चर्चा:रामचंद्र गणेश बोरवणकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सार्वजनिक काका, वासुदेव बळवंत फडके, देवी अहिल्याबाई होळकर, इत्यादि चरित्रें, व्यावहारिक संस्कृत व्याकरण, व 'रघुवंश','मेघदूत' इत्यादि काव्यांच्या सार्थसटीप पुस्तकांचे कर्ते असा श्री. रामचंद्र गणेश बोरवणकर ह्यांचा थोडक्यात परिचय करून देता येईल.

बोरवणकरांनी 'रघुवंश', 'मेघदूत', 'मित्रलाभ' ही संस्कृत वाङ्मयावर आधारित पुस्तके लिहिली ह्यात चित्रशाळा प्रकाशनाचा मोलाचा वाटा आहे. रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर ह्यांनी ह्या पुस्तकांचे संपादन केलेले आहे. 'रघुवंश' व 'मेघदूत' ह्यांच्या भाषांतराकरिता बोरवणकरांनी मल्लिनाथ सूरीच्या 'संजीवनी' टीकेचा आधार घेतला आहे. असे असता, त्यांचे भाषांतर हे मल्लिनाथी टीकेचा मराठी अनुवाद नसून ते स्वतंत्र प्रज्ञेने लिहिलेले आहे. मतभेदाच्या सर्व जागा ते स्पष्टपणे दर्शवितात. तसेच कालिदासावर केवळ स्तुतिसुमने न उधळता त्याच्या काव्यांत आढळणाऱ्या दोषांवरही ते परखडपणे भाष्य करतात.

१९३५ साली लिहिलेल्या 'मेघदूत'च्या प्रस्तावनेत ते स्वतःचा पत्ता 'गणेश लॉज, ठाणे' असा देतात. बोरवणकरांचा संस्कृत भाषेचा व्यासंग होता हे त्यांच्या पुस्तकांवरून दिसून येते. असे 'अभ्यस्त' असूनसुद्धा ते प्रस्तावनेत स्वतःला 'अनभ्यस्त' असे म्हणतात. तसेच अनेकदा प्रसतावनेच्या खाली ते स्वतःचे नाव न लिहिता 'भाषांतरकर्ता' असे लिहितात. म्हणजे मुखपृष्ठ वगळल्यास लेखकाच्या नावाचा कुठेही उल्लेख होत नाही हे विशेष!

बोरवणकरांचे २२ मार्च १९५१ रोजी निधन झाले. त्यांच्या अाकस्मिक निधनामुळे 'व्यावहारिक संस्कृत व्याकरण'ची प्रस्तावना श्री. नरहर मोरेश्वर जोशी ह्यांनी लिहिलेली आहे. ती वाचताना ह्या पुस्तकाच्या निर्मितीमागे अनेकांचे अथक परिश्रम आहेत हे समझते. असे असता पुस्तकाचे लेखक म्हणून फक्त बोरवणकरांचेच नाव देण्यात आले आहे ह्यावरून त्या सर्वांची निःस्वार्थी बुद्धी तसेच बोरवणकरांविषयीचा पराकोटीचा आदर व प्रेमभाव दिसून येतात.

बोरवणकरांच्या काही पुस्तकांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे अाहे.

१. महाकवि श्रीकालिदासविरचित रघुवंश, चित्रशाळा प्रकाशन, पुणे २, प्रथमावृत्ति १९३४.

भाषान्तरकार - रामचंद्र गणेश बोरवणकर

संपादक - रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर

या ग्रंथाचे पुढीलप्रमाणे चार भाग करण्यात अाले अाहेत

भाग पहिला : सर्ग एक ते पांच : पृष्ठसंख्या २५२

भाग दुसरा : सर्ग सहा ते नऊ : पृष्ठसंख्या २३२

भाग तिसरा : सर्ग दहा ते तेरा : पृष्ठसंख्या २१२

भाग चौथा : सर्ग चौदा ते एकोणीस : पृष्ठसंख्य़ा ३००

प्रकाशकाने लिहिलेली प्रस्तावना :

