तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' ही कवी अरुण काळे लिखित 'नंतर आलेले लोक' काव्यसंग्रहातील कविता आहे. 'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' कविता एकोणिसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरणामुळे बदलत्या अर्थकारण व समाज संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करते; सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण उलथापालथींची नोंद घेते. [१]

कवितेची वैशिष्ट्ये[संपादन]

व्यक्तीबद्दलचा आदरभाव व्यक्त करताना कविता एकसुरी आणि व्यक्तीविशिष्ट होण्याची शक्यता असते, पण येथे सामाजिकता आणि बाबासाहेब यांचे एकात्म दर्शन घडते. मराठी कवितेत आदरपूजक कवितेचे स्वरूप बहुधा भक्त-देव असे भावनिक असते येथे ते वैचारिक आहे. ही कविता एकाचवेळी भावकविता आणि सामाजिक कविता आहे. या कवितेतून कवि अरुण काळे यांच्या अव्वल प्रतिभेचे दर्शन होते.

कवितेतील प्रतिमा[संपादन]

समकालीन वास्तवाच्या कसोटीवर आपल्या महापुरुषांच्या विचारांची उपयुक्तता तपासून, त्यातून त्यांच्या मोठेपणाचा शोध या कवितेत दिसतो. शिवाय कवितेतील काळ आणि वास्तव ज्या आशयाला चित्रित करत आहे त्याला अत्यंत अनुकूल अशी भाषा आणि प्रतिमायोजना कवीने केली आहे. वास्तवानुरूप भाषासर्जन हेच तर नव्वदोत्तरी कवितेचे वैशिष्ट्य आहे. तेही `मदरबोर्ड..`मध्ये दिसते.

कवीने येथे नव्या दलितत्त्वाच्या विषाणूचे सूचन केले आहे; आणि त्याला तोंड देण्याची क्षमता बाबासाहेबांच्या विचारात आहे अन्य महापुरुषांच्या विचारात नाही, असे परखडपणे सांगितले आहे. विचारांची समकालीन उपयुक्तता नसलेल्या महापुरुषांना कवीने ‘एकमेकांच्या प्रकृतीच्या चवकश्या करणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातील सिनियर सिटीझन्सची’ उपमा दिली आहे; तर बाबासाहेबांचे द्रष्टेपण सांगण्यासाठी ‘पोरगं हरवू नये म्हणून पुढे जाऊन उभे राहणाऱ्या बापाची’ उपमा दिली आहे, जी अत्यंत मौलिक आणि नावीन्यपूर्ण आहे.

कवीने बाबासाहेबांच्या असामान्यतेला संगणकीय प्रतिमांनी व्यक्त केले आहे. मदरबोर्ड संगणकाचा आधारस्तंभ असतो. तसे कवीसाठी बाबासाहेबाचे तत्त्वज्ञान आहे. हजारो वर्षांची पारंपरिक मेमरी बाबासाहेबांनी धर्मांतराच्या अपडेट प्रोग्रामने घालवली. संगणकाला अपडेट प्रोग्रॅम नसेल तर तो आउटडेटेड होतो, पण बाबासाहेबांच्या विचारांचे वैशिष्टय असे की, दलितांचे भविष्यातील सामाजिक सॉंफ्टवेअर खराब न होऊ देणारी ॲंन्टी-व्हायरस खबरदारी त्यांच्या विचारात आधीच आहे. त्यामुळे सामाजिक विषमतेचे नवे विषाणू ते मुळातून नष्ट करते, असे कवी म्हणतो.

बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानावर, विचारावर विद्यापीठात संशोधन होतेय, साहित्य संमेलनात चर्चा होतेय, नाटक –सिनेमे तयार होताहेत, शिवाय त्यांच्या विचारांची नव्याने अन्वयार्थ लावून नवी आंदोलने उभी राहताहेत – कवी यालाच ‘बारा हत्तीचं बळ’ म्हणतो.


