वृषण
हा नर प्राण्यांमधील प्रजननाचा अवयव आहे.
हा अवयव शिश्नाखालील वृषणकोशात असतो. त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक व शुक्रजंतू तयार होतात.
रचना
सैल बंधनाने वृषणे वृषणकोशामध्ये स्थिर केलेली असतात. वृषणाभोवती असलेले श्वेत प्रावरण आणि परिवृषण हे दोन थर आणि त्यांमधील द्रवामुळे वृषणाचे संरक्षण होते. वृषणामध्ये रेतोत्पादक नलिकांची काही खंडांत विभागलेली जाळी, अंतराली उतक आणि ’लायडिग’ पेशी असतात. रेतोत्पादक नलिकेमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींचे विभाजन होऊन आद्यशुक्राणू तयार होतात. पेशीच्या आकाराच्या आद्यशुक्राणूंचे पोषणासाठी व त्यांच्या परिवहनासाठी आवश्यक द्रव ’सर्टोली’ पेशींपासून निर्माण होतो. सूत्री व अर्धसूत्री विभाजन; पोषण व पुढील विकासानंतर शुक्राणूंचा आकार बदलून लांबट शुक्रजंतू निर्माण होतत.
कार्य
रेतोत्पादक नलिकामध्ये दररोज तीन कोटी शुक्रजंतू निर्माण होतात. पौगंडावस्थेमध्ये चालू झालेली शुक्राणू निर्मिती अखेरपर्यंत चालू राहते. फक्त वार्धक्यामध्ये शुक्राणु निर्मितीचा वेग कमी होतो.
अंतराली ऊतकातील ’लायडिग’ पेशी ’पौरुषजन’ टेस्टोस्टेरॉन (Testosterone) अंतःस्रावाची निर्मिती करतात.
याप्रमाणे शुक्रजंतूंची निर्मिती करणारी जननग्रंथी आणि टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची निर्मिती करणारी अंतःस्रावी ग्रंथी असे दोन प्रकारचे कार्य वृषण करते.