``महाकवि कालिदासाच्या जगद्विख्यात काव्याचे एकूण चार निरनिराळ्या भागांत अाम्ही प्रकाशन केले अाहे. प्रत्येक सर्गातील मूळ श्लोक त्यावरील मल्लिनाथाची टीका, मराठी अन्वयार्थ, सरलार्थ, टीपा, संस्कृत टीप्पणी वगैरे माहिती देण्यात अाली असून प्रत्येक सर्गाला रसग्रहणात्मक एक छोटासा उपसंहार जोडण्यात अालेला अाहे. तसेच शेवटच्या चौथ्या भागात सुमारे पन्नास पानांचा एक दीर्घ उपसंहार जोडला असून त्यांत कालिदासाचे थोडक्यात चरित्र सांगून सबंध काव्याचे मार्मिक रसग्रहण करण्यात अालेले अाहे. भाषान्तरकार कै. रामचंद्र गणेश बोरवणकर व संपादक कै. रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर यांचा संस्कृत वाङ्मयाचा थोर व्यासंग असून या अशा कामावरील त्यांचा अधिकारहि फार मोठा होता. त्यामुळे हे सर्व भाग या काव्याच्या अभ्यासकास अत्यंत उपयुक्त होतील यांत शंका नाही.

पुस्तकाचे शेवटचे वाक्य अात्मकथनपर अाहे. बोरवणकर लिहितात,``शेवटी प्रतिकूल परिस्थितीच्या प्रचंड झंझावाताच्या तडाक्यात सापडल्यामुळे उद्विग्न झालेल्या मनांत डोकावणाऱ्या अात्महत्येसारख्या विचारांना अडवून धरण्यासाठी सुरु केलेल्या कार्याची ह्या स्वरुपातील परिणति ज्या श्रीगजाननाच्या कृपेने झाली, त्याच्याच चरणी पुन्हा एकदा विनम्र होऊन समाप्त म्हणतो.

२. महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत', चित्रशाळा प्रकाशन, पुणे २, प्रथमावृत्ति १९३५, द्वितीयावृत्ति एप्रिल १९५८.

भाषान्तरकार - रामचंद्र गणेश बोरवणकर

संपादक - रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर

मुद्रक व प्रकाशक - दामोदर त्र्यंबक जोशी, बी.ए.(टिळक), व्यवस्थापक, चित्रशाळा प्रेस.

भाषांतरकर्त्याचे दोन शब्द :

``चित्रशाळेच्या उत्साही चालकांच्या धाडसामुळे अामचे 'रघुवंशा'चे मराठी भाषांतर प्रकाशात अाले. चित्रशाळेच्या चालकांच्या ह्या सद्गुणाचा अापणाला फायदा कसा करून घेता येईल ह्या विचारात अाम्ही असताच, मेघदूताचे भाषांतर करून देण्याविषयीचे त्यांचे पत्र अाम्हास अाले व त्याचे फळ म्हणजेच प्रस्तुतचा ग्रंथ होय. मेघदूताचे भाषांतर रघुवंशाच्या भाषांतराच्या धर्तीवरच केले अाहे. ग्रंथ सर्वांगपरिपूर्ण व्हावा अशा दृष्टीने शक्य ती काळजी घेतली अाहे. तथापि मनुष्यप्राणी प्रमादशील असल्यामुळे त्याच्या हातून चुका होणे साहजिक अाहे. अाणि अामच्यासारख्या अनभ्यस्ताच्या हातून त्या होणे हे तर सुतराम् साहजिक आहे. हे लक्षात धेऊन हंस-क्षीरन्यायाने वाचकांनी ह्या ग्रंथाचा परामर्श घ्यावा अशी विनंती अाहे. ग्रंथातील दोषस्थळे वाचकांनी कृपा करून नजरेस अाणून दिल्यास व दुसरी अावृत्ति पाहण्याचे भाग्य ह्या ग्रंथास लाभल्यास, त्या वेळी योग्य ती दुरुस्ती करता येईल. शेवटी चित्रशाळेच्या चालकांनी हा ग्रंथ अामचेकडून लिहवून घेतल्याबद्दल त्यांचे अाभार मानून त्यांना व वाचकांना अशीच अामच्यापासून अाणखी सेवा घ्या, अशी विनंती करून हे दोन शब्द संपवतो.

संपादकीय निवेदन :

``महाकवि श्रीकालिदास यांची जी उत्तमोत्तम काव्यरत्ने प्रसिद्ध अाहेत त्यांत मेघदूत हे काव्य कोहिनूर हिऱ्याप्रमाणे शोभणारे अाहे. अक्षरांनी लहान, अर्थगांभीर्याने मोठे व रसपरिपोषामुळे रम्य अशा तऱ्हेचे फक्त एकच काव्य महाकवि कालिदास लिहिता तरी त्यांची कीर्ति अजरामर झाल्यावांचून राहिली नसती. या काव्यास खंडकाव्य असे काही साहित्यकोविद म्हणतात, तर दण्डी वगैरे काही साहित्यशास्रकार मेघदूत हे देखील एक महाकाव्य अाहे असे अभिमानाने सांगतात. या काव्याचे थोडक्यात कथासूत्र पुढीलप्रमाणे अाहे.

