धूळपाटी/दोडामार्ग – सावंतवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१० साली पश्चिम घाट परिसर तज्ञ गटामार्फत दोडामार्ग सावंतवाडी परिसरातील गावांबरोबर त्यांना काय पद्धतीचे विकास कार्यक्रम हवे आहेत आणि काय पद्धतीने पर्यावरणाचे संरक्षण अपेक्षित आहे याबद्दल चर्चा केली गेली. या संदर्भात असे सुचविले की ते त्यांच्या पंचायतीचे क्षेत्र हे संवेदनशील परिसर क्षेत्र म्हणून जाहीर करू शकतील. भारताच्या संविधानाप्रमाणे ग्रामपंचायती  विकेंद्रीकृत शासनाचा पाया आहेत, आणि त्यांना निसर्ग संरक्षण आणि विकास या दोन्ही संदर्भात निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. उदाहरणार्थ, जिल्हातील सर्व ग्रामपंचायतींची संमती असल्यास संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टिकचा उपयोग करू नये असा निर्बंध अवश्य लागू करता येईल. जोडीला सर्वच स्थानिक ग्रामपंचायती व नगरपालिकांना जैवविविधता कायद्याप्रमाणे संग्रहण शुल्क आकारण्याचा अधिकार ताबडतोब मिळावा असाही आग्रह धरता येईल. पण जिल्ह्यात एकही हॉटेल चालवू नये असा निर्बंध लावणे योग्य नाही. उलट समुद्र किनाऱ्यावरच्या एखाद्या पंचायतीत, येथील क्षेत्रात पर्यटकांसाठी घरगुती पाहुणचाराच्या विशेष सुविधा निर्माण करण्यास उत्तेजन द्यावे, व एकही व्यापारी हॉटेलला परवानगी देऊ नये असा निर्बंध लावणे सयुक्तिक ठरू शकेल. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीव प्रदूषक उद्योगधंदे नकोत असे ठरवता येईल. पण एखाद्या ग्रामापंचायतीत इथे केवळ शेती बागायती उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे हवेत, इतर कोणतेही नकोत असेही ठरवता येईल.

असे सगळे नियोजन कम-जास्त तपशीलात करता येईल. उदाहरणार्थ काही ग्रामसभा काहीही खाणी नकोत एवढेच सुचवू शकतील, इतर जास्त बारकाव्यात जाऊन उभ्या चढावर ३० फूटांहून रुंद रस्ते नकोत किंवा वहाळांना अपाय होणारे कोणतेही बांधकाम नको; काजूबोंडावर व वनौषधींवर आधारित उद्योग हवेत; खाजगी जंगलांची अभिवृद्धि करायला हवी; नारळ-पोफळीच्या झावळयांवर आधारित सुधारित चुली हव्यात; स्थानिक देवराईला पूर्ण संरक्षण हवे अशा अनेक सूचना देऊ शकतील. समुद्रतीराजवळील ग्रामपंचायती खाडीत व उथळ समुद्रात यांत्रिक मासेमारीला बंदी असावी, स्थानिक युवकांसाठी स्नॉर्कलिंग व स्कूबा डायव्हींगच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा निर्माण करावी, मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना खास प्रोत्साहन द्यावे अशा धर्तीच्या सूचना करू शकतील. ह्याखेरीज अशा संवेदनशील परिसर क्षेत्रातील शेतकऱ्यांना गावरान वाणांचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय जनुक निधीतून खास अनुदान मागता येईल; तसेच भारताच्या हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आखलेल्या योजनेतून शेतजमिनीतील सेंद्रीय अंश वाढवून कार्बनची साठवणूक करण्याबद्दल अनुदान मागता येईल.

या चर्चेनंतर दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यांतील एकाला एक लगतच्या पंचवीस ग्रामपंचायतींनी (असनिये, कुंब्रख, मांतुर्ली, तलकट, झोंबळे, कोळझर, शिरवळ, उगडे कळणे, भिकेकोनळ, कुंभवडे, खाडपडे, भेकुर्ली, पाडवेमाजगाव, भालाव, तांबोली सारमळे, निवाळी, दाभिळ, ओतवणे, कोणशी, फुकेरी, धारपी, उडेली, केसरी-फांसवडे) त्यांची क्षेत्रे संवेदनशील परिसर क्षेत्र म्हणून जाहीर करावीत असे ठराव मंजूर केले. त्यांनी आपापल्या निसर्ग संरक्षण आणि विकास योजना तयार करून त्या पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाला सादर केल्या. उदाहरणार्थ तलकट ग्रामपंचायतीने खालील प्रस्ताव मांडले: वर्षभर वाहणाऱ्या ओढ्यांचे पाणी वापरण्यासाठी एक पाणलोट क्षेत्र विकास योजना हाती घ्यावी, या पाण्यावर सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प सुरू करावे, काजू आणि पोफळीच्या बागायतीचा विकास करावा, शेतीला वन संगोपनाची जोड देण्यासाठी स्थानिक प्रजातींच्या रोपवाटिका सुरू कराव्या, गावाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुविधा निर्माण कराव्या, ग्रामपंचायतीच्या आसमंतात अरण्य आहे त्यामुळे वन्यजीवांशी संघर्ष रोखण्यासाठी उपाय योजना करावी, आणि सर्व खाणकाम थांबवावे.[१][२]

  1. ^ Gadgil, Madhav (2023-08-21). A Walk Up The Hill: Living with People and Nature (English भाषेत). Allen Lane.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-13 रोजी पाहिले.