चिलिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आधुनिक ओडिया काव्याचे प्रवर्तक ⇨राधानाथ राय (१८४८–१९०८) यांच्या एका खंडकाव्याचे चिलिका  हे नाव असून पुस्तकरूपाने ते १८९२ मध्ये प्रसिद्ध झाले. पुरी व गंजाम जिल्ह्यांतील किनारी प्रदेशात असलेल्या चिलिका (चिल्का) सरोवराचे सौंदर्य त्यांनी त्यात वर्णिले आहे. निसर्गसौंदर्याचे वेड असलेल्या ह्या कवीने भारताच्या व ओरिसाच्या सर्व भागात भ्रमण केले तथापि या सरोवराच्या ठिकाणीच त्यांना प्रियकराच्या उत्कटतेने निसर्गाशी एकरूपता साधल्याचा अनुभव आला.

चिलिकात  कवीचे जीवनविषयक तत्त्वज्ञान तसेच गहिरा निराशावाद व ज्वलंत देशभक्ती यांचा खराखुरा व कलात्मक आविष्कार झाला. त्यांचे हे काव्य म्हणजे असामान्य प्रतिभेच्या कवीने निसर्गाला उद्देशून लिहिलेली आदर्श उद्देशिकाच होय. पारंपरिक खंडकाव्याच्या तंत्रमंत्राचा त्यात अभाव असला, तरीही ते एक उत्कृष्ट खंडकाव्य मानले जाते. चिलिकातील  निसर्गच ह्या काव्याची नायिका असून त्यातील विविध कथांच्या केंद्रस्थानीही ह्या निसर्गाचेच नायिका म्हणून दर्शन घडते. राधानाथांची शैली अकृत्रिम, साधी, सरळ, आणि हृदयाचा ठाव घेणारी आहे. अमूर्त भावनांची स्वाभाविक व सहजसुंदर अभिव्यक्ती हा त्यांचा विशेष होय.

राधानाथांचा पिंडच मुळी निसर्गावर विशुद्ध आणि उत्कट प्रेम करणाऱ्याचा होता. त्यांच्या वृत्तीतील ह्या गुणविशेषामुळेच ओडिया काव्याला खरीखुरी नवता प्राप्त झाली. त्यांच्या ह्या विशुद्ध निसर्गप्रेमाला महान आध्यात्मिक मूल्य प्राप्त झाले. राधानाथ हे निःसंशयपणे ओडियातील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी होत.

चिलिकांचा आदर्श समोर ठेवून अनेक ओडिया कवींनी आपली निसर्गकाव्ये लिहिण्याचा व त्यांद्वारे मातृभूमीचे गुणगान करण्याचा प्रयत्न केला. साहित्य अकादेमीने सर्व आधुनिक भारतीय भाषांत अनुवाद करण्यासाठी राधानाथांच्या चिलिकाची निवड केला आहे.