सूक चिंगची कत्तल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सूक चिंग स्मारक

सूक चिंग- चिनी लोकांचे निर्मूलन- [१]दुसऱ्या महायुद्धात, जपानी सैन्याने यशस्वीरीत्या मलेशियावर चढाई केली व त्याची सांगता सिंगापूरवरील विजयात झाली. त्यानंतर, १८ फेब्रुवारी ते ४ मार्च १९४२ या कालावधीत सिंगापूर मध्ये जपानी सैन्याकडून केलेल्या नागरिकांच्या भीषण कत्तलीला, 'सूक चिंग' म्हणजेच चिनी लोकांचे निर्मूलन असे म्हणतात. 'सूक चिंग' या शब्दाचा वापर, सिंगापूरच्या राष्ट्रीय वारसा समिति (नॅशनल हेरिटेज बोर्ड) [२] कडून , सिंगापूर मधील चिनी वंशाच्या नागरिकांची जी हत्या केली गेली, ती दर्शविण्यासाठी वापरला जातो.

१९३७ पासून चालू असलेल्या दुसऱ्या जपान-चीन युद्धामुळे, सरसकट सर्व चिनी वंशाच्या नागरिकांना, 'जपानी सम्राज्यासाठी धोकादायक', असे मानण्यात आले व अनेक नागरिकांची हत्या करण्यात आली.

१५ फेब्रुवारी १९६७ रोजी, या कत्तली मध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभारण्यात आले. [३] या स्मारकमध्ये, सिंगापूर मधील चार प्रमुख भाषिक लोकांना (इंग्लिश, चिनी, मलय, तमिळ), दर्शविण्यासाठी चार खांब आहेत. तसेच या चार भाषांमधून लेख लिहिलेले आहेत. दरवर्षी १५ फेब्रुवारीला, येथे युद्धात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

प्रमुख हत्याकांडे[संपादन]

ही हत्या अनेक ठिकाणी करण्यात आली. त्यातील काही प्रमुख ठिकाणे येथे नमूद केली आहेत.

  1. पंगोल पॉइंट [४]- २८ फेब्रुवारी १९४२ रोजी, या ठिकाणी अंदाजे ३०० ते ४०० चिनी लोकांची हत्या केली गेली. हे सर्व अप्पर सेरांगून रस्त्यावर पकडले गेले होते.
  2. चांगी समुद्रकिनारा [५]- २० फेब्रुवारी १९४२ रोजी, ६६ चिनी पुरुषांची हत्या केली गेली. हे सर्व बुकीत तिमहा/ स्टिवन्स रोड येथे पकडण्यात आले होते.
  3. चांगी रोड- त्यावेळच्या सांबा इकत गावामधील मळ्यांमध्ये (प्लॅन्टेशनवर) हत्या केलेल्या २५० लोकांचे अवशेष मिळाले आहेत.
  4. होउगांग [६]- येथे ६ ट्रक भरून माणसांची हत्या केली गेली.
  5. कटॉंग [७]- येथे मृतदेह दफन केलेले २० मोठे खड्डे सापडले आहेत.
  6. आंबेर रोड समुद्रकिनारा- येथे २ ट्रक भरून माणसे मारण्यात आली. या जागेवर नंतर गाडीतळ उभारण्यात आला.
  7. तनाह मेरह् समुद्रकिनारा [८]- जालान बेसार येथील २४२ जणांची हत्या येथे करण्यात आली. सध्या हा चांगी विमानतळाचा भाग आहे.
  8. थॉमसन रोड जवळील सीमे रोड- येथील गोल्फ कोर्स जवळ हत्या केल्याचे आढळून आले आहे.
  9. कटॉंग ईस्ट कोस्ट रोड- टेलॉक कुरऊ शाळेतील ७३२ बळी
  10. संतोसा गोल्फ कोर्स जवळील समुद्रकिनारा [९]- शरण गेलेल्या ब्रिटिश सैनिकांकडून, बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेले व येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या, ३०० नागरिकांच्या मृतदेहांचे येथे दफन करण्यात आले.

युद्धसमाप्ती नंतर[संपादन]

युद्ध समाप्ती नंतर जपानी सैन्याने या कत्तलीची कबुली दिली. [१०] या कत्तलीत सुमारे ६००० नागरिक मारले गेले असे जपानी बाजूचे म्हणणे आहे. तर सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली क्वान यु [११] यांच्या माहितीनुसार सुमारे ७०,००० नागरिक मारले गेले. ते स्वतः या कत्तली मध्ये जवळ जवळ सापडले होते.

खटला[संपादन]

युद्ध समाप्ती नंतर, १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीकडून ७ जपानी सैन्यातील अधिकाऱ्यांवर, 'सूक चिंग' बाबत खटले भरण्यात आले. यात टाकुमा निशीमुरा [१२], साबुरो कावामुरा, मासायुकि ऑईशी, योशीताका योकाता, टोमोटात्सू जो, साटोरू ओनिशी वा हारूजी हिसामात्सु यांचा समावेश होता. या हत्याकांडाचा प्रमुख जबाबदार अधिकारी, स्टाफ ऑफिसर मासानोबु त्सुजी [१३] हा थायलंड मार्गे चीनला पळाला.

साबुरो कावामुरा व मासायुकि ऑईशी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. पुढे १९५१ मध्ये पारित सुलोंग हत्याकांडात [१४] टाकुमा निशीमुरा यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

मासानोबु त्सुजी हा कालांतराने जपानला पोचला व राजकारणात सक्रिय झाला. परंतु १९६१ मध्ये, लाओस मध्ये तो नाहीस झाला. त्याची हत्या झाली असावी असा संशय आहे.

स्मारक[संपादन]

१९५९ मध्ये, सिंगापूर स्वायत्त झाले व ९ ऑगस्ट १९६५ ला सिंगापूरला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.

१५ फेब्रुवारी १९६७ रोजी, या कत्तली मध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभारण्यात आले. [१५] या स्मारकमध्ये, सिंगापूर मधील चार प्रमुख भाषिक लोकांना (इंग्लिश, चिनी, मलय, तमिळ), दर्शविण्यासाठी चार खांब आहेत. तसेच या चार भाषांमधून लेख लिहिलेले आहेत. दरवर्षी १५ फेब्रुवारीला, येथे युद्धात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या व्यतिरिक्त, हत्याकांड झालेल्या इतर ठिकाणीसुद्धा स्मारके उभारण्यात आली आहेत.

सिंगापूरच्या नागरिकांकडून या कत्तली बद्दल जपान कडून माफीची व आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली गेली आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान चिनी वंशाव्यतिरिक्त इतर नागरिकांची सुद्धा, मोठ्या प्रमाणावर सिंगापूर, मलेशिया, ब्रह्मदेश येथे जपानी सैन्याकडून हत्या झाली. यात १,५०,००० तमिळ व ९०,००० ब्रह्मदेशी व थाई नागरिकांचा समावेश आहे. यातील बहुतेक मृत्यू सयाम- ब्रह्मदेश रेल्वे मार्गाच्या बांधकामामध्ये झालेले आहेत. त्यामुळेच या रेल्वे मार्गाला 'मृत्यू मार्ग' [१६] म्हटले जाते.