कोन
एकमेकांना छेदले जाणारे दोन किरण (दोन सरळ रेषा) जेथे जोडल्या जातात त्या जागी होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. कोन हा अंशात किंवा रेडियन मध्ये मोजला जातो. तो (ठरलेल्या संकेतानुसार) धन किंवा ऋण असू शकतो.
विभिन्न प्रतलात असलेल्या दोन रेषा (किरण) एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. अशा वेळी एका रेषेच्या प्रतलात दुसऱ्या रेषेला समांतर रेषा काढून त्या दोन रेषांतील कोन मोजतात.
कोन मोजण्याच्या एककाला षष्टिक-मान पद्धतीमध्ये अंश म्हणतात. या पद्धतीमध्ये १ अंश (चिन्ह ०) म्हणजे ६० मिनिटे किंवा ६० कला (चिन्ह ') , आणि एक मिनिट (कला) म्हणजे ६० सेकंद (६० विकला - चिन्ह "). काटकोन ९० अंशाचा बनतो आणि एक पूर्ण वर्तुळ ३६० अंशाचे होते. मिनिटाचा (किंवा कलेचा) १/६०, अंशाचा १/३,६०० अथवा पूर्ण वर्तुळाचा १/१२,९६,००० एवढा भाग म्हणजे सेकंद होय.
कोनमापनाच्या शतमान पद्धतीत काटकोनाचे १०००, एका अंशाची १००' व एका मिनिटाचे १००" मानतात. म्हणून या पद्धतीत सेकंद म्हणजे काटकोनाचा १/१०,००,००० किंवा पूर्ण वर्तुळाचा १/४०,००,००० एवढा भाग होय.
वैज्ञानिक किंवा अभियांत्रिकी पद्धतीत पूर्ण वर्तुळाचा कोन (१) ३६० अंश किंवा (२) २ अरीये (रेडियन्स, चिन्ह RAD) हे मापक, मानक म्हणून वापरतात.