अश्विनी एकबोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अश्विनी एकबोटे (पूर्वाश्रमीच्या अश्विनी काटकर; ?? - २२ ऑक्टोबर, इ.स. २०१६:पुणे, महाराष्ट्र) या एक मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या.

त्यांनी नंदनवन या नाटकात बालवयात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी नृत्य हा वि़षय घेऊन एमए केले होते.

अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्य ही शिकल्या होत्या. त्या पुण्यातील कलावर्धिनी नृत्यसंस्थेच्या कोथरूड शाखेच्या प्रमुख होत्या.

अश्विनी एकबोटे यांनी झी २४ तासच्या अनन्य सन्मान या कार्यक्रमात खास ॲंकरिंग केले होते.

निधन[संपादन]

सहज संस्थेतर्फे ‘नाट्य त्रिविधा’ या कार्यक्रमाचा पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे सायंकाळी शुभारंभाचा प्रयोग होता. या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे यांनी काही गीतांवर नृत्य सादर केले होते. शेवटी त्या ‘संगीत बावनखणी’ नाटकाच्या भैरवीवर नृत्य करण्यासाठी रंगमंचावर आल्या. प्रसिद्ध गायिका रेवा नातू आणि चिन्मय जोगळेकर यांनी नाट्यगीत सादर केले. त्यावर नृत्य करीत असताना तिहाई घेतल्यावर अश्विनी रंगमंचावर कोसळल्या. त्यांना तातडीने पेरुगेटजवळील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच नऊच्या सुमारास त्यांचे निधन झाले. (२२-१०-२०१६). त्या फक्त ४४ वर्षांच्या होत्या.

चित्रपट-नाटके-दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • अहिल्याबाई होळकर (मराठी चित्रवाणी मालिका)
  • आईसाहेब (मराठी चित्रवाणी मालिका)
  • आरंभ (मराठी चित्रपट)
  • एक पल प्यार का (हिंदी चित्रपट); मराठीत - क्षण मोहाचा.
  • एका क्षणात (मराठी नाटक)
  • ऐतिहासिक गणपती (मराठी चित्रवाणी मालिका)
  • कशाला उद्याची बात (मराठी चित्रवाणी मालिका)
  • काॅफी आणि बरंच काही (मराठी चित्रपट)
  • गणपती बाप्पा मोरया (मराठी चित्रवाणी मालिका)
  • डंक्यावर डंका (मराठी चित्रपट)
  • डेबू (मराठी चित्रपट)
  • तप्तपदी (मराठी चित्रपट)
  • तू भेटशी नव्याने (मराठी चित्रपट)
  • त्या तिघांची गोष्ट (मराठी नाटक)
  • दणक्यावर दणका (मराठी चित्रपट, २०१३)
  • दुर्वा (मराठी चित्रवाणी मालिका)
  • दुहेरी (मराठी चित्रवाणी मालिका)
  • नांदी (मराठी नाटक)
  • संगीत बावनखणी (नाटक)
  • बावरे प्रेम हे (मराठी नाटक, २०१४)
  • भोभो (मराठी चित्रपट)
  • मराठा टायगर्स (मराठी चित्रपट)
  • महागुरू (मराठी चित्रपट)
  • राधा ही बावरी (मराठी चित्रवाणी मालिका)
  • हायकमांड (मराठी चित्रपट)
  • क्षण मोहाचा (मराठी चित्रपट); हिंदीत - एक पल प्यार का.