रोशन आरा बेगम (गायिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोशन आरा बेगम (गायिका)
आयुष्य
जन्म इ.स. १९१७
जन्म स्थान कोलकाता, भारत
मृत्यू डिसेंबर ६, इ.स. १९८२
मृत्यू स्थान पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
धर्म मुस्लिम
नागरिकत्व भारतीय
देश भारत, फाळणी नंतर पाकिस्तान
भाषा उर्दू
पारिवारिक माहिती
वडील उस्ताद अब्दुल हक खान
जोडीदार चौधरी मुहम्मद हुसैन
नातेवाईक अब्दुल करीम खाँ
संगीत साधना
गुरू अब्दुल करीम खाँ
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, ख्याल, ठुमरी, कव्वाली
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३८ ते इ.स. १९८२

रोशनआरा बेगम (गायिका) (उर्दू : شاهزادی روشن آرا بیگم ) (इ.स. १९१७ - डिसेंबर ६, इ.स. १९८२) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. पाकिस्तानात त्यांना संगीताची महाराणी म्हणून ओळखले जात असे. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.

पूर्वायुष्य[संपादन]

रोशन आरा बेगम यांचा जन्म इ.स. १९१७चे दरम्यान भारतात कोलकाता येथे झाला किराणा घराण्याचे अब्दुल करीम खाँ यांचे बंधू उस्ताद अब्दुल हक खान हे रोशनाआरांचे वडील. लहान वयातच त्यांनी लाहोर येथे होणाऱ्या संगीत जलशांत सहभागी होण्यास सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी)च्या लाहोर केंद्रावरून त्या आपली गाणी सादर करू लागल्या. तिथे त्यांचे नाव 'बॉम्बेवाली रोशनआरा बेगम' असे प्रसारित होत असे. इ.स. १९३०च्या सुमारास त्या मुंबईला जाऊन अब्दुल करीम खाँ यांचेकडून शास्त्रीय संगीत शिकू लागल्या होत्या. तेव्हापासून त्यांना हे टोपणनाव पडले. अब्दुल करीम खाँ यांचेकडे त्या १५ वर्षे संगीत शिकल्या. इ.स. १९४१चे सुमारास त्यांनी लाहोर येथे सादर केलेल्या कार्यक्रमांनी आणि त्यांच्या गायन कौशल्याने स्थानिक मातब्बर कलावंतांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुंबईत त्या आपले पती, पोलीस अधिकारी चौधरी मुहम्मद हुसैन यांचेसह वास्तव्य करत होत्या.

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

पाकिस्तानाला स्थलांतरित होण्यापूर्वी फाळणीपूर्व भारतात रोशनआरा बेगम यांना किराणा घराण्याच्या शैलीत ख्याल गायन करणाऱ्या उत्तम गायिका म्हणून प्रसिद्धी व स्थान प्राप्त झाले होते. इ.स. १९४८ मध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झाल्यावर रोशनआरा बेगम यांनी आपल्या पतींच्या लालामुसा ह्या छोट्याशा गावी बस्तान बसविले. त्या गावापासून लाहोर बरेच लांब होते. तेव्हा लाहोर हे पाकिस्तानाचे सांस्कृतिक केंद्र मानले जायचे. परंतु रोशन आरा बेगम अंतराची पर्वा न करता संगीत जलसे व रेडिओवरील कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी नित्य लाहोरापर्यंत प्रवास करत असत.

त्यांनी अनेक चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले. पहली नजर (इ.स. १९४५), जुगनू (इ.स. १९४७), किस्मत (इ.स. १९५६), रूपमती बाझबहाद्दर (इ.स. १९६०), नीला परबत (इ.स. १९६९) हे त्यातील काही चित्रपट होत. त्यांच्या गायन मैफिलींची ध्वनिमुद्रणेही उपलब्ध आहेत.

इ.स. १९८२ मध्ये पाकिस्तानात त्यांचा वयाच्या साधारण पासष्टाव्या वर्षी मृत्यू झाला.

बाह्य दुवे[संपादन]