नृत्यमुद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नृत्य करीत असताना हाताच्या बोटांचा जो विशिष्ट आकार साधण्यात येतो, त्याला नृत्यमुद्रा अथवा हस्तमुद्रा असे म्हणतात. नृत्यमुद्रेविषयी विचार करीत असता प्रथम सर्वसामान्यपणे मुद्रा म्हणजे काय, मुद्रेला नृत्यात कोणते स्थान दिले जाते तसेच मुद्रेचे जे अन्य प्रतीकात्मक अर्थ संभवू शकतात त्यांविषयी विचार करणे आवश्यक आहे.

मुद्रा[संपादन]

विभिन्न ‘अंगां’द्वारे (शरीराच्या भिन्नभिन्न अवयवांच्या संचालनाद्वारे), विशेषतः हस्त, पाद आणि मुख ह्यांची जी आकृती तयार होते, तिला ‘मुद्रा’ असे म्हणतात. भावाभिव्यक्तीसाठी मानवाने सातत्याने मुद्रेचा आधार घेतला आहे. भाषा हे आंतरिक भाव दर्शविण्याचे उत्कृष्ट साधन मानले जाते पण कधीकधी उत्कट भावाभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी भाषाही असमर्थ ठरते. अशा वेळी कित्येकदा हस्त, पाद, मुख ह्या शरीरावयवांच्या आधारे भाव दर्शविले जातात. त्या दृष्टीने मुद्रा ही एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते. संस्कृतीच्या प्रारंभावस्थेत मनुष्य हा रानटी अवस्थेत वावरत होता, त्याला भाषा अवगत नव्हती, त्यावेळी मुद्रा हीच त्याची संकेतभाषा होती, पुढे काळाच्या ओघात दैनंदिन व्यवहारातील माणसाच्या विशिष्ट हालचालींना म्हणजे मुद्रांना नृत्यात महत्त्वाचे स्थान लाभत गेले.


भावाभिव्यक्ती हा नृत्यकलेचा प्राण आहे आणि या भावाभिव्यक्तीमध्ये मुद्रेचे प्रकटीकरण अत्यंत आवश्यक असते. हाताची बोटे वेगवेगळ्या प्रकारांनी वळवून आणि त्यांना वैशिष्ट्यपूर्ण आकार देऊन अनेकविध आकृतिबंध साधले जातात. हे आकृतिबंध म्हणजेच नृत्यमुद्रा वा हस्तमुद्रा होत. एकूण नृत्याविष्कारात व मुद्रांना असाधारण महत्त्व आहे. नृत्यातून मुद्रा नाहीशा झाल्या, तर ते निर्जिव ठरेल. विविध विशिष्ट मुद्रांद्वारे नृत्यातून अर्थसंकेत दर्शविले जातात, तसेच एखादी मध्यवर्ती कल्पना विशद केली जाते. म्हणून नृत्यात भावाभिव्यक्तीसाठी नर्तक किंवा नर्तकीला हस्तमुद्रेचाच आधार घ्यावा लागतो. इतकेच नव्हे तर, हस्तमुद्रेच्या विनियोगाने नृत्यातील विविध ‘करणां’ना (पोझेस) अधिक सौंदर्य प्राप्त होते.

नृत्यमुद्रांचे स्वरूप[संपादन]

नृत्यमुद्रा ह्या सर्वसाधारणपणे वस्तूंच्या, पक्ष्यांच्या वा प्राण्यांच्या आकारांशी संबंधित असतात. मानवाने नृत्यकलेतदेखील निसर्गाचे व त्यात वावरणाऱ्या विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे तसेच त्यांच्या वेगवेगळ्या अंगसंचालनांचे अनुकरण केले आहे, म्हणूनच हस्तमुद्रांना बरीचशी नावे प्राणिमात्रांचीच दिली गेली आहेत. उदा., सिंहमुख, मृगशीर्ष, सर्पशीर्ष, भ्रमर, मयूर, शुकतुंड, हंसपक्ष इत्यादी.