अापल्या पत्नीच्या नादाने अापल्या अधिकारात - नेमून दिलेल्या कामात, गाफीलपणाने वागणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. बरेच वेळा यक्ष राजाने त्याला सावधगिरीचा इषारा देऊनहि त्याच्या वर्तनात सुधारणा होण्याचे लक्षण दिसेना, तेव्हा त्याला एक वर्ष विरहावस्थेत हद्दपारीची शिक्षा फर्माविण्यात अाली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरि' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने झाल्यावर कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतु प्राप्त झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्त्या एकदम उचंबळून अाल्या. त्यामुळे त्यास चेतन व अचेतन याचेही भान त्या निर्जन प्रदेशात राहिले नाही. त्याने मेघालाच दूत कल्पून अापल्या पत्नीला निरोप सांगण्याचे काम त्याजवर सोपविले. प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणाऱ्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन सांग म्हणून मेघाची अलका नगरीकडे यक्षाने रवानगी केली. अाणि येथेच या काव्याची परिसमाप्ति करण्यात अाली अाहे.

हे कथासूत्र महाकवि कालिदासाला रामायणातील रामचंद्राने सीतेला उद्देशून हनुमंताबरोबर पाठविलेल्या संदेशावरून सुचले असे विद्वानांचे मत अाहे व या काव्यातील अंतर्गत पुराव्यावरूनही हीच गोष्ट निश्चित होते.

अशा तऱ्हेचे मेघदूत कालिदासाचे परीक्षार्थी विद्यार्थी व संस्कृतानभिज्ञ इतर महाराष्ट्रीय रसिक याचेसाठी मुद्दाम रघुवंशाप्रमाणे सार्थ-सटीक स्वरूपात छापण्यात अाले आहे. तरी त्याचे चीज वाचकमहाशय करतील असा अाम्हाला दृढ भरंवसा आहे.

३. सार्थ हितोपदेश [मूळ श्लोक, अन्वय, अन्वयार्थ, सरलार्थ, टीपा, संपादकीय पादटीपा, श्लोकसूची यांसह] भाग पहिला - मित्रलाभ, चित्रशाळा प्रकाशन, पुणे २, प्रथमावृत्ति ??, द्वितीयावृत्ति जानेवारी १९५६, किंमत अडीज रूपये.

भाषान्तरकार - रामचंद्र गणेश बोरवणकर

संपादक - रामचंद्रशास्त्री किञ्जवडेकर

मुद्रक व प्रकाशक - दामोदर त्र्यंबक जोशी, बी.ए.(टिळक), व्यवस्थापक, चित्रशाळा प्रेस.

भाषांतरकर्त्याचे दोन शब्द :

``मेघदूताच्या भाषांतराप्रमाणे, हितोपदेशांतील पहिल्या 'मित्रलाभ' नावाच्या प्रकरणाचे प्रस्तुत भाषांतर चित्रशाळेच्या चालकांच्या सांगण्यावरून केले अाहे. रघुवंशाचे भाषांतर व मेघदूताचे भाषांतर ही दोन्ही प्रौढ विद्यार्थ्यांच्या व ज्यांना संस्कृतभाषा येत नसून संस्कृत ग्रंथांची गोडी चाखायची उत्कट इच्छा अाहे अशा लोकांच्या उपयोगाच्या दृष्टीने केली होती. प्रस्तुत हितोपदेशांतील 'मित्रलाभ' प्रकरणाचे भाषांतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपयोगाच्या दृष्टीने केले अाहे. म्हणून त्यांत समास, क्रियापदाची रूपे वगैरे सर्व स्पष्ट करून दाखविण्याचा प्रयत्न केला अाहे. भाषांतराला भाषेच्या दृष्टीने सरळपणा यावा म्हणून कोठे कोठे मूळ भाषांतराच्या पुढे (-) खूण करून घातली अाहे. तसेच अर्थबोध सरळ होण्यासाठी काही ठीकाणी 'पदरमोड' करावी लागली अाहे. ती चौकोनी कंसांत दर्शविली अाहे. ह्या भाषांतरपद्धतीत अाणखी काही अावश्यक अशा सुधारणा कोणास सुचवाव्याशा वाटल्या तर त्या त्यांनी भाषांतरकर्त्यास अगर प्रकाशकास कळवाव्या म्हणजे पुढील प्रकरणांची भाषांतरे करण्याचा योग अाल्यास त्या वेळी त्यांचा विचार करता येईल.

