आर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्य (Arya) ही संज्ञा सप्तसिंधु किंवा सप्तमुखी सिंधू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागात राहणाऱ्या ऋग्वेदकालीन अतिप्राचीन लोकांसाठी वापरली जाते. आर्यांनी वैदिक संस्कृती विकसीत केली होती. सप्तसिंधु हा सात महान नद्यांचा प्रदेश होता. यामध्ये लुप्त झालेली सरस्वती नदी तसेच सतलज (शतुद्री), बियास (विपाशा), रावी (परुष्णी), चिनाब (असिक्नी), झेलम (वितस्ता) आणि सिंधू या नद्यांचा समावेश होतो. ऋग्वेदामध्ये या सर्व नद्यांचा उल्लेख आढळतो. आजकाल भारतात हे मुलाचे नाव म्हणून वापरले जाते.

आर्यांच्या वसाहती[संपादन]

प्राचीन काळातील स्रोतांनुसार सप्तसिंधू चा प्रदेश हे आर्य व वैदिक सभ्यते चे मूल स्थान आहे. इ.सन पूर्व 1500 ते 1000 च्या काळात वैदिक सभ्यता अस्तित्वात होती

इ.सन पूर्व 1500 च्या काळात वैदिक सभ्यतेचाअंत होऊन आर्यांच्या विविध वसाहती निर्माण झाल्या. त्यांमध्ये 16 महाजनपदे प्रमुख होती.

यात प्रामुख्याने :-

पौराणिक पूर्वावर्ती :-

अयोध्या चे इक्ष्वाकु वंशी

मथुरा चे यदुवंशी

अहिछत्र चे पांचालवंशी

हस्तिनापुर चे कुरूवंशी

उत्तरवर्ती :-

कपिलवस्तु चे शाक्य

वैशाली चे लिच्छवी

पिप्पलीवन चे मौर्य

कुशीनगर चे मल्ल


तसेच मगध,अंग,सिंध,चेदी,कुरू,पांचाल,तक्षशिला यांचा समावेश होतो.

आर्यांची राज्यव्यवस्था[संपादन]

सुरुवातीच्या काळात टोळ्या-टोळ्यांनी राहणाऱ्या आर्यांनी सप्तसिंधूगंगा-यमुनाच्या खोऱ्यातील सुपीक जमीन, मुबलक पाणी, शेतीपशुपालनास पूरक साधन संपत्तीमुळे भटके जीवन सोडून स्थिर जीवनास सुरुवात केली. स्थिर जीवनाच्या प्रारंभी आर्यांचा अनार्यांशी संघर्ष झाला तसाच तो आपसापातील टोळ्या-टोळ्यांमध्येही झाला. पशुधन व प्रदेशप्राप्तीसाठी आर्यांच्या टोळ्या संघर्ष करत असत.

आर्यांच्या कुटुंबसंस्थेतून राजसत्ता उदयास आली. अनेक कुटुंबे मिळून ग्राम म्हणजे खेडे होत असे. अनेक खेडी मिळून 'विश' बनत असे. तर अनेक विश मिळून 'जन' किंवा 'राष्ट्र' निर्माण होई. जन प्रमुखास राजन किंवा राजा म्हटले जाई. लोक आपल्या टोळीच्या रक्षणासाठी बलशाली व मुत्सद्दी व्यक्तीची राजा म्हणून निवड करत असत. राजाला राजधर्म पालनाची शपथ घ्यावी लागे. शत्रु टोळीपासून प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे प्रथम कर्तव्य होते. राजधर्म न पाळणाऱ्या राजाला ठार अथवा पदभ्रष्ट करण्यात येई. राजसत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'सभा' आणि 'समिती' या दोन संस्था वैदिक काळांमध्ये कार्यरत होत्या. उत्तर वैदिक काळात त्यांचे महत्त्व कमी हेत गेले व राजपद वंशपरंपरागत बनत गेले.

आर्यांचे आर्थिक जीवन[संपादन]

आर्य सप्तसिंधूच्या सुपीक परिसरात राहात होते. तेव्हा सुरुवातीच्या काळात पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. तोच त्यांच्या आर्थिक जीवनाचा पाया होता. आर्य गंगा-यमुनाच्या खोऱ्यात पोहोचले तेव्हा शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय झाला. गहू, सातू, जव, ऊस, कापूस, मोहरी, फळभाज्या यांचे उत्पादन आर्य घेत असत. शेतीबरोबरच पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जाई. गायींचा वापर विनीमयाचे साधन म्हणून केला जाई. विनिमयाच्या साधनात 'निष्क' या नाण्याचा वापरही केला जाई. त्याकाळी गायींच्या संख्येवरून कुटुंबाची आर्थिक स्थिती ठरवली जाई. शेतकरी आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग राजाला कर म्हणून देत असत.

आर्यांचे सामाजिक जीवन[संपादन]

आर्यकालीन समाज खेड्यामध्ये विभागला होता. त्यांची घरं साध्या पद्धतीची असून घरांसाठी लाकडाचा वापर केला जाई. घराचे छत गवताने शाकारले जाई. आर्यांच्या आहारामध्ये अन्नधान्याबरोबर दूध, दही, लोणी, तूप, फळे, भाजीपाला व मास यांचा समावेश असे. समाजाच्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जात असे. गावाच्या प्रमुखाला 'ग्रामणी' असे म्हटले जाई.[ संदर्भ हवा ] आर्यांची कुटुंबव्यवस्था पितृसत्ताक होती. जेष्ठ पुरुष कुटुंबप्रमुख असे. त्यास 'गृहपती' असे म्हटले जाई. समाज पितृसत्ताक असला तरी मुलींना पती निवडीबाबत मोकळीक होती.[ संदर्भ हवा ] विश्ववरा, घोषाला या सारख्या स्त्रियां ऋग्वेद काळात होऊन गेल्या. विद्वान स्त्रिला ;ब्रम्हवादिनी; असे म्हटले जाई. ऋग्वेद काळात वर्णव्यवस्था लवचीक असून ती व्यवसायावर आधारलेली होती.

उत्तर वेदकालीन समाज जीवनात अनेक बदल घडून आले. वर्णव्यवस्थेत ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यानंतर शूद्र हा चवथा वर्ण निर्माण झाला. वर्णव्यवस्था पुढे जातिव्यवस्थेत रूपांतरित झाली.