बगाड
बगाड (बंगाली:চড়ক পূজা (चरक पूजा अथवा नीलपूजा) ही एक पश्चिम महाराष्ट्र, झारखंड, बंगाल, आसामची बराक व्हॅली प्रदेश तसेच त्रिपुरा[१] आणि मणिपूर[२]च्या काही आदीवासी जमाती येथील एक धार्मिक उत्सव प्रसंगीची परंपरा आहे. मराठी विश्वकोशाच्या मतानुसार देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. बगाड म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकावून माणसाची काढलेली मिरवणूक.. ज्याला नवस फेडायचा आहे त्यांने, किंवा त्याच्या वतीने दुसरा कुणीतरी ’बगाडस्वार’ होऊ शकतो.
महाराष्ट्र
[संपादन]काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी ‘बगाड’ घेण्याची पद्धत आहे.[३] महाराष्ट्रात पुण्याजवळ हिंजवडी येथे म्हातोबाच्या जत्रेत,तसेच बालेवाडी [४]. चैत्री पौर्णिमेस सिरकोली येथे शिरकाई देवीच्या उत्सवात या[५]तुकाराम बीजच्या दिवशी वाई तालुक्यातील फुलेनगर या गावी काळेश्वरी देवीचे बगाड असते.
- बावधनचे बगाड: महाराष्ट्रामध्ये बावधनचे बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. पण या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. कारण या खिल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकतीचा नाही. बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला दिसतो, याचे प्रमुख कारण म्हणजे बगाड आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बावधनचा बगाड असतो.
- बगाड म्हणजे काय?
बावधन गावची यात्रा ही दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी येत असते. होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होत असते. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनचा बगाड्या कोण हे ठरले जाते. बावधनचा बागड्या हा ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच माणसावर तो कौल येत असतो. बगाडाच्या आधी दोन ते चार दिवस आधी हा होळीचा कार्यक्रम असतो आणि होळीच्या आधी हे हळदीचा कार्यक्रम केला जातो. हळदीच्या कार्यक्रमा दिवशी देवाला हळद लावली जाते. इंग्रजांच्या काळाच्या आधी पासून बगाड ही प्रथा चालत आलेली आहे, याचे पुरावे बावधन भैरवनाथाच्या मंदिरामधील सभामंडपात असलेल्या लाकडी खांबावर ठोकलेल्या नाल पाहायला मिळतात, यावरून सांगितले जाते. धुरवीला २ बैल, चावरी, सहा बैली, आठ बैली, १० बैली, बारा बैली अशा प्रकारे १२ बैल (६ बैलजोड्या) या बगाडाला जुंपलेल्या असतात.
- बगाड कसा बनवला जातो?
बगाडाचे वजन २ ते ३ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठी वरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड, शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. बगाडाच्या आदल्या दिवशी छबीना असतो, त्या दिवशी बगाड तयार केला जातो. बावधन गावामधील सर्व सुतार समाज मिळून बगाड बनवत असतात. गावातील सर्व सुतार आणि प्रमुख मंडळी एकत्र येऊन हे काम पूर्ण करतात. अंदाजे २० ते २५ जण हा बगाडाचा गाडा तयार करतात. बागडाची चाके ही दगडी असतात. त्यानंतर कणा, कणा हा साडे नऊ फुटाचा असतो. कण्यावरती बूट बसवलेले असते. दरवर्षी बागडाला लागणारा कणा हा नवीन केला जातो. त्यानंतर दांड्या या बुटामध्ये बसलेल्या असतात. त्यानंतर साटा बसवला जातो. साट्या बसवल्यानंतर त्यावर वाघ बसवला जातो. वाघाचे वजन अन्दाझे १ टन एवढे असते. कण्यामध्ये दोन्ही बाजूला दगडी चाके बसवली जातात. तसेच ४५ ते ५० फूट लांबीचे गुंफलेले शीड देखील बागडाच्या खांबावर बसवलेले असते. जु, खांब ,जुंपण्या, पिळकावण्या हे सुतार मंडळी करत असतात. बगाडाचा गाडा तयार करायला ८ ते १० दिवस आधी काम चालू केले जाते आणि रात्रंदिवस हे काम करून गाडा पूर्ण केला जातो. बगाडाचा गाडा हा संपूर्ण पणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा कोणताच भाग वापरला जात नाही. आळदांडी तेव्हडी फक्त चंदनाची असते. बागडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते. बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवले जाते. कि जेणेकरून ते पुढील २ वर्ष वापरले जाते.