व्यापक अर्थानुसार मुद्रा ही केवळ हस्तमुद्राच नसते, तर ती मुखमुद्रा, पादमुद्रा व शरीरमुद्रा होऊ शकते. मूर्तिकलेमध्ये प्रतिमामुद्रेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या सांकेतिक मुद्रेने विशिष्ट प्रतिमेचा अर्थबोध होतो. उदा., भगवान बुद्धाची प्रतिमा दर्शविण्यासाठी संकेताने अराल मुद्रा वापरली जाते. तसेच नटराज प्रतिमेतही विशिष्ट सांकेतिक मुद्रांचा वापर होतो. समरांगण सूत्रधाराच्या तीन मुद्राध्यायांमध्ये ६४हस्तमुद्रा, ६ पादमुद्रा व ९ शरीरमुद्रा ह्यांचा उल्लेख आला आहे.

हस्तमुद्रा ह्या हाताने केल्या जाणाऱ्या मुद्रा आहेत, तर पाय ठेवण्याच्या विशिष्ट स्थानकांना ‘पादमुद्रा’ म्हणतात. मुखमुद्रा चेहऱ्यावरचे विशिष्ट भाव दर्शविण्यासाठी वापरल्या जातात. तसेच शरीरमुद्रा ह्या शरीराच्या वेगवेगळ्या स्थानकांनी दर्शवितात. आर्. के. पोदुवलशास्त्रींच्या मुद्राज इन आर्ट ह्या पुस्तकात त्यांनी मुद्रांचे तीन विभागांत वर्गीकरण केले आहे : (१) वैदिक मुद्रा, (२) तांत्रिक मुद्रा व (३) लौकिक मुद्रा.

वैदिक मुद्रा:[संपादन]

वेदपाठ म्हणत असताना आवश्यक त्या हस्तमुद्रांचा वापर परंपरेने केला जातो त्या मुद्रा. ह्यामधील बहुसंख्य मुद्रा ह्या पूजोपचाराशी संबंधित असतात. तसेच ह्या सर्व मुद्रांना धार्मिक आशय असतो. गायत्री मंत्राच्या जपातदेखील मुद्रांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनुभवी गुरूंच्या मुखातून या मुद्रांचे रहस्य समजून येते. ह्या मुद्रांच्या योगे देवतांची कृपा संपादन करता येते.ग्रहादिकांच्या बाधेतून, पापसमुदायापासून मुक्त करणाऱ्या या मुद्रा देवतेगणिक भिन्नभिन्न असतात. गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी ज्या चोवीस मुद्रा केल्या जातात, त्यापुढीलप्रमाणे होत : (१) सुमुख, (२) संपुट, (३) वितत, (४) विस्तृत, (५) द्विमुख, (६) त्रिमुख, (७) चतुर्मुख, (८) पंचमुख, (९) षण्मुख, (१०) अधोमुख, (११) व्यापकांजलिक, (१२)शकट, (१३) यमपाश, (१४) ग्रंथित, (१५) उन्मुखोन्मुख, (१६) प्रलंब, (१७) मुष्टिक, (१८) मत्स्य, (१९) कूर्म, (२०) वराह, (२१) सिंहाक्रांत, (२२) महाक्रांत,(२३) मुदगर, (२४) पल्लव या चोविस मुद्रांपैकी संपुट, चतुर्मुख (चतुर मुद्रा), मुष्टिक, मत्स्य, कूर्म, वराह यांसारख्या मुद्रा मूलतः पूजाविधीसाठी निर्माण झाल्या असल्या, तरी नर्तकांनी नृत्यविष्कारामध्ये त्यांचा वापर करून घेतल्याचे दिसून येते.

