संथाळ जमात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संथाळ लोक
बाहा परब साजरा करताना पारंपारिक वेशातील संथाळ व्यक्ती
एकुण लोकसंख्या

c. ७४ लाख

ख़ास रहाण्याची जागा
भारत ध्वज भारत

 • बांगलादेश ध्वज बांगलादेश

 • नेपाळ ध्वज नेपाळ
भारतभारत:
       झारखंड

२,७५२,७२३[१]
       पश्चिम बंगाल २,५१२,३३१[१]
       ओडिशा ८९४,७६४[१]
       बिहार ४०६,०७६[१]
       आसाम २१३,१३९[२]
बांगलादेश ध्वज बांगलादेश ३००,०६१ (२००१) [३]
नेपाळ ध्वज नेपाळ ५१,७३५ [४]
भाषा
संथाळी भाषा, हिंदी, उडिया भाषा, बंगाली भाषा, नेपाळी भाषा
धर्म
बहुसंख्यांक
हिंदू (६३%)[५]
अल्पसंख्यांक
सरना (३१%)
ख्रिश्चन (५%),
इतर (१%)[५]
इतर सम्बंधित समूह
मुंडा  • हो  • जुआंग  • खडिया  • सबरा  • कोरकु  • भूमिज

संथाळ किंवा संथाल हा एक दक्षिण आशियातील मुंडा वांशिक आदिम समाज आहे. संथाळ ही भारतातील झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी जमात आहे आणि ती ओडिशा, बिहार आणि आसाम या राज्यांमध्येही आढळते. ते उत्तर बांगलादेशातील राजशाही विभाग आणि रंगपूर विभागातील सर्वात मोठे वांशिक अल्पसंख्याक आहेत. त्यांची नेपाळ आणि भूतानमध्ये मोठी लोकसंख्या आहे. मुंडा भाषांपैकी सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या संथाळी भाषा बोलतात.

व्युत्पत्ती[संपादन]

संथाल हे बहुधा एका प्रतिशब्दावरून आले आहे. हा शब्द सांत रहिवाशांना सूचित करतो पश्चिम बंगालमधील मेदिनापूर प्रदेशातील पूर्वीच्या सिल्डामध्ये . [६] संस्कृत शब्द सामंत किंवा बंगाली सांत म्हणजे सपाट जमीन. [७] [८] त्यांचे वांशिक नाव Hor Hopon आहे ("मानवजातीचे पुत्र"). [९]

मूळ[संपादन]

संथाळांच्या साहित्यात त्यांचा संथाळ, सांथाळ, संताळ, सावंतार, सावंताळ इ. नावांनी उल्लेख केल्याचे आढळते. त्यांच्या उत्पत्तीविषयीही अनेक दंतकथा प्रचलित आहेत. रामायणात संथाळांच्या पूर्वजांनी राम-लक्ष्मणांना सहकार्य केल्याचा उल्लेख मिळतो. त्यांच्या मूलस्थाना-विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि त्यांची वस्ती प्रथम गंगेच्या खोऱ्यात झाली व नंतर त्यांनी झारखंड राज्यातील छोटा नागपूर ( पालामाऊ, हजारीबाग,धनबाद, रांची, पूर्व व पश्र्चिम सिंगभूम हे जिल्हे असलेला प्रदेश) या पठारी-जंगली प्रदेशात स्थलांतर केले असे दिसते. इंग्रजांनी जंगल- तोड सुरू केल्यानंतर ते ईशान्येकडे सरकले. दमिन-इ-कोह हे त्यांचे मुख्य केंद्र बनले. इंग्रजांनी जंगलतोडीत त्यांचा चांगला उपयोग करून घेतला. संथाळांकडे बृयापैकी जमीनजुमला होता पण एकोणिसाव्या शतकारंभी व्यापारी व महाजन सावकार यांनी संथाळांची पिळवणूक करून कर्जफेडीच्या पोटी त्यांच्या जमिनी बळकावल्या आणि त्यांना गुलाम बनविले. परिणामतः संथाळांनी १८५४ मध्ये बंड केले आणि सावकारी नष्ट करावी व जमिनीवरील कर कमी करावा, अशा मागण्या केल्या. इंग्रजांनी त्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा त्यांनी सशस्त्र उठाव करून तिरकमठयाच्या साह्याने अनेक इंग्रजांना मारले. अखेर इंग्रजांच्या लष्कराने हा उठाव मोडला आणि त्यांची दुर्दशा केली परंतु त्यांच्या उद्रेकाचा परिणाम म्हणून पुढे भूदासपद्धती बंद करून स्वतंत्र संथाळ परगणा निर्माण करण्यात आला. प्रत्येक खेडयात मांझी ( पाटील ) अधिकारी नेमून त्यास पोलिसी अधिकार देण्यात आले. याच सुमारास आसाम-बंगालमध्ये चहाचे मळे सुरू झाले. त्यावेळी मळेवाल्यांनी मजूर म्हणून संथाळांची मोठया प्रमाणावर भरती केली. संथाळांचा प्रमुख व्यवसाय शेती असून ते शिकार, मच्छीमारी, गुरे पाळणे इ. उदयोगही करीत. पुढे त्यांनी खाणीतूनकाम करण्यास सुरुवात केली. आसनसोलजवळच्या किंवा जमशेटपूरमधील कोळशाच्या खाणीतून ते प्रामुख्याने काम करतात. दगडी कोळसा फोडण्यात संथाळांनी प्रावीण्य मिळविलेले दिसून येते.[१०]