- बगाडाचा प्रवास कसा असतो?
होळीपासून चतुर्थीला छबिना, आणि पंचमीला बगाड असतो. बगाड हा खिल्लार बैलांच्या साहयाने ओढला जातो. बावधनचा बगाड हा सर्वात जास्त प्रसिद्ध देखील आहे. बगाड पहाटे साडेपाचच्या दरम्यान बैलांच्या साहाय्याने नदीपर्यंत सोमेश्वरापर्यंत ओढत नेला जातो आणि पुन्हा अन्दाझे ११ वाजता बगाड नदीपासून मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरुवात होते. बगाड हा सर्वात जास्त म्हणजे जवळ पास ७५% शेतामधून ओढत नेला जातो, आणि २५% डांबरी रोड वरून. शेतामधून बगाड ओढत नेत असताना ओली माती, बांध, कुठे थोडीफार पीक असलेली शेती, यामधून बगाड ओढत नेला जातो. खिल्लार बैलांपासून बगाड ओढत न्यायची ही कित्तेक वर्षांपासूनची प्रथा आहे. बगाड जेव्हा डांबरी रोड वर येतो तेव्हा २ ते ३ बैलजोड्या देखील बगाड ओढून नेतात. बगाड ज्या शेतामधून ओढत नेला जातो, जर तिथे पीक उगवलेले असेल, तर ते पीक नंतर खूप जोमाने येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे बगाड हा आपल्या शेतातून जावा यासाठी प्रत्येक शेतकरी उत्सुक असतो.
- धुरवीची बैल म्हणजे काय?
बगाडाला एकूण १२ बैल म्हणजे ६ खिल्लार धष्टपुष्ट बैलजोड्या जुंपलेल्या असतात. बगडाजवळ सर्वात पहिली बैलजोडी जी जुंपलेली असतात त्यांना "धुरवीची बैल" म्हणतात आणि धुरवीला जुंपलं जाणारा बैल हा उंच, धिप्पाड, मोठ्या ताकतीची बैलचं लागतात. प्रत्येक बैलांमध्ये हत्तीचे बळ असते. बगाड हा २ ते ३ टन वजनाचा असतो. त्यामुळे बगाड जागेवर नुसता हलवणे आणि पुढे नेणे, हे काम धूरवीची बैलचं करू शकतात. धूरवीची बैल जेव्हा बगाड जागेवरून हलवतात तेव्हाच बाकीची पुढच्या बैलांना बगाड ओढत पुढे न्यायला काम सोपे होते. कधी कधी बगाड हा शेतामधून ओल्या मातीतून जात असताना त्याची दगडी चाके मातीमध्ये फसतात. तेव्हा धुरवीच्या बैलांना अफाट टाकत लावावी लागते. त्याशिवाय बगाड हा तिथून बाहेर निघू शकत नाही. बावधन मधील हिरा बैल आणि त्यासारखे अजूनही काही बैल एकाद्या जागी अडकलेले बगाड बाहेर काढण्यासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. गावातील सर्व बैल हे दरवर्षी त्यांच्या ठरलेल्या जागेवर उभे असतात. बगाड १०० फूट पुढे गेला कि बैल लगेच बदलली जातात आणि पुढच्या बैलांना मान दिला जातो. घरच्या दावणीला शांत असलेला बैल "काशिनाथचं चांगभलं" ही गर्जना ऐकताच बैल आपल्या मोठ्या ताकतीसह हवेत झेप घ्यायला तयार होतो. त्या दिवशी काही बैलांना १० ते १५ लोकांशिवाय हाताळणे अवघड असते. एकाच ठिकाणी हजाराहून अधिक खिल्लार जातीवंत, सुंदर, बैल पाहायचे एकमेव ठिकाण म्हणजे बावधनचे बगाड.
- नियोजन कसे असते?