संपादकीय निवेदन :

श्रुतो हितोपदेशोयं पाटवं संस्कृतोक्तिषु। वाचां सर्वत्र वैचित्र्यं नीतिविद्यां ददाति च।।

``पण्डित विष्णुशर्म्याचा हितोपदेश हे संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बालपुस्तक अाहे. या पुसातकात बालमनाला रुचतील असाच पशुपक्षांच्या मनोरंजक कथा सोप्या संस्कृत भाषेत लिहिलेल्या अाहेत. शिवाय मधून मधून प्रसंगानुरोधाने उत्तमोत्तम सुभाषितांची पेरणी केली अाहे ती निराळीच. या ग्रंथाच्या अध्ययनाने - (१) संस्कृत भाषेत प्राविण्य (२) वाक्पटुता (३) व्यवहारचातुर्य या तीन गोष्टींचा लाभ अतिमन्दबुद्धीच्या विद्यार्थ्यांनाहि होईल. मग जे कुशाग्रबुद्धीचे विद्यार्थी या ग्रन्थाचा अभ्यास करतील ते किती प्रवीण होतील हे काही सांगावयास नको अशी या ग्रंथकर्त्याची प्रतिज्ञा अाहे. त्या ह्या हितोपदेश ग्रन्थाचा लाभ महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हावा, त्यांच्या संस्कृत अभ्यासास मदत व्हावी, अाणि त्यांच्या अंगी व्यवहारचातुर्य बाणावे, या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात अाले अाहे. यांत मूळ अन्वय, अन्वयार्थ, सरलार्थ, टीपा व संपादकीय पादटीपा इतक्या अङ्गांचा समावेश केला अाहे.

ही अावृत्ति मुख्यतः विद्यार्थ्यांसाठीच असल्यामुळे संविधानकास धक्का न लावता मुळांतील अश्लील भागास कात्री लावली अाहे. तसेच इतर मूळग्रन्थासहि योग्य तो संस्कार अाम्ही केला अाहे. त्यामुळे अाता ही अावृत्ति सर्वसंग्राह्य झाली अाहे.

ह्या प्रयत्नास शाळाधिकारी, शिक्षक, पालक, प्रौढ विद्यार्थी, वगैरेंनी उत्तेजन दिल्यास पुढील भाग प्रसिद्ध करण्यास उत्तेजन येईल असे सांगून हे दोन शब्द संपवितो.

४. व्यावहारिक संस्कृत व्याकरण, हिंद प्रकाशन, गिरगाव, मुंबई ४, १९५१.

लेखक - रामचंद्र गणेश बोरवणकर

प्रकाशकांचे निवेदन (नरहर मोरेश्वर जोशी ह्यांनी लिहिलेले) :

``सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वी हे 'व्यावहारिक संस्कृत व्याकरण' छापून प्रसिद्ध करण्याची जबाबदारी एक राष्ट्रकार्य म्हणून अाम्ही स्वीकारली. संस्कृतभाषेबद्दल औपचारिक रीत्या आदर बाळगणारी असंख्य मंडळी आहेत. दुय्यमशिक्षणसंस्था व महाविद्यालये यांत संस्कृतभाषेला मानाचे स्थान आहे. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना वैदिक किंवा अार्यसंस्कृतीबद्दल आदर आहे. सर्वमान्य असे प्रातिनिधिक ग्रंथ याच भाषेत आहेत. परकीय देशातही या भाषेला मानाचे स्थान आहे. अनेक पाश्चात्य विद्वानांनी या भाषेचा सखोल अभ्यास केलेला अाहे. आमच्यांतील या भाषेचे अभ्यासू पाश्चात्य देशात संस्कृतच्या उच्च पदवीसाठी अध्ययनाला जातात. आमच्या देशातही अनेक शास्त्री पंडित या भाषेच्या मूलग्राही अध्ययनाने विद्वन्मान्य असे मानले जातात. अशा भाषेची पाणिनीची अष्टाध्यायी किंवा सिद्धांत कौमुदीसारखी प्रमाणाभूत पुस्तके संस्कृतमध्ये अाहेत. अाधुनिक शिक्षणाचा प्रसार आमच्या देशात गेल्या शंभर वर्षांपूर्वीपासून सुरू असून त्या अभ्यासक्रमांत संस्कृताला महत्त्वाचे स्थान आहे. पण या शंभर वर्षांच्या काळांत माध्यमिक शिक्षणसंस्था व उच्च महाविद्यालये यांत या भाषेचा अभ्यास इंग्रजी माध्यमाच्याद्वारे होत असे. आणि त्याच दृष्टीने या भाषेचे सविस्तर व्याकरण कै. मोरेश्वर रामचंद्र काळे या विद्वान् गृहस्थांनी इंग्रजीतून लिहिले. या गोष्टीला जवळ जवळ साठ वर्षे होत आली आहेत. या दरम्यानच्या काळांत शालोपयोगी अशी या भाषेची अनेक पाठ्यपुस्तके अनेकांनी तयार केली अाणि ती रूढही झाली. कै. डॉ. भांडारकर, श्री. डी. के. राजगुरु, श्री. एन्. आर्. रानडे, श्री. ओक व मोडक हे शिक्षकद्वय, मध्यप्रांतातील श्री. नेने, प्रा. वाटवे, श्री. एस्. अार. भट, श्री. के. बी. वीरकर वगैरे अनेक व्यासंगी विद्वानांनी अशी पाठ्यपुस्तके इंग्रजीतून व थोडी मराठीतूनही लिहिली. गेल्या दहावीस वर्षांत मातृभाषेतून शिक्षण देणे हितावह आहे हे तत्त्व स्वीकारले गेल्यापासून या भाषेची क्रमिक पुस्तके मराठीतून बरीचशी तयार झाली. माध्यमिक शिक्षणसंस्थांतून मातृभाषेचे माध्यम स्वीकारण्यात अाले तरी महाविद्यालयांत या भाषेचा अभ्यास इंग्रजी माध्यमातूनच या क्षणापर्यंत चालू अाहे. या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासाला मदत म्हणून पुष्कळांनी सहाय्यक पुस्तके लिहिली आहेत. संस्कृत अभिजात वाङ्मयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना स्वावलंबनाने सुलभपणे करता यावा म्हणून कै. प्रो. शिवराम महादेव परांजपे, कै. नंदरगीकर शास्त्री, प्रा. पां. वा. काणे, कै. प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर, प्रा. आर. डी. करमरकर यांसारख्या व या सर्वां पूर्वीच्या नामांकित विद्वानांनी सविस्तर उपोद्धात टीपा, इंग्रजी भाषांतर इत्यादीनी भूषविलेली कालिदास, भवभूति, श्रीहर्ष, माघ, भास, बाणभट्ट इत्यादी थोर थोर कवींची असंख्य पुस्तके प्रसिद्ध केली. कै. मोरेश्वर रामचंद्र काळे यांनीही वरील सारख्या कवींची असंख्य पुस्तके टीपाभाषांतरादि विपुल साधनांनी सजविलेली महाविद्यालयीन संस्कृत विद्यार्थ्यांकरिता अविश्रांत श्रम घेऊन प्रसिद्ध काले.

परंतु आपल्या स्वराज्यात मातृभाषेतून शिक्षण देण्याची प्रथा सर्वत्र सुरू झाली असल्याने बऱ्याच एतद्देशीय भाषांच्या जननीचे प्रारंभापासून तो उच्चश्रेणीपर्यंत अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे उपयोगी पडणारे संस्कृत व्याकरण मराठीत नव्हते. कै. मो. रा. काळे यांच्या 'Higher Sanskrit Grammar' च्या धर्तीचे मोठे व्याकरण मराठीतून प्रसिद्ध होण्याची अत्यंत अावश्यकता होती. या पुस्तकाचे लेखक श्री. बोरवणकर यांनी फावल्या वेळांत हा विषय अापल्या मुलांना शिकवीत असतांना या पुस्तकाची रचना आणि लेखन केले. श्री. बोरवणकर यांचा या भाषेचा अभ्यास आणि व्यासंग कौतुकास्पद होता. त्यांनी सार्वजनिक काका, वासुदेव बळवंत फडके यांच्या सारख्यांची चरित्रे लिहून जशी प्रसिद्धी मिळविली तसेच कालिदासाचा रघुवंश, मेघदूत, बाणभट्टाची कादंबरी या पुस्तकांच्या सटीप भाषांतरित आवृत्त्या मराठीत लिहिल्या अाहेत. रघुवंश आणि मेघदूत ही त्यांची पुस्तके तर फारच लोकप्रिय झाली अाहेत. कै. मो. रा. काळे यांच्या 'Higher Sanskrit Grammar' चे हे पुस्तक म्हणजे बऱ्याच अंशी रूपांतर होय. संस्कृत व्याकरण हा विषय बराचसा शास्त्रीय असल्याने मराठीतून हे पुस्तक रूपांतरित करणे ही साधीसुधी गोष्ट नव्हे. लेखकाला व्याकरणाच्या शास्त्रीय परिभाषेचे उत्तम ज्ञान पाहिजे. श्री. बोरवणकर यांचा हे पुस्तक लिहण्याचा प्रयत्न या दृष्टीने फारच महत्त्वचा अाणि उपयुक्त असून विद्यार्थी व विद्वान् व्यासंगी यांना या पुस्तकापासून चांगले सहाय्य होईल.

