बालनाट्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पहिले बालनाट्य संमेलन मुंबई येथे ६ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. विजय तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या संमेलनात मराठी बाल नाट्य परिषदेची स्थापना झाली. सुधा करमरकर या परिषदेच्या स्वागताध्यक्ष, रत्‍नाकर मतकरी हे कार्याध्यक्ष आणि नरेंद्र बल्लाळ हे कार्यवाह असतील असे ठरले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे ३ व ४ मे २०१४ रोजी पुण्यात बालनाट्य संमेलन झाले.. त्यात राज्य व राज्याबाहेरील पन्नासहून अधिक संस्थांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी व बालकलाकार सहभागी झाले होते. प्रकाश पारखी हे संमेलनाचे निमंत्रक होते. साने गुरुजी स्मारक इथे झालेल्या या संमेलनाचे उद्‌घाटन पृथ्वी थिएटरच्या संजना कपूर यांच्या हस्ते झाले. त्‍यानंतर नाट्य समीक्षक माधव वझे यांचे बालरंगभूमीची वाटचाल या विषयावर व्याख्यान झाले.. ४ मे रोजी सायंकाळी चार वाजता समारोपासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, बालकलाकार तेजश्री वालावलकर उपस्थित होते.. दोन्ही दिवस बालनाट्यांचे प्रयोग, ग्रिप्स रंगभूमीवरील नाटक, रंजक खेळ, परिसंवाद, मुलांशी चर्चा, असे उपक्रम यात समाविष्ट केलेले होते.

सोलापूरचे बालनाट्य संमेलन[संपादन]

अखिल भारतीय नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेची सोलापूर शाखा यांच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये एक बालनाट्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षा कांचन सोनटक्के होत्या. हे संमेलन चार दिवस आणि शहरातील तीन ठिकाणी चालले. २९ नोव्हेंबर, २०१५ हा संमेलनाचा चौथा दिवस होता. हे पहिलेच अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन असल्याचे सांगितले गेले असले, तरी प्रत्यक्षात पहिले बालनाट्य संमेलन मुंबईत ६ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले होते.


पहा : साहित्य संमेलने