मल्टीमिडीया या संकल्पनेत शब्द (संहिता), दृश्य- श्राव्य या तिन्हीची प्रभाव क्षमता असते. नुसत्या शब्द वां श्राव्याने तितकी परिणामकारकता साधली जात नाही. बाबासाहेबांनी प्रबोधनासाठी ग्रंथ (संहिता), भाषणे (श्राव्य), आणि मोर्चा आंदोलने (दृश्य) अशी तिन्ही प्रभावी माध्यमे वापरली. त्यामुळे त्यांची प्रभावक्षमता इतरांपेक्षा जास्त ठरली. बाबासाहेबांच्या या अद्वितीय कार्याचा गौरव करताना मल्टीमिडीया ही अत्यंत समर्पक आणि माहितीच्या युगातील प्रतिमा वापरली आहे.

कविता काय साधते[संपादन]

या संग्रहात इतरत्र `ही माझी चळवळ झालीय अ. भा. चिडीमार संघटना `/`कुणाच्या मागे चाललंय बौद्धिक नेतृत्व/ रातोरात क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्यांना/ सकाळी व्हावं लागतं हास्यास्पद ` असे म्हणून दलितांच्या दूरवस्थेला स्वार्थी नेते, ध्येयापासून दूर गेलेल्या चळवळी आणि जागतिकीकरण कसे जबाबदार आहे ते सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे असामान्यपण लक्षात येते.

बाबासाहेबांचे मोठेपण सांगत असतानाच कवीने आंबेडकरवादी चळवळीपुढील आव्हाने आणि सामाजिक स्थितीही सांगितली आहे. ज्या बदलांसाठी तू खपलास ते अजून झाले नाहीत पूर्णपणे असे म्हणून आंबेडकरी चळवळीचे अपयशही सांगितले आहे. त्यांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही ही मूल्ये व स्थिती अजूनही समाजात रुजली नाहीत याची खंतही कवी व्यक्त करतो.

एकोणिसशे नव्वदनंतरची मराठी कविता अनेक अर्थाने वेगळी आहे. जागतिकीकरणामुळे अर्थकारण व समाज संस्कृतीचे स्वरूप बदलले आहे. पर्यायाने सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही प्रचंड उलथापालथ होत आहे. या परिस्थितीत बदललेल्या राजकीय सामाजिक मूल्यव्यवस्थेवर प्रहार करणे आणि काळानुरूप टिकणाऱ्या, नव्या समस्यांना उत्तर ठरू पाहणाऱ्या तत्त्वज्ञानाचे मह्ती सांगणे हे द्रष्ट्या प्रतिभावंताचे काम असते. हेच अरुण काळेंच्या या कवितेने केले आहे.

ही कविता डॉं. बाबासाहेब आंबेडकरांवरील कविता आहे; पण भाबडी स्तुती किंवा भावनावश उदगार ती काढत नाही. बाबासाहेबांचे असामान्यपण, इतर महापुरुषांपेक्षा त्यांचे वेगळेपण, त्यांच्या विचारांची कालातीतता, माहितीच्या युगात झालेली दलितांची विपरीत स्थिती आणि आजची राजकीय संस्कृती यांवर ती भाष्य करते.

शिवाय माणसाला वस्तू म्हणून उभं केलं जातंय` म्हणत जागतिकीकरणात सामान्य माणसाचे काय झाले, लोककल्याणकारी राज्य संकल्पना मोडीत काढणारयांच्या हातात आयटीचे तंत्रज्ञान कसे आलेय, हा धोकाही सांगितला आहे.

काव्यसंग्रह[संपादन]

  • नंतर आलेले लोक, लोकवाङमय गृह, १९९०
  • सायरनचे शहर,लोकवाङमय गृह,



संदर्भ[संपादन]

  1. ^ आंबेडकरी संवेदनशीलता आणि अरुण काळेंचा `मदरबोर्ड..प्रा. देवानंद सोनटक्के,` पूर्वप्रसिद्धी : सर्वधारा, त्रैमासिक,संपा. सुखदेव ढाणके जुलै ते सप्टें 2012 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जि. सोलापूर.