मध्यम उंची, बांधेसूद शरीरयष्टी, कृष्णवर्ण, काळे राठ केस, रूंद चपटे नाक, वाटोळा चेहरा व जाडे ओठ, ही त्यांची काही खास शारीरिक वैशिष्टये होत. त्यांची खेडी जंगलाच्या अंतर्भागात असून ते झोपडयांतून राहतात. प्रत्येक झोपडीत कुलदेवता व पितर यांकरिता स्वतंत्र जागा असते. शिवाय गोठा, कोंबडी-कबुतरे यांची खुराडी आणि डुकरांसाठी आडोसा असतो. प्रत्येक खेड्यात शालवृक्षाखाली प्रमुख देवतेचे स्थान असून या परिसरास जाहेर्थान म्हणतात. गामप्रमुखाच्या घरासमोर मांझी स्थान नावाची जागा असते. तिथे गामसंस्थापकांचा आत्मा वास करतो, अशी त्यांची धारणा आहे. संथाळांचे मुख्य अन्न भात व कडधान्यांचे कालवण होय. याशिवाय ते मांस, मासे, कंदमुळे व फळे खातात. भातापासून ते हांडिया नावाची दारू करतात. मोहाच्या फुलांपासून बनविलेली दारूही असते. त्यांच्या प्रत्येक समारंभात मदयपानास प्राधान्य आहे. ते पान-तंबाखू खातात व बिडीही ओढतात.[१०]

धर्म[संपादन]

संथाळ जमातीतील धर्म

  हिंदू (63%)
  सरना (31%)
  इतर (1%)

संथाळांची जमात देशवाली व खरवार किंवा सफा-होर अशा दोन समूहांत विभागलेली आहे. खरवार हे सुधारणावादी असून राम-कांडो देवतेचे अनुयायी होत. त्यांच्यात हासदक, मुरम, किस्कू, हेंबोम, सोदेन, तुडू, बेस्रा, कोरे इ. गणचिन्हे असलेल्या बारा कुळी किंवा पारी असून सु. दोनशे उपकुळी आहेत. त्यांना खूत म्हणतात. एकोणिसाव्या शतकात संथाळांचा मजुरीच्या निमित्ताने नागरी वस्तीशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांनी हळूहळू हिंदूंचे देव, रीतिरिवाज, पोशाख यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. पुढे खरवार चळवळीमुळे ते हिंदू धर्माच्या अधिक जवळ आले. ही सामाजिक व राजकीय स्वरूपाची चळवळ असूनती भागत नावाच्या एका संथाळाने रामकांडो या नावाखाली श्रीरामाची उपासना करण्यासाठी १८७१ साली सुरू केली आणि रामाच्या उपासकांनी मदय-मांस वर्ज्य करावे, असा प्रचार केला. शिवाय नियमित स्नान, सांजवात आणि सायंप्रार्थना यांवर या चळवळीने भर दिला. पुढे रामकांडोचे अनेक उपासक झाले. त्यांनी रामासह अन्य हिंदू देवदेवतांची उपासना करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संथाळ मोठया प्रमाणावर शाकाहारी बनले आणि संथाळांची नवी पिढी शिक्षणाकडेही आकर्षित झाली.[१०]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d "A-11 Individual Scheduled Tribe Primary Census Abstract Data and its Appendix". censusindia.gov.in. Office of the Registrar General & Census Commissioner, India. 18 November 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "C-16 Population By Mother Tongue". censusindia.gov.in. Office of the Registrar General & Census Commissioner, India. 3 November 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Cavallaro, Francesco; Rahman, Tania. "The Santals of Bangladesh" (PDF). ntu.edu.sg. Nayang Technical University. Archived from the original (PDF) on 9 November 2016. 17 November 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "National Population and Housing Census 2011: Social Characteristics Tables" (PDF). Nepal Census. Archived from the original (PDF) on 2023-03-14. 2022-07-23 रोजी पाहिले – Government of Nepal द्वारे.
  5. ^ a b "ST-14 Scheduled Tribe Population By Religious Community - Jharkhand". census.gov.in. 3 November 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Schulte-Droesch 2018.
  7. ^ Census 1961, west bengal-district handbook, Midnapore (PDF). The superintendent, government printing, West Bengal. 1966. p. 58.
  8. ^ Encyclopaedia of Scheduled Tribes in Jharkhand. Gyan Publishing House. 2010. p. 213. ISBN 9788178351216.
  9. ^ Somers 1979.
  10. ^ a b c "संथाळ". vishwakosh.marathi.gov.in. २३ जुलै २०२२ रोजी पाहिले.