Jump to content

सांख्यदर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांख्य (हिंदू धर्म) या पानावरून पुनर्निर्देशित)

सांख्यदर्शन हे भारतीय षट्‌ दर्शनांमधील एक दर्शन आहे. अथर्ववेदाच्या काळातच सांख्य दर्शन आकारास आले. कठ,श्वेताश्वतर, प्रश्न व मैत्रायणी या प्राचीन उपनिषदांवर सांख्य दर्शनाचा मोठा प्रभाव आहे. उपनिषद काळानंतर भारतीयांच्या विचारसरणीत सांख्य दर्शनाला महत्त्व मिळाले. कपिल ऋषी हे सांख्य दर्शनाचे प्रवर्तक आहेत. या दर्शनाने विश्वातील सर्व तत्त्वांची प्रथम गणना केली. गणनेला संख्या म्हणतात. संख्येला प्राधान्य दिल्यामुळे या दर्शनाला सांख्य असे नाव मिळाले. सांख्य शब्दाच्या इतर व्याख्येनुसार संख्या म्हणजे विवेकज्ञान होय. प्रकृती व पुरुष यांच्या बाबतीत अज्ञान असल्यामुळे माणूस जन्म-मरणाच्या फेऱ्यात सापडतो. पण जेव्हा माणसाला पुरुष हा प्रकृतीपासून भिन्न व स्वतंत्र आहे, असे ज्ञान होते तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती होते. या विवेक ज्ञानाला प्राध्यान्य असल्यामुळे या दर्शनाला सांख्य हे नाव पडले. प्रकृती व पुरुष ही दोन मूलभूत तत्त्वे या दर्शनात मानल्यामुळे हे द्वैतवादी दर्शन आहे. प्राचीन काळातील विचारविश्वावर या दर्शनाचा खूपच प्रभाव पडला होता. म्हणून याचे प्रवर्तक महर्षी कपिल यांना प्रथम दार्शनिक असे गौरवाने संबोधले गेले आहे.

आचार्य परंपरा

[संपादन]

या दर्शनाचे काही प्रसिद्ध आचार्य पुढील प्रमाणे आहेत.

  • कपिल

हे सांख्य दर्शनाचे प्रवर्तक होत. उपनिषदांत उल्लेख केलेल्या सिद्धान्ताचे यांनीच प्रथम शास्त्रीय विवेचन केले आणि सांख्य दर्शनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. म्हणून यांना आदिविद्वान असे म्हणतात. त्यांनी तत्त्वसमास आणि सांख्य सूत्र ह्या दोन ग्रंथाची रचना केली.

  • आसुरी

हा कपिलाचा साक्षात शिष्य होता. प्राचीन ग्रंथात याच्या सिद्धान्ताचे वर्णन आढळते.

  • पंचशिख

हा आसुरीचा शिष्य असून षष्टीतंत्र हा ग्रंथ याने रचला आहे. सांख्य दर्शन हे सत्कार्यवाद मानणारे आहे. त्यांच्या मते कार्य हे उतप्त्तीपुर्वी कारणात अव्यक्त रूपाने अवश्य विद्यमान असते.

  • ईश्वरकृष्ण

याने रचलेला सांख्यकारिका हा ग्रंथ लोकप्रिय व प्रमाणित आहे. या ग्रंथावर अनेक टीका निर्माण झाल्या आहेत.

  • विंध्यवास

याचे नाव रुद्रील असे होते. पण विंध्य पर्वताच्या जंगलात राहिल्यामुळे याला विंध्यवास या नावाने ओळखू लागले. याचा ग्रंथ उपलब्ध नाही. पण दार्शनिक ग्रंथात याच्या सिद्धान्ताचा उल्लेख आढळतो.

  • विज्ञानभिक्षू

(इ.स.चे १६ वे शतक) सांख्य दर्शनाचा हा शेवटचा आचार्य होय. हा काशीत राहत होता. भिक्षू हे नाव धारण केलेले असले तरी तो बौद्ध नव्हता. हा स्वतंत्र विचारांचा आचार्य होता. याने सांख्य सूत्रांवर संख्याप्रवचनभाष्य हा ग्रंथ लिहिला. याशिवाय त्याने योगवार्तिक, विज्ञानमृतभाष्य, सांख्यसार व योगसार हे ग्रंथ रचले आहेत.

  • तत्त्वमीमांसा

सांख्य दर्शनात तत्त्वांची मीमांसा फार चांगल्या' रितीने केली आहे. सांख्यांनी पंचवीस तत्त्वे मानलेली आहेत. या पंचवीस तत्त्वांचे पुढील चार प्रकारांत वर्गीकरण केले आहे. एक तत्त्व असे आहे की जे सर्वाचे कारण आहे. पण कार्य मात्र कोणाचेच नाही. याला प्रकृती असे नाव आहे. काही तत्त्वे स्वतः कार्य असतात. पण ती दुसऱ्या कोणाला उत्पन्न करत नाहीत. त्यांना विकृती म्हणतात. काही तत्त्वे कार्य व कारण अशा दोन्ही रूपात असतात. त्यांना प्रकृती-विकृती असे नाव आहे. काही तत्त्वे कार्य व कारण या उभयविध संबंधाने रहित असतात. म्हणजे ती कार्यही नसतात किंवा कारणही नसतात. त्यांना न प्रकृती-न विकृती असे नाव आहे. प्रधान, अव्यक्त किंवा प्रकृती हे तत्त्व प्रकृती या वर्गात येते. पंच ज्ञानेद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच महाभूते व मन अशी सोळा तत्त्वे विकृती या सदरात मोडतात.