुधारीत जाती आहेत. यांची वाढ झपाट्याने होते.आफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळ्या वजनदार आहेत. नराचे वजन १०० ते १२५ किलो व मादिचे वजन सुमारे ९० ते १०० किलो असते.[ संदर्भ हवा ]

भारतातील शुद्ध जातीच्या शेळ्या (अ-संकरीत) या उस्मानाबादी किंवा संगमनेरी आहेत.

पालनपद्धती

[संपादन]

याचे दोन प्रकार आहेत.बंदिस्त व अर्धबंदिस्त.

बंदिस्त शेळीपालन

[संपादन]

शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.[ संदर्भ हवा ]

गोठ्याच्या आवश्यकता

[संपादन]
शेळी फार्म
  • गोठ्यात चारा पाण्याच्या आधुनिक सोयी असाव्यात.
  • गाभण, आजारी, पिल्ले, बोकड यांचे साठी विशेष कप्पे असावेत.
  • शेळ्या वेल्यानंतर त्यांना व पिलांसाठी कप्पे असावेत.
  • संख्या जास्त असल्यास वेगळे भांडार खाद्यासाठी असावे.
  • प्रथमोपचार व औषधांसाठी वेगळी सोय असावी.
  • वेळेवर लसीकरण गरजेचे असते. यात पी पी आर, इ टी व्ही या लसी महत्त्वाच्या आहेत.
  • शेळ्यांना चारा हा तुकडे करून द्यावयास हवा.
  • शेळ्यांचे लसीकरण व जंतूनाशकांचा योग्य वापर करावा.
  • तेथील शेळ्यांचा विमा काढण्यात यावा.
  • गोठा हा पाऊस, ऊन, थडी यापासून सुरक्षित असावा [ संदर्भ हवा ]

अर्धबंदिस्त शेळीपालन

[संपादन]

शेळ्या या विशेषतः फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरून चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे फायदे

[संपादन]
  • बाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत.
  • व्यवस्थापन, गोठा बांधणी व देखभाल खर्चात बचत होते.
  • शेळ्यांचा व्यायाम होतो यामुळे आरोग्य चांगले राहते तसेच पाणी जास्त पिले जाते.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे तोटे

[संपादन]
शेळी फार्म-बकऱ्यांचे दूध मशीननेही काढतात-एक दृश्य
  • इतर अथवा रोगी शेळ्यांचे संपर्कात आल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव.
  • त्यांनी किती खाल्ले याचे मोजमाप करता येत नाही सबब उपसमारीची शक्यता.
  • तरीही गोठा आवश्यक असतो.

आहार

[संपादन]

शेळीच्या वजनाच्या किमान ०.५% खुराक,२% वाळलेला चारा,१.५०% हिरवा चारा असे साधारणतः आहाराचे प्रमाण असते.चाऱ्याचे लहान तुकडे करून दिल्यास सुमारे २५ ते ३०% चाऱ्याची बचत होते.[ संदर्भ हवा ]

पिल्लांना जन्मानंतर १.५० महिना आईचे दूध मिळालेच पाहिजे.तसेच त्यांना लुसलुशीत पाला,खुराक देता येते.दिड महिन्यानंतर त्यांचे दूध तोडावयास हवे.त्यांना प्रथिनयुक्त आहार पुरेश्या प्रमाणात द्यावयास हवा.[ संदर्भ हवा ]

शेळ्यांची पिलांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते यासाठी पिलांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते त्यामुळे शेळ्यांना हिरव्या चाऱ्या बरोबर योग्य प्रमाणात खुराक देणे खुप गरजेचे आहे यामध्ये दूध वाढीच्या पशु खाद्य तसेच मका ,तुरीचा भरडा यासारखा खुराक देणे गरजेचे आहे.खुराकामधे शेंगदाणा पेंड , सरकी पेंड असावी

चित्रदालन

[संपादन]

हेही बघा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे पत्रक-'शेळीपालन एक उत्कृष्ट व्यवसाय'