तरावाची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तरावाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान तरावा ॲटॉलच्या आसपास २०-२४ नोव्हेंबर, १९४३ दरम्यान लढली गेलेली लढाई होती. गॅल्व्हेनिक मोहीमेचा भाग असलेल्या या लढाईत सुमारे ६,६०० जपानी, कोरियन आणि अमेरिकन सैनिक मृत्यू पावले.

ऑगस्ट १९४२पासून सुमारे एक वर्ष सतत काम करून जपानी आरमाराने या बेटांवर ठाणे तयार केले होते. व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या या ठिकाणी दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने हल्ला चढविल्यावर तेथील २,६३६ जपानी सैनिक आणि २,२०० (१,००० जपानी व १,२०० कोरियन) कामगारांनी कडाडून प्रतिकार केला. ५३,००० पेक्षा अधिक अमेरिकन सैन्याविरुद्ध लढताना जपानी शिबंदीने शेवटचा सैनिक मरेपर्यंत लढाई केली. लढाईच्या शेवटी त्यांच्यातील फक्त १७ सैनिक आणि १२९ कामगार दोस्त राष्ट्रांच्या हाती जिवंत लागले. दोस्त राष्ट्रांचे जमिनीवर सुमारे २,७०० सैनिक कामी आले तर यू.एस.एस. लिस्कोम बे या एस्कॉर्ट कॅरियरला मिळालेल्या जलसमाधीत ६८७ खलाशी आणि सैनिक मृत्यू पावले.

७६ तास चाललेल्या या लढाईने दोस्त राष्ट्रांचा व्यूहात्मक दृष्ट्या फारसा फायदा झाला नाही.