आर्थर मिलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्थर मिलर
जन्म नाव आर्थर अ‍ॅशर मिलर
जन्म १७ ऑक्टोबर, इ.स. १९१५
हार्लेम, न्यू यॉर्क
मृत्यू १० फेब्रुवारी, इ.स. २००५
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र नाटककार, निबंधकार
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार नाटक, निबंध
प्रसिद्ध साहित्यकृती डेथ ऑफ अ सेल्समन, द क्रुसिबल, अ व्ह्यू फ्रॉम द ब्रिज
स्वाक्षरी आर्थर मिलर ह्यांची स्वाक्षरी

आर्थर अ‍ॅशर मिलर (इंग्लिश: Arthur Asher Miller) (१७ ऑक्टोबर, इ.स. १९१५ - १० फेब्रुवारी, इ.स. २००५) हा अमेरिकन नाटककार व निबंधकार होता. अमेरिकन रंगभूमीच्या क्षेत्रात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याने ऑल माय सन्स (इ.स. १९४७), डेथ ऑफ अ सेल्समन (१९४९), द क्रुसिबल (इ.स. १९५३), इत्यादी प्रसिद्ध नाटके लिहिली आहेत.

हाऊस अन-अमेरिकन अ‍ॅक्टिव्हिटीज् कमिटीपुढे द्यावी लागलेली साक्ष, नाटकासाठी मिळालेला पुलित्झर पुरस्कार, मर्लिन मन्रोशी लग्न इत्यादी घडामोडींमुळे तो १९४०, १९५० आणि १९६० च्या दशकांत सतत चर्चेत राहिला.

जीवन[संपादन]

इ.स. १९१५मध्ये न्यू यॉर्क शहरातील हार्लेम विभागात आर्थर मिलराचा जन्म झाला. इसिदोर आणि ऑगस्टा मिलर या दांपत्याच्या तीन मुलांपैकी आर्थर हा दुसरा मुलगा होय. त्याचे वडील हे अशिक्षित परंतु बऱ्यापैकी श्रीमंत व्यापारी होते. त्यांचे स्त्रियांच्या कपड्यांचे दुकान होते. इ.स. १९२९च्या वॉल स्ट्रीट मंदीमध्ये मिलर कुटुंबाची जवळपास सर्व मालमत्ता गेली. घरखर्चाला मदत म्हणून मिलर घरोघरी पाव वाटण्याचे काम करत असे. इ.स. १९३२साली अब्राहम लिंकन हायस्कुलातील शिक्षण पूर्ण केल्यावर कॉलेज फीसाठी त्याने बरीच छोटीमोठी कामे केली.

युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथे, मिलराने पत्रकारिता विषयात प्रावीण्य संपादन केले. 'द मिशिगन डेली' या विद्यार्थ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या वृत्तपत्रात त्याने वार्ताहर आणि रात्रपाळीचा संपादक म्हणून कामही केले. याच काळात त्याने आपले पहिले नाटक 'नो व्हिलन' लिहून काढले. मिलराने नंतर इंग्लिश हा मुख्य विषय घेऊन 'नो व्हिलन' या नाटकासाठी अवेरी हॉपवुड पारितोषिक मिळवले. या पारितोषिकाने त्याच्या नाटककार बनण्याच्या विचाराला चालना दिली. केनेथ रो या प्रसिद्ध प्राध्यापकांच्या नाट्यलेखन कार्यशाळेत तो सहभागी झाला. रो यांनी मिलराला नाटके लिहिण्याच्या दृष्टीने चांगले मार्गदर्शन केले. इ.स. १९३७मध्ये मिलराने 'ऑनर्स अ‍ॅट डॉन' हे नाटक लिहिले. या नाटकालादेखील अवेरी हॉपवुड पारितोषिक मिळाले.

इ.स. १९३८साली मिलराला बी.ए. (इंग्लिश) ही पदवी मिळाली. पदवी मिळाल्यानंतर तो फेडरल थिएटर प्रकल्पात (रंगभूमीशी संबंधित नोकऱ्या मिळवून देणारी एजन्सी) सामील झाला. अमेरिकन कॉग्रेशीने साम्यवादी घुसखोरीच्या संशयावरून इ.स. १९३९मध्ये हा प्रकल्प बंद केल्यावर मिलर ब्रुकलिन गोदीत काम करू लागला. तसेच तो रेडिओसाठी नाटके लिहू लागला.

५ ऑगस्ट, इ.स. १९४० रोजी त्याने त्याची प्रेयसी, मेरी स्लेटरी हिच्याशी लग्न केले. त्यांना जेन आणि रॉबर्ट अशी दोन मुले झाली. रॉबर्ट हा लेखक व चित्रपट दिग्दर्शक झाला. त्याने इ.स. १९९६साली 'द क्रुसिबल' नाटकावरून चित्रपट निर्मिला.