अनेक पाठ्यपुस्तकांतून माहिती गोळा करून या पुस्तकाची मुद्रणप्रत तयार करीत असताना, आम्ही ठिकठिकाणी आमच्या कल्पनेनुसार त्यांत पुष्कळशी भर घातली आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात अ, आ, च्या क्रमाने शेकडो महत्त्वाच्या संस्कृत धातूंची जी विविध रूपे दिली आहेत ती खऱ्या अभ्यासकांना उत्कृष्ट मार्गदर्शन करतील. अशा तऱ्हेची विविध रूपे देण्याची कल्पना मुळात आमची नव्हे. सुमारे साठवर्षांपूर्वी कै. कृष्णाजी गोविंद ओक या थोर संस्कृत शिक्षकांनी 'A Companion to Sanskrit Grammar' या नावांचे बहुमोल पुस्तक लिहून संस्कृतच्या विद्यार्थ्यांवर अनंत उपकार केले आहेत. आज ते पुस्तक दुर्मिळ आहे. ज्या संस्कृतच्या अभ्यासकांसाठी त्यांनी ते पुस्तक लिहिले त्यांच्यासाठी त्या दुर्मिळ पुस्तकांतील महत्त्वाचा धातुरूप कोशाचा भाग, त्यात आवश्यक ती भर घालून, आम्ही या पुस्तकांत उधृत करून दिलेला आहे. कै. कृष्णाजी गोविंद ओक या थोर शिक्षकाची ओळख अलीकडच्या विद्यार्थ्यांना असणे शक्य नाही. आम्ही या ठिकाणी त्यांचा उल्लेख मोठ्या आदराने करून त्यांच्या अामच्यासारख्या अभ्यासकाच्यावरील ऋणाची कृतज्ञतापूर्वक नोंद येथे करीत आहे. श्री. गांधी यांनी फार पूर्वी संस्कृत भाषेतील क्रियापदांचा धातुरूप कोश प्रसिद्ध केला होता. श्री. निजसुरे, डॉ. आळेकर व इतर गृहस्थांनी विद्यार्थ्यांना उपयोगी अशी संस्कृत धातुरूप कोशाची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. संस्कृत भाषेच्या अभ्यासकांना ती निःसंशय उपयुक्त आहेत. तथापि कै. ओकांची त्यांच्या 'A Companion to Sanskrit Grammar' या वर उल्लेखिलेल्या पुस्तकांतील धातुरूपकोशाची कल्पना आमच्या मते निश्चित अभिनव व अधिक उपयुक्त आहे. आमच्या सुदैवाने आम्हाला ती प्रत उपलब्ध झाल्याने संस्कृतच्या सर्व भावी विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी आम्ही त्यांच्या त्या पुस्तकांतील या भागाचा येथे सढळपणे उपयोग केलेला आहे.

``नाटकांत नाटक शाकुंतल असे म्हणतात. संस्कृतपाठ्य पुस्तकांत डॉ. भांडारकरांच्या दोन संस्कृत पुस्तकांचे स्थान एकमेवाद्वितीयम् असे अढळ आहे. कै. मो. रा. काळे यांच्या 'Higher Sanskrit Grammar' चीही तशीच गोष्ट आहे. कै. डॉ. भांडारकर यांच्या दोन पाठ्यपुस्तकांप्रमाणेच कै. प्रि. वामन शिवराम अापटे यांच्या 'संस्कृत गाईड' चीही तशीच स्थिती आहे. ही किंवा तत्सम इतर पुस्तके यांचे संस्कृत वाग्मन्दिरांतील स्थानमाहात्म्य कायम राखून मराठी माध्यमांत आमच्या या पुस्तकाला आवश्यक त्या महत्त्वाचे स्थान अभ्यासकांकडून मिळावे अशीच आमची इच्छा अाहे.

