मरयम जिन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मरयम जिन्ना

मरयम जिन्ना, पूर्वाश्रमीचे नाव रत्तनबाई पेतीत (फेब्रुवारी २०, इ.स. १९०० - फेब्रुवारी २०, इ.स. १९२९) ही पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिन्ना यांची दुसरी पत्नी होती. यांचा जन्म मुंबईच्या एका धनाढ्य पारशी कुटुंबात झाला. वयाच्या १८व्या वर्षी यांनी आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या मोहम्मद अलींशी प्रेमविवाह केला.

जीवन[संपादन]

रत्तनबाई यांची मोहम्मद अली जिन्ना यांच्याबरोबर पहिली भेट दार्जिलिंग येथे एका कौंटुंबिक सहलीदरम्यान झाली. जिन्ना हे रत्तनबाई यांच्या वडिलांचे मित्र म्हणून या सहलीत सहभागी झाले होते. रत्तनबाई यांच्या वडिलांना रत्तनबाई व जिन्ना यांच्या प्रेमाची वार्ता कळल्यावर त्यांनी या गोष्टीस विरोध केला. त्यावेळी रत्तनबाई यांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी होते. रत्तनबाईच्या वडिलांनी जिन्ना यांनी त्यांना भेटू नये असा बंदीहुकुम मिळवला. रत्तनबाई १८ वर्षांच्या झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलांचे घर सोडून जिन्ना यांच्या बरोबर विवाह केला. यावेळी त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला व त्यांचे नाव बदलून मरयम असे ठेवले गेले.

काही काळानंतर मरयम आणि जिन्ना यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. इ.स. १९२८ मध्ये मरयम जिन्नांपासून वेगळ्या राहायला लागल्या. त्यांना आंत्रदाहाचा[१] आजार होता. त्यासाठी त्या वेदनाशामक म्हणून मॉर्फिन घेत असत. फेब्रुवारी, इ.स. १९२९ मध्ये मॉर्फिनच्या अतिसेवनामुळे मरयम यांचा मृत्यू झाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  • फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट; लॅरी कॉलिन्स, डॉमिनिक लापायर (१९७६); विशाल पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली, पृ. २२४-२२५
  1. आंत्रदाह (इंग्लिश: Ulcerative colitis, अल्सरेटिव्ह कोलायटिस)