लाल श्याम महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९६० सालापासून छत्तीसगड व लगतच्या महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यांत लाल श्याम महाराजांच्या प्रेरणेने “जंगल बचाव - मानव बचाव” ही चैतन्यपूर्ण चळवळ सुरू होती. १९१९ साली जन्मलेले लाल श्याम महाराज छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील मोहाला - पानाबरस इलाख्याचे जमीनदार होते आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून दोनदा राज्य विधानसभेत आणि एकदा लोकसभेत निवडून आले होते. ही चळवळ त्यांनी १९६० सालच्या रायपूरच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात पाणी, जंगल व जमिनीवर आदिवासींचा हक्क मागणाऱ्या ४०,००० आदिवासींचा मोर्चा नेल्यापासून सुरू झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मोर्चातील आदिवासींना भेटले आणि त्यांनी त्यांच्या मागण्या पुऱ्या केल्या जातील असे वचन दिले. हे वचन पाळण्यात आले नाही आणि लाल श्याम महाराजांनी १९६४ साली या वचनभंगाबाबत टीकेची झोड उठवली आणि लोकसभेचा राजीनामा दिला. परंतु १९८८ झाली त्यांचे देहावसान होईपर्यंत ते आदिवासींच्या हितासाठी झगडत राहिले.