नाम फाउंडेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाम फाऊंडेशन
कामाचे क्षेत्र दुष्काळग्रस्त शेतकरी
प्रसिद्ध सदस्य नाना पाटेकर
मकरंद अनासपुरे
स्थापना सप्टेंबर २०१५
मुख्यालय पुणे
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

नाम फाउंडेशन हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या मराठी सिनेअभिनेत्यांनी सुरू केलेली एक धर्मादाय संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना सप्टेंबर २०१५मध्ये झाली.[१] ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करते.

पार्श्वभूमी आणि संस्थेची स्थापना[संपादन]

ऑगस्ट - सप्टेंबर २०१५ च्या दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लॅंकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते.[२] परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली.[३] या कल्पनेचे रूपांतर नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली.[१]

संस्थेला मदत[संपादन]

संस्थेची स्थापना झाल्याझाल्या संस्थेमध्ये मदतीचा ओघ सुरू झाला. स्थापनेपासून दोनच आठवड्यांत साडेसहा कोटी रुपये जमा झाले. संस्थेला वैयक्तिक देणगीदारांबरोबरच विविध गणेश मंडळे, संस्था, संघटना यांनीदेखील मदत केली. भारतातून तसेच भारताबाहेरून, अमेरिकेतूनसुद्धा मदत आली.[४]

संस्थेचे नियोजित कार्य[संपादन]

या संस्थेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम ही संस्था राबवणार आहे. या संस्थेने धोंदलगाव (ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) आणि आमला (जि. वर्धा) ही गावे दत्तक घेतली आहेत.[५] फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील ५०० तरुणांना व ३० महिलांना रोजगार देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे संस्थेची कार्यालये असणार आहेत.[४]

बाह्य दुवे[संपादन]

फाऊंडेशनचे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link].परभणी जिल्ह्यातील झरी या गावात जलसंधारणाची कामे नाम फाऊंडेशनने लोकसहभागातून केली.

संदर्भ[संपादन]