श्री. बोरवणकरांनी दोन अडीच वर्षांपूर्वी छापून प्रसिद्ध करण्यासाठी योग्य अटींवर सर्व प्रकारचे हक्क अाम्हाला देऊन हे पुस्तक आमच्या स्वाधीन केले. पण अामच्या अत्यंत मर्यादित साधनांमुळे हे पुस्तक प्रसिद्ध करण्याला इतके दिवस लागले. श्री. ढवळे यांच्यासारख्या थोर प्रकशकांचा लाभ या पुस्तकाच्या छपाईला अाणि प्रकशनाला मिळाला असता तर फार चांगली गोष्ट झाली असती पण जीवनात योगायोगालाही विलक्षण महत्त्व आहेच. ता. २२ मार्च १९५१ या दिवशी, त्यापूर्वीच या पुस्तकाच्या छपाईचे काम संपल्याने, आम्ही ती गोष्ट श्री. बोरवणकरांना सांगण्यासाठी दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांच्या आॉफिसात गेलो. पुस्तक छपाईचे व प्रकाशनाचे काम प्रदीर्घ लांबणीवर पडल्यामुळे श्री. बोरवणकरांचा आमच्यावर प्रेमाचाच पण थोडासा राग होता. तथापि 'Better late than never' या म्हणीनुसार त्या थोर गृहस्थांनी आमच्या झालेल्या कामाबद्दल आमचे कौतुक केले व त्या पुस्तकासाठी मागितलेल्या प्रस्तावनेचे आश्वासन, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंतचे, घेऊन आम्ही परतलो. योगायोग विचित्र असा की, त्यानंतर अर्धा तास झाला असेल नसेल, बोरवणकरांना अंतकाळची मूर्च्छा आली. रक्तदाब अाणि पक्षघात हे त्यांचे विकार बळावले आणि त्यातच ते कैलासवासी झाले. हे विकार आणि वार्धक्य यांच्यामुळे व 'मरणं प्रकृतिः शरीरिणां' या कालिदासोक्तीनुसार सर्वच मानवांप्रमाणे त्यांचे मरण जरी अनपेक्षित नव्हते तरी आमच्या हातून पूर्ण झालेले पुस्तक पाहिल्यानंतर प्रस्तावना लिहिण्याइतकी फुरसत परमेश्वराने न देता अाम्हाला दिङ्मूढ अवस्थेत लोटून आमच्यातून त्यांना नेले हाही एक योगायोगच. त्यातल्या त्यात बोरवणकरांच्या आत्म्याला मरणप्राय मूर्च्छा येण्यापूर्वी अर्धा तास, संपूर्णपणे छापून झालेले आपले पुस्तक पाहाण्याचा योग त्या जगन्नियंत्याने आणून दिला हीही एक विलक्षण योगायोगाचीच गोष्ट आहे.

संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे हे मोठे पुस्तक मराठीत पहिलेच असावे अशी अमची समजूत आहे. कै. मोरा केशव दामले यांचे मराठीच्या सविस्तर व्याकरणाचे पुस्तक जसे ह्या क्षणापर्यंत एकमेव आहे तसाच काहीसा प्रकार, आमच्या अल्पमतीनुसार, अाम्ही प्रसिद्ध करत असलेल्या या संस्कृत व्याकरणाचा आहे. यांतील निम्याहून अधिक मचकुराची भर जरी आम्ही त्यात घातली असली तरी श्री.(आता कैलासवासी!) बोरवणकरांच्या मुळ प्रयत्नामुळेच अाम्हाला ते शक्य झाले अाणि म्हणूनच आम्ही एकमेव त्यांचेच नाव या पुस्तकचे लेखक म्हणून मोठ्या औचित्याने कायम ठेविले आहे.

संस्कृत भाषेचे हे व्याकरण आम्ही ज्या परिस्थितीत व ज्या तुटपुंज्या भांडवलाच्या व साधनांच्या सहाय्याने प्रसिद्ध करीत आहो त्यांचा विचार केला असता या पुस्तकात राहून गेलेले दोष व अशुद्धे आश्चर्यकारक वाटणारी नाहीत. ती नसायला पाहिजे होती अशीच आमची इच्छा व प्रयत्न होता. असल्या पुस्तकांच्या अावृत्त्या वारंवार निघत नसतात. ही पुस्तके पिढ्यापिढ्यांतून एखाद्या वेळीच प्रसिद्ध होत असतात. तेव्हा मराठीतून या पुस्तकाची अावृत्ति पुन्हा लवकर निघाली नाही तरी हिंदी भाषेतून ती शक्य तितकी निर्दोष काढण्याचा आमचा विचार आहे. संयुक्त भारतातील सर्व प्रांतांतून या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचा प्रसार अप्रतिहत होण्याची शक्यता आहे. आमच्या प्रांताबाहेरील भारताच्या इतर प्रांतांत आमच्या हा पुस्तकासारखे पुस्तक आसण्याचाही संभव आहे. आमच्या माहितीत मात्र ते नाही.

