वासुदेव बळवंत फडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वासुदेव बळवंत फडके

फडक्यांचा मुंबईमधील अर्धपुतळा
जन्म: ४ नोव्हेंबर १८४५
शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३
एडन, येमेन
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
प्रभाव: लहुजी वस्ताद साळवे, महादेव गोविंद रानडे
प्रभावित: बाळ गंगाधर टिळक, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
वडील: बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके (जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५; - एडन, येमेन, १७ फेब्रुवारी १८८३) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक म्हणाले जाते.

बालपण आणि शिक्षण[संपादन]

रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.[१] येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके हे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.[२]

क्रांतीचा पाया[संपादन]

आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.[३] १८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.

सशस्त्र क्रांती[संपादन]

इ.स. १८७९ नंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामारी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवर दरोडा टाकून लूटमार केली.

५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तसेच स्वरचित दत्त स्तोत्र ही वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिले दत्तोपासक असलेले वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. स्वामी समर्थ आणि वासुदेव बळवंत फडके यांची भेट अक्कलकोटला झाली वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांना शरण गेले आणि आपली तलवार काढून स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवली. आपली कार्ययोजना आणि मनोदय सांगितला. स्वामी महाराजांच्या हातून तलवार मिळावी आणि क्रांतीकार्यास आशीर्वाद मिळावा, अशी त्यांची इच्छा होती.स्वामी समर्थ त्रिकालद्रष्टे होते. वासुदेव बळवंत फडके यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले की, हम जानते है | नेक काम है |, असे सांगत एका सेवेकऱ्याला समोर ठेवलेली तलवार नेऊन झाडावर टांगून ठेवण्यास सांगितले. स्वामी समर्थांना उद्देशून म्हणाले की. अभी वक्त नही हैं | तुम्ही आरंभीलेले कार्य चांगले असले, तरी क्रांतीकार्याला यश येणार नाही, असे स्वामी म्हणाले.स्वामींनी सांगितले सध्याचा काळ संबंधित परिस्थितीला साथ देणार नाही व तुला काळाप्रमाणे थांबावे लागेल योग्य वेळ आल्यानंतर देश क्रांतीचे काम करावे पांडवांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण सुद्धा होतेच परंतु पाडवांच्या बरोबर काळाचे सहकार्य नव्हते त्यामुळे पांडवांना खूप कष्टातून जावे लागले म्हणून योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती येताच तू देश क्रांतीचे काम करावे असे श्री स्वामी समर्थ यांनी सांगितले होते मात्र, प्रांरभिलेल्या कार्यात फडके माघार घेऊ शकत नव्हते. अखेर वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली. स्वामींना साष्टांड दंडवत घातले आणि पुढील प्रवासी निघून गेले [४] फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.

या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्‍री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.

धरपकड, खटला व मृत्यू[संपादन]

जुलै २३, इ.स. १८७९ रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.

तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध वासुदेव बळवंत फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा फेब्रुवारी १७, इ.स. १८८३ रोजी मृत्यू झाला.[५]

स्मारके[संपादन]

  • पुण्यात चाललेल्या खटल्यादरम्यान फडक्यांना संगमपुलाजवळ एका कोठडीत ठेवण्यात आले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर खात्याने तेथे त्यांचे स्मारक उभारले आहे.
  • बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेऊन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायांनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.[६]
  • १९८४ साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केले.
  • मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.
  • वासुदेव बळवंत फडके यांचे तैलचित्र भारताच्या संसदेमध्ये ३ डिसेंबर, २००४ रोजी लावण्यात आले. हे संसदेत लावण्यात येणारे शेवटचे व्यक्तिचित्र असेल असे ठरविण्यात आले. पी.व्ही. आपट्यांच्या प्रयत्‍नाने हे तैलचित्र लावण्याची संमती मिळाली. हे तैलचित्र सुहास बहुलकर यांनी रंगवले आहे.
  • 'क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके' नावाचा विश्राम बेडेकर दिग्दर्शित चित्रपट १९५० साली प्रकाशित झाला.[७]
  • ब्रिटिशांपासून लपत फिरत असताना फडक्यांनी पालीजवळील थनाळे-खडसांबळे गुहांमध्ये आश्रय घेतला होता.[८]

-->

शैक्षणिक कार्य[संपादन]

वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक,[९] पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.

वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमाहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.

फडके यांची चरित्रे[संपादन]

  • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर)
  • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - विष्णू श्रीधर जोशी)[१०]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Report on the Administration of the Bombay Presidency. p. 36.
  2. ^ O'Hanlon, Rosalind. Caste, Conflict and Ideology:: Mahatma Jotirao Phule and low caste protest in nineteenth-century western India. Cambridge. p. 110.
  3. ^ Khan, Mohammad. Tilak and Gokhale: A Comparative Study of Their Socio-politico-economic Programmes of Reconstruction. p. 3.
  4. ^ अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१
  5. ^ Rigopoulos, Antonio. Dattātreya: The Immortal Guru, Yogin, and Avatāra : a Study of the Tranformative and Inclusive Character of a Multi-faceted Hindo Deity. p. 167.
  6. ^ Das, Sisir. A History of Indian Literature. New Delhi. p. 213.
  7. ^ आयएमडीबी
  8. ^ Gunaji, Milind. Offbeat Tracks in Maharashtra. Mumbai. p. 228.
  9. ^ "Maharashtra Education Society". mespune.in. 2020-01-17 रोजी पाहिले.
  10. ^ Jośī, Vishṇu Śrīdhara (1974). Ādya krāntikāraka Vāsudeva Baḷavanta Phaḍake yāñce caritra. Vīra Sāvarakara Prakāśana.

बाह्य दुवे[संपादन]