तांत्रिक मुद्रा:[संपादन]

ह्या योगशास्त्रात उपयोगात आणतात. तांत्रिक मुद्रेचा स्थायीभाव हा नृत्यमुद्रेच्या स्थायीभावापेक्षा भिन्न असतो. तसेच ह्या सर्व मुद्रा योगी पुरुषांना अभ्यासासाठी अत्यंत जरूरीच्या असतात. तांत्रिक साधनेतील मुद्रांचा उपयोग नर्तक वा नर्तकीला प्रत्यक्षात होत नाही, मात्र ह्या मुद्रांच्या अभ्यासाने कोणत्याही क्षेत्रातील कलावंताला आपली आत्मिक शक्ती अधिक प्रबळ करता येते. ह्या सर्व मुद्रा केवळ हाताच्या बोटांनी केल्या जात नसून, त्यांमध्ये हस्त, पाद, मुख व शरीर ह्या सर्वांचा समावेश असतो. योगशास्त्रातील कल्याण मुद्रांसारख्या मुद्रांचे नृत्यातील अराल मुद्रेशी साधर्म्य दिसून येते. ध्यान करीत असताना योगी तर्जनी व अंगठा हे दोन्ही एकमेकांना भिडवून, मध्यमा, अनामिका व अंगुष्ठ ह्या सरळ ताठ ठेवतो. ही मुद्रा योगाच्या भाषेत कल्याण मुद्रा किंवा ध्यानमुद्रा व नृत्याच्या भाषेत अराल मुद्रा म्हणून ओळखली जाते.

लौकिक मुद्रा:[संपादन]

दैनंदिन व्यवहारातील मुद्रा ह्या सर्व लौकिक मुद्रेत गणल्या जातात. आर. के. पोदुवलशास्त्रींनी तांत्रिक व लौकिक मुद्रा ह्या १०८ सांगितल्या आहेत.

नृत्यमुद्रेचा उगम[संपादन]

नृत्यमुद्रेचा उगम केव्हा, कसा व कोठे झाला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण हे मात्र तितकेच खरे, की माणसाच्या दैनंदिन कृतींमधूनच मुद्रांची निर्मिती झाली. कारण जी मुद्रा आपण नृत्यात वापरतो, ती आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातही वापरतो. उदा., आलपद्म मुद्रा. ही भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतील अत्यंत सुंदर मुद्रा आहे. तिचा विनियोग एखादी वस्तू अर्पण करण्यासाठी अथवा फेकण्यासाठी करतात, ह्या मुद्रेने प्रश्नही विचारला जातो, त्याचप्रमाणे ‘माहीत नाही’ असा भावही दाखविला जातो. व्यवहारात ह्या मुद्रेद्वारा रिंग खेळण्याची वा एखादी वस्तू दुसऱ्याकडे फेकण्याची क्रिया केली जातो. मात्र नृत्यातील मुद्रेला ताल, लय आणि सौंदर्य ह्यांचा आश्रय असतो तसा तो दैनंदिन व्यवहारातील मुद्रेला प्रत्यक्ष नसतो.


जसजशी नृत्यकलेची लोकनृत्याकडून अभिजात नृत्याकडे वाटचाल होत गेली, तसतसे नृत्यमुद्रेतदेखील पुष्कळसे बदल होत गेले. मुद्रेच्या ठेवणीत, आकारात व विनियोगात एक प्रकारची नियमबद्धता आली. मुद्रेच्या आंतरिक भावभाषेला ऋषीमुनींकडून धार्मिक आशय मिळाला. प्रत्येक मुद्रा विशिष्ट अर्थानेच नृत्यात उपयोगात येऊ लागली, प्रत्येक मुद्रेसाठी ठराविक दैवते निश्चित झाली, आकार निश्चित झाला, प्रत्येक मुद्रेचा इतिहास निश्चित झाला, मुद्रांची संख्या निश्चित झाली, भरतमुनिरचित नाट्यशास्त्रात व नंदिकेश्वररचित अभिनयदर्पणात नृत्यातील मुद्रांना आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली. नृत्यमुद्रेच्या विकासात भरतमुनी व नंदिकेश्वर यांचे मुद्रांविषयीचे विवेचन अत्यंत मूलगामी व महत्त्वाचे आहे.

संदर्भ[संपादन]

  1. https://vishwakosh.marathi.gov.in/19790/