महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(महाराष्ट्र एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट MERI). मुख्यत्वे पाटबंधारे प्रकल्प व इतर बांधकामे या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी संशोधन करणारी संस्था. ही संस्था राज्य शासनाने एप्रिल १९५९ मध्ये नासिक येथे स्थापन केली.

कार्यक्षेत्र:[संपादन]

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रात पाटबंधारे, वीजनिर्मिती, इमारती, रस्ते व पूल यांची बांधकामे, पाणीपुरवठा, पूरनियंत्रण, बंदरांच्या समस्या, नवीन औद्योगिक वसाहतींची उभारणी वगैरे नानाविध विकास योजना मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित करण्यात आल्या. या सर्व योजनांमध्ये आधुनिक संशोधन, आधुनिक प्रकारची बांधकामाची सामग्री व अभिनव कार्यपद्धती यांचा वापर करण्यात येऊ लागला. त्याद्वारे खर्चात अधिकाधिक बचत करण्याचा व त्याचबरोबर बांधकाम अधिकाधिक मजबूत करण्याचा हेतू असतो आणि यांसाठी सतत संशोधन करण्याची जरुरी असते. या दृष्टिकोनातून या संस्थेत संशोधन करण्यात येते.

मूलभूत संशोधन हाती घेतानाही त्याचा प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रात कितपत उपयोग होईल, याचा विचार करण्यात येतो. अशा प्रकारे भावी प्रश्नांची उकल करण्यासाठी उपयुक्त ठरु शकेल अशी माहिती ज्याद्वारे मिळू शकेल अशा बाबींविषयीचा अभ्यास व प्रयोग अधिक तपशीलवारपणे येथे केले जातात.

या संस्थेत सुरुवातीस फक्त चार संशोधन विभाग व एक यांत्रिकी विभाग होते. जसजसा कामाचा व्याप वाढला व संशोधनाच्या नवीन शाखांची जरुर भासू लागली, तसतसे नवे विभाग व उप-विभाग उघडण्यात आले. १९८४ साली संस्थेत १४ संशोधन विभाग व एक यांत्रिकी विभाग होते.

ही राज्य पातळीवरील संशोधन संस्था असल्याने हिचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यापुरते व्यापक आहे. राज्यातील निरनिराळे प्रकल्प तयार करताना व त्यांचे प्रत्यक्ष काम चालू असताना काही विशिष्ट अभिकल्पांची (आराखड्यांची) संशोधनात्मक तपासणी होणे जरुर असते काही ठिकाणी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची चाचणी वा परीक्षण करणे जरुर असते, तर काही ठिकाणी करावयाच्या बांधकामाची व त्यातील उपांगांच्या (घटकांच्या) प्रतिकृती तयार करणे व त्यांवर आवश्यक ते प्रयोग करून त्यांची उपयुक्तता व मजबुती अजमावणे जरुर असते. या सर्व प्रकारच्या संशोधनात्मक पाहणीत बऱ्याच पर्यायी योजनांचा विचार करावा लागतो.

तसेच खुद्द बांधकाम चालू असताना नवीन समस्या व अनपेक्षित अडचणी उपस्थित होतात. अशा विविध समस्यांसंबंधीचे व चाचणीचे काम संस्थेकडे सुपूर्द केले जाते. राज्यातील निम-सरकारी व खाजगी क्षेत्रांत चालू असलेल्या बांधकामांसंबंधीच्या समस्या आणि चाचणी−कार्यही संस्थेमार्फत शक्य तितके स्वीकारले जाते.

यांशिवाय केंद्र शासनाकडून केंद्रीय सिंचाई व शक्ती मंडळ आणि वाहतूक मंत्रालय यांच्यातर्फे संस्थेकडे बरेच मूलभूत संशोधनाचे प्रकल्प सुपूर्द करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर १९७७ साली अफगाणिस्तानमधील ‘सलमा’ प्रकल्पाच्या प्रतिकृतीचा अभ्यास करण्याचे कामही संस्थेकडे सोपविले होते. १९८३-८४ मध्ये नर्मदासागर व सरदार सरोवर या इतर राज्यांतील प्रकल्पांच्या समस्यादेखील संस्थेने हाती घेतल्या.

संशोधन व परीक्षण यांखेरीज संस्थेकडे पुढील कामेही सोपविण्यात आली आहेत : (१) प्रमुख व मध्यम अशा प्रकल्पांवर उभारलेल्या मृदा व क्राँक्रीट यांविषयीच्या प्रयोगशाळांची तपासणी करून तेथील उपकरणांचे ठराविक काळाने प्रमाणीकरण करणे (२) प्रशिक्षणार्थीसाठी काही व्याख्याने आयोजित करून व संस्थेच्या प्रयोगशाळांत प्रात्याक्षिकांची सोय करून नासिकच्या अभियांत्रिकी अधिकारी महाविद्यालयास सहाय्य करणे (३) शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या स्थापत्य या त्रैमासिकाचे संकलन, संपादन व प्रकाशन करणे (४) सुधारित पी. डब्ल्यू. डी हँडबुकचे संकलन, संपादन व प्रकाशनकरणे व (५) दिल्ली येथील केंद्रीय सिंचाई व शक्ती मंडळ, भारतीय मानक संस्था, इंडियन रोड काँग्रेस वगैरे प्रमुख राष्ट्रीय संस्थांच्या निरनिराळ्या समित्यांवर प्रतिनिधित्व करून त्यांच्या कामकाजात सक्रिय भाग घेणे.