विकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुखपृष्ठ सदर लेख
महात्मा गांधी
महात्मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३०, १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सुत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, स्त्रीयांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. यासाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला आणि स्वत:पण याच तत्त्वांनुसार जगले. स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. ते जन्मभर शाकाहारी होते.

पुढे वाचा...