मुळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पांढरे मुळे

मुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक प्रकारचा कंद आहे.याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो.मुळा मधल्या भागात जाड व दोन्ही बाजूंना निमुळत्या आकारचा असतो.

वेगवेगळ्या प्रकारचे मुळे


चरक संहितेत मुळ्याला 'अधम कंद' असे म्हटले असून, त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. मुळ्याच्या शेंगेला ‘डिंगरी' असे म्हणतात. गुजराथीत या शेंगेला ‘मोगरी' म्हणतात. या शेंगांचीही भाजी आणि रायते बनवले जाते. मुळ्याच्या बीमधून तेल निघते. त्याचा वास आणि स्वाद मुळ्यासारखाच असतो. हे तेल पाण्यापेक्षा जड आणि रंगहीन असते. मुळ्याच्या गोलचकत्यांवर थोडे मीठ भुरभुरून थंडीमध्ये सकाळी परोठ्याबरोबर किंवा भाकरीबरोबर खाल्ले जातात. काठेवाडी गाठियांबरोबर सुद्धा मुळा स्वादिष्ट लागतो. [ संदर्भ हवा ]

मुळ्याची पानांची भाजी ही बनवता येते. कोवळ्या मुळ्याचे लोणचे करतात. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) आणि थालिपीठेही करतात.

  • शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. त्याची राख क्षारयुक्त असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.
  • जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचते.
  • मुळ्यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो.
  • थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रासही कमी होतो.
  • मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्याने लघवी आणि शौचास साफ होते.
  • मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो. मुळ्याच्या कंदांपेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात. मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्यास पित्त वाढते, मात्र तीच भाजी तुपात घोळवल्यास भाजीतल्या पौष्टिक गुणधर्मात वाढ होते.
  • भाजी, कोशिंबीर आणि थालिपिठे-कोशिंबिरीसाठी पांढरा मुळा स्वच्छ धुऊन, किसून घ्यावा. त्या किसलेल्या मुळ्यात खवलेले ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करावी. चवीनुसार मिश्रणात मीठ आणि साखर घालावी. कमी तेलावर जिरे, हिंग, मोहरी आणि कढीलिंबाची फोडणी करून, ती किसलेल्या मुळ्यावर ओतावी. कोशिंबिरीत हळद घालू नये. अशा प्रकारे लाल मुळ्याचीही कोशिंबीर करता येते. या कोशिंबिरीत गोडे दही घातल्याने स्वादात अधिक भर पडते.
  • मुळ्याची भाजी करताना मुळा पाल्यासकट धुऊन, बारीक चिरून घ्यावा. कांदा बारीक चिरून घ्यावा. दोन चमचे तुरीची डाळ गरम पाण्यात भिजत ठेवावी. तेलाच्या फोडणीत लसणीच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. त्या फोडणीवर हिरवी मिरची, हळद, तूर डाळ आणि बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी चांगली परतून घ्यावी. चांगल्या परतलेल्या फोडणीत मुळ्याची चिरलेली भाजी घालावी. पाण्याचा हबका मारून पातेल्यावर झाकण ठेवावे. झाकणावर पाणी ठेवून वाफेवर भाजी शिजवावी. भाजी शिजल्यावर त्यात साखर आणि मीठ घालावे. वाफेवर भाजी पूर्ण शिजली की त्यात ओले खोबरे घालावे. गोड्या डाळीबरोबर ही भाजी चविष्ट लागते.
  • बारीक चिरलेल्या मुळ्याच्या पाल्यात मीठ घालून पाला चांगला मळावा. मळल्यावर मुळ्यालापाणी सुटते. तो पाला पिळून पाणी वेगळं काढावे.त्याच पाण्यात भाजी शिजवावी. बाहेरचे पाणी घालून भाजी शिजवल्याने भाजीची चव बिघडते. या पाण्यातभाजी शिजवताना मीठ कमीच घालावे. ही भाजी पूर्ण शिजल्यावर त्यात वरून खोबरेल तेल घालावे.
  • मुळ्याचे थालिपीठही रुचकर लागते. दोन मध्यम आकाराचे मुळे किसून घ्यावेत. किसल्यावर त्यांचा रस पिळून घ्यावा. कीस पिळल्यावर त्यातील उग्रपणा कमी होतो. किसात एक बारीक चिरलेला कांदा, एक वाटी तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, अर्धा चमचे धणे-जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा साखर, ओल्या खोबरयाचे पातळ तुकडे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ असे सगळे साहित्य एकत्र करून घालावे. गरजेपुरते पाणी टाकून मिश्रण मळून घ्यावे. प्लास्टिकच्या कागदावर किंवा केळीच्या पानांवर तेलाचा हात लावून मळलेल्या पिठाची थालिपिठे थापावी. तव्यावर तेल गरम करून ती मंद आचेवर भाजावी. दही किंवा लोण्यासोबत पानात वाढावीत..
  • श्रावणी सोमवारला मुळा खूप महत्त्वाचा आहे. तो उपवास सोडताना आवश्यक असतो.

संदर्भ[संपादन]