Jump to content

भैरवनाथ मंदिर (किकली)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भैरवनाथ मंदिर, किकली या पानावरून पुनर्निर्देशित)

[ चित्र हवे ]

  • भैरवनाथ मंदिर किकली*

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या *किकली* गावात हेमाडपंती पद्धतीचे एक भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. हे देऊळ पुणे - सातारा राष्ट्रीय महामार्ग पासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथेच डावीकडे *चंदनगड* तर उजवीकडे *वंदनगड* किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर भव्य असे प्रवेशद्वार दिसते. १८-२० पायऱ्या चढून प्रवेशद्वारात पोहचताच समोर शिवमंदिराचे संकुल दिसते. संकुलातील एक मंदिर सुस्थितीत तर दोन मंदिरे भग्नावस्थेत आहेत. मुख्य मंदिर भैरवनाथाचे असून मंदिरावरती नक्षीकामाची रेलचेल आढळते. या मंदिरात मुखमंडपातच नंदी आहे. वेदिकेवरील व्यालपट्टी, मुखमंडपावरील छतावर अनेक प्रकारची झुंबरे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीकाम हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. या प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गज शरभ, व्याल, दैवीशक्ती असून, उंबऱ्यावर कीर्तिमुख तसेच उंबऱ्यासमोर शंखावर्त अर्धचंद्र पहावयास मिळतो. येथील शिल्पे ही सातारा जिल्ह्यातील इतर मंदिराच्या तुलनेत सरस आहेत. सन १६४९ मध्ये अफजल खानाला वाईची सुभेदारी मिळाली त्यावेळी वाई मध्ये त्याला वाडा बांधण्यासाठी त्याने ही मंदिरे पडली त्याचे दगड वाईला नेहून आपला वाडा बांधला. ( संदर्भ - केंद्रीय दफ्तर खाण्यातील मराठी कागदपत्रे सन 1983 पृ.99) मंदिराची रचना आणि त्यावरील शिल्पे पाहता हे मंदिर *एखाद्या राजाने आपल्या गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ* उभे केल्याचे जाणवते. हे एक *स्मारक मंदिर* असावे हे त्याच्या ललटीबाब वर असलेल्या योगीच्या शिल्पवरून समजते. गर्भगृहात गुरूच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेले शिवलिंग आहे. तर उजवी कडील गर्भगृहात भैरवाची जागृत मूर्ती आणि त्यापुढे मुख्य शिवलिंग आहे. उत्तरेकडील भैरव आणि शिवलिंग जागृत असल्यामुळे नंदीची मान त्यांच्या बाजूला झुकलेली पहावया मिळते.

सभामंडपातील रंगशिळेवर चार भरजरी खांब असून त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. असे रामायण कोरलेले हे मंदिर महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर होत. काही ठिकाणी शिवतांडव, वामन आवतार,रामायणातील विविध प्रसंग, सुरसुंदरी, क्षेञपाल अशी शिल्पे आहेत. मंदिराचा गाभारा त्रिदल पद्छतीचा आहे. भैरवनाथासमोरिल अंतराळगृह इतर दोन अंतराळगृहापेक्षा रेखीव आहे. या गृहात दोन देवड्या असून त्यात शिवपार्वती आणि एक ऋषीमुनी (स्थानिक कथेनुसार बहुधा मच्छिंद्रनाथ) आहेत. गाभाऱ्यात उग्र अशी जागृत भैरवनाथाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. मंदिराच्या दक्षिणेच्या दारातून बाहेर पडल्यावर शाळा आहे तेथे पूर्वी बारव होती. शाळा बांधताना ती बुजवली गेली. ( सातारा ग्याझेटीयर).

किकली हे पाचशे सहाशे उंबरा असलेले गाव असले तरी मंदिराप्रमाणेच या गावात शंभर दीडशे वीरगळ पहावयास मिळतात. त्यामुळे गावाला “वीरगळचे गाव" हे विशेषण शोभून दिसेल. महाराष्ट्र राज्यातील पाहिले “ *ऐतिहासिक विरगळचे गाव* ” म्हणून नुकतेच नावारूपास आले आहे. येथे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजांच्या वीरगळ आणि त्याही सुस्थितीत आहेत. भैरवनाथाचा यात्रा उत्सव अाश्विन महिन्यातील तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी असतो. शनिवारी देवाला पुष्पहार वाहणे, तळीपूजन, टक्कर, आणि मध्यरात्री होणारी चिलाईदेवी (शेजारील जांब गावात असलेली भैरवनाथांची बहीण) आणि भैरवनाथांची भेट हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. हा भेट सोहळा पाहण्यासाठी भाविक दूरदूरहून येतात. रविवारी दुपारी बारा वाजता छबिना असतो. यावेळी पालखीवर गुलाल, खोबरे आणि पेढे उधळतात. पेढ्यांची उधळण होणारी सातारा जिल्ह्यातील एकमेव यात्रा हे या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य होय. ९ दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच असते. माहिती :- *संकेत बाबर किकलीकर*

संदर्भ

[संपादन]

शिवभैरव प्रतिष्ठान, किकली ता.वाई.