अशाप्रकारचे पुस्तक तयार करण्याला योग्य असे प्रा. ह. दा. वेलणकरांसारखे अधिकारी विद्वान आमच्या प्रांतांत आहेत व इतरत्रही असणारच. प्रत्येकजण अापापले नियत काम करितही अाहेत. अाम्ही ह्या पुस्तकाचे काम जे हाती घेतले ते परमेश्वराच्या केवळ इच्छेनुसारच पूर्ण झालेले आहे. या पुस्तकाच्या गुणावगुणाबद्दल अथवा उपयुक्ततेबद्दल मत देण्याचा अधिकारी हौशी अभ्यासकांचा अाहे.

'तं सन्तः श्रोतुमर्हन्ति सदसद्व्यक्तिहेतवः' या कालिदासाच्या उक्तीप्रमाणे यांतील गुणदोष जाणणारे विद्वानच या पुस्तकाविषयी योग्य मत देऊ शकतील. प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या घरी शिक्षणाच्या विविध श्रेणींपैकी कुठच्या तरी श्रेणींत शिकणारी मुले असणार अाणि त्यांपैकी बरेचसे संस्कृताचा अभ्यास करणारे विद्यार्थीही असणारच. प्रत्येक सुबुद्ध महाराष्ट्रीय कुटुंबात या संदर्भ ग्रंथाची एकप्रत असणे आवश्यक आहे. कै. श्री. मो. रा. काळे यांनी ज्या काळात आपले 'Higher Sanskrit Grammar' हे पुस्तक प्रसिद्ध केले त्या काळाच्या मानाने आजच्या या दसपट महागाईच्या काळाचा विचार केला असता अाणि विशेषतः कागदाचे दुर्भिक्ष्य पराकोटीला पोचले असताना हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले जात अाहे ही गोष्ट ध्यानात आणता आम्हाला या पुस्तकाची ठेवावी लागणारी किंमत या पुस्तकाच्या ग्राहकांना अयोग्य वाटणार नाही अशी अाशा आहे.

हे पुस्तक छापीत असताना त्यात भर घालण्याला ज्या अनंत संस्कृत संदर्भ ग्रंथाचे अाणि क्रमिक व पाठ्य पुस्तकांचे आम्हाला सहाय्य झाले त्या पुस्तकांच्या लेखकांबद्दल आदर अाणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण या ठिकाणी जाहिरपणे आम्ही कबूल करीत आहो. संस्कृतसारख्या प्राचीनतम भाषेच्या बाबतीत उच्छिष्ट ग्रहणाचा अथवा वाङ्मयचौर्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

हे पुस्तक छापून प्रसिद्ध करण्याच्या कामात आमच्या अनेक उदारधी हितचिंतक मित्रांचे सर्वतोपरी सहाय्य झालेले आहे. श्री. बोरवणकर यांच्या मूळ व्याकरणाची हस्तलिखित प्रत आमचे स्नेही श्री. दिगंबर महादेव ताटके, एम्. ए., बी. टी व श्री. रामकृष्ण विठ्ठल हर्डीकर, वैय्याकरण शास्त्री, बी. ए., बी. टी. यांनी आमूलाग्र वाचून मूळ प्रतींतील उणीवा भरून काढण्याला सहाय्य दिले. या पुस्तकाच्या अर्ध्या अधिक भागाच्या मुद्रण प्रतीचे लेखन व मुद्रिते तपासण्याचे बहुतेक सर्व काम आमचे सहकारी मित्र श्री. दत्तात्रय सिताराम परांजपे यांनी एकट्यांनीच केले. हल्लीच्या काळात एवढ्या मोठ्या अाणि मराठी कथा कादंबऱ्यांच्या मानाने छापायला फार किचकट अशा या पुस्तकाच्या छपाईप्रीत्यर्थ करावा लागणारा अवाढव्य खर्च व त्रास ज्या राष्ट्रकार्याच्या प्रेमाने व परमेश्वराच्या कृपेने होऊ शकला त्यांच्याच चरणी हे पुस्तक मनोभावे आम्ही ठेवीत आहो. बृहन् महाराष्ट्रातील सुबुद्ध जनतेला या पुस्तकाचे भरपूर सहाय्य झाल्यास आमचे श्रम सत्कार्यी पडल्याचे समाधान आम्हाला लाभेल. या पुस्तकाचा उपयोग करणारांनी आम्हाला त्यांतील दोष दाखवावे व त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी आवश्यक त्या सूचना निस्संकोचपणे कराव्या.

या पुस्तकाची प्रस्तावना श्री. बोरवणकर यांच्याच हातून लिहून झाली असती तर सर्वांनाच आनंद झाला असता. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ते काम आम्हाला करावे लागत आहे. नियतीपुढे सर्वच मानव हतबुद्ध आहेत.