बावधन गावामध्ये दोन तरफ आहेत, एक भोसले तरफ आणि एक पिसाळ तरफ. हे दोन्ही तरफ समोरासमोर बसून बगाड गावात कसा आणायचा हे ठरवत असतात. बगाड पाहायला बावधन गावामध्ये जवळ पास ३ ते ४ लाख भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात. माही पौर्णिमेपासून खर तर बगाडाचा मौहोल या गावामध्ये तयार होत असतो. शिडाला बगाड्या टांगल्या नंतर त्याला पाठीमागे गळ लावलेला असतो. दोन्ही हात वर टांगलेले असतात. दोन माणसे पुढे उभी असतात आणि २ माणसे ही वाघा वर बसलेली असतात. बगाड नेत असताना काही अडचणी आली. बगाड थांबवायचा असेल, किंवा पुढे न्यायाचा असेल हे यांच्यामार्फत सांगितले जाते. बागडाच्या डाव्या बाजूला १० माणसे आणि उजव्या बाजूला १० माणसे असतात. यातील उजव्या बाजूचा मान हा पिसाळ तरफ आणि डाव्या बाजूचा मान हा भोसले तरफ यांना दिलेला असतो.
- बैलांचा व्यायाम काय असते?
बावधानच्या बगाडानिमित्त अतिशय उत्तम बैल बावधन मध्ये सांभाळली जातात. बागडाच्या तयारीसाठी व्यायाम म्ह्णून बैलांकडून शेतीची सर्व कामे करून घेतली जातात. त्यांना टायरला जुंपले जाते. लाकडी ओंढके ओढायला लावले जातात. नांगराला जुंपून जास्तीत जास्त मेहनत त्यांच्या कडून घेतली जातो. पळवणे आणि चालवणे हा व्यायाम सर्रास त्यांच्याकडून घेतला जातो.
- बगाड्याची निवड कशी करतात?
बगाड्याची निवड ही होळी पौर्णिमेला केली जाते. बावधानचं मंदिरामध्ये कौल लावला जातो आणि होळी पौर्णिमेनिमित्त बगाड कुणावर आलाय याचा कौल नाथाच्या कृपेंने पंच मंडळी घेत असतात. नवस लावायला जवळपास ५० पेक्षा अधिक मंडळी देखील असतात. पण यातून फक्त एका व्यक्तीची निवड बगाड्यासाठी केली जाते.
झारखंड
[संपादन]बंगाली पंचांगातील चैत्र महिन्यात्यातील शेवटच्या संक्रांतीच्या दिवशी, झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यातील सिलीगुढी, आदित्यपूर येथील शिव मंदिराच्या नवसासाठी आदिवासी समाजात चरकपूजा नृत्य केले जाते. [६] [७] परसुडीहचे तुपुडांग [८]
पश्चिम बंगाल
[संपादन]बांग्लादेश
[संपादन]बांग्लादेशातील ठाकुरगाव जिल्ह्यात चरकपूजेची परंपरा आहे..[९]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ https://in.news.yahoo.com/tripura-celebrates-charak-puja-full-devotion-174126474.html
- ^ http://www.dailypioneer.com/STATE-EDITIONS/ranchi/devotees-go-fanatic-in-the-name-of-god.html
- ^ रंगपंचमी - आ.ह. साळुंखे, (मराठी विश्वकोश)
- ^ [http://www.lokmat.com/storypage.php?catid=303&newsid=5102277 अलोट गर्दीत वाकड-हिंजवडीत बगाड उत्साहात First Published :05-April-2015 : 00:53:05 दैनिक लोकमत वृत्त दिनांक ५ ऑक्टोबर २०१५ १६.४५ वाजता जसे मिळवले
- ^ http://www.lokprabha.com/20111111/dharmikparyatan.htm शिरकाईचे दर्शन युवराज पाटील ११ नोव्हेंबर २०११ वृत्त दिनांक ५ ऑक्टोबर २०१५ १६.४५ वाजता जसे मिळवले
- ^ [http://www.telegraphindia.com/1040609/asp/jharkhand/story_3347265.asp Dance of pain to please deity PARVINDER BHATIA Wednesday, June 09, 2004 हे दैनिक टेलिग्राफ वृत्त दिनांक ५ ऑक्टोबर २०१५ १६.४५ वाजता जसे मिळवले
- ^ http://www.telegraphindia.com/1060415/asp/jharkhand/story_6100303.asp
- ^ "संग्रहित प्रत". 2015-09-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-10-05 रोजी पाहिले.
- ^ Charak Puja. (2015, August 18). In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 11:38, October 5, 2015, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Charak_Puja&oldid=676648641
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |