आंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंध ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आदिवासी जमात आहे. यांची वस्ती प्रामुख्याने परभणी, हिंगोली, वाशिम, जालना, नांदेड, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांत आढळते. ही जमात सातवाहन-कालीन आहे. हा समाज सातवाहनापासून निर्माण झाला आहे, असे सांगितले जाते. ही एक अतिशय प्राचीन आदिवासी जमात आहे.

आंध्रप्रदेशालगतच्या क्षेत्रातून येणाऱ्या तेलुगू भाषक लोकांचा आंध जमातीवर मोठा प्रभाव दिसून येतो. आंध ही आंध्रप्रदेशातील आर्येतर जमात असल्याचे दिसते व त्यावरून हे नाव पडले असावे. आंध जमात दोन गटांत विभागली आहे :

१) वरताळी (खानदानी)

२) खालताळी (अनौरस)

वरताळी गट हा खालताळी गटापेक्षा उच्च दर्जाचा समजला जातो. त्यामुळे दोन्ही गटांत बेटी व्यवहार होत नाहीत. आंध हे शेती व पशुपालन करणारे आदिवासी म्हणून ओळखले जातात. ते डोंगराळ भागात राहतात. आंध लोकांची मुख्य अन्न उत्पादने ज्वारी, तूर, उडीद, मूग, वाल ही आहेत. आंध पुरुष धोतर, कुडता व पागोटे असा पेहराव करतो. स्त्रिया नऊवारी लुगडी नेसतात व अंगात चोळी घालतात. आंध लोक आसरा, कान्होबा, खंडोबा, भवानी, भीमसेन, मरीआई, महादेव, मारोती, रेणुका देवी, म्हसोबा, पोचम्मा देवी वाघमाई या दैवतांची पूजा करतात. आंध जमात शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेली आदिवासी जमात म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नोकरीच्या व शिक्षणाच्या निमित्ताने आज काही लोक शहरात राहतात, पण हे प्रमाण कमी आहे. सरकारी विकास योजनांचा फायदा या जमातीने चांगल्या प्रकारे करून घेतला. पाझर सिद्धान्ताप्रमाणे (लाॅर्ड मेकोले प्रणीत Filteration Policy about English Education) त्यांना जमातीच्या लोकांच्या सवलती मिळतात.