"भगवानबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.7.2) (सांगकाम्याने काढले: en:Bhagawanbaba
ओळ ५१३: ओळ ५१३:
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:हिंदू संत]]


[[en:bhagwan baba]]
[[en:bhagawan baba]]
[[en:bhagawanbaba]]
[[hi:भगवानबाबा]]
[[hi:भगवानबाबा]]

२०:४४, ६ मार्च २०१३ ची आवृत्ती



'श्री संत भगवानबाबा'

भक्तियोगी श्री संत भगवानबाबा
मूळ नाव आबाजी तुबाजी सानप
जन्म जुलै २९, इ.स. १८९६
सुपे सावरगाव, पाटोदा, बीड, महाराष्ट्र
निर्वाण जानेवारी १८, इ.स. १९६५
रुबी हॉल क्लिनिक, पुणे, महाराष्ट्र
समाधिमंदिर भगवानगड
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय वारकरी, नाथ संप्रदाय
गुरू संत एकनाथ, संत तुकाराम, गीतेबाबा दिघुळकर, माणिकबाबा, बंकटस्वामी
शिष्य भीमसिंह महाराज
भाषा मराठी
कार्य अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
प्रसिद्ध वचन हेवा-दावा, मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वराचा अंश असेल तर आपण भगवंतालाच नाराज करणार का कि जो आपला निर्माता आहे.
संबंधित तीर्थक्षेत्रे भगवानगड
व्यवसाय कीर्तनकार
वडील तुबाजी सानप
आई कौतिकाबाई सानप

आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५ रुबी हॉल क्लिनिक, पुणे) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत आहेत. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या कालखंडात संतपदाला पोहोचलेले ते पहिले महापुरूष आहेत. त्यांना स्वत: तुकाराम महाराज यांनीच स्वप्नबोध केला होता असे मानले जाते. तुकारामोत्तर कालखंडात वारकरी धर्माला प्रेरणा देण्याचे महान कार्य त्यांनी केले. ते संत एकनाथांच्या परंपरेतील नाथफडाचे/पैथनकर फडाचे प्रसिद्ध टाळकरी संत होते. ते भागवत धर्माचा झेंडा फडकाविणारे एक प्रबोधनकर्ते कीर्तनकार होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यांनी पाण्यावर तरंगून ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठगमन केले. प्राणत्याग करताना त्यांनी वारकरी महावाक्याचा जयघोष केला.

भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा त्यांच्या काळातील समाजावर फार मोठा प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे. वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना त्यांनी केली. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मुलन, शिक्षणप्रसार, वार्षिक नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे. [१]

सानप घराण्याची पूर्वपीठिका

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात संत महाराष्ट्रात होऊन गेले त्यांच्यापैकी संत श्री भगवानबाबा हे एक होते.भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वंजारी जातीत जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत. घराणे सदाचारी, संपन्न व लौकिकवान होते. घराण्यात अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी होती. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव या गावी स्थायिक झाले होते. तेथे त्यांची बरीच मोठी शेतजमीन होती.

भगवानबाबा यांच्या जन्माच्या आधीपासूनच सानप कुटुंबाला काही अद्भूत गोष्टींची अनुभुती येत होती. कौतिकाबाई गरोदर असताना त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला होता, असे सांगितले जाते. आपल्या पोटी जन्माला येणारे हे बाळ महान आहे, याची जाणीव कौतिकाबाईंना झाली होती. त्या गरोदर असतानाच सावरगावात अखंड विठ्ठलनाम सप्ताह चालू होता. सप्ताहात भावार्थ रामायण कथा सुरू होती. या कथेला कौतिकाबाई भक्तिभावाने जात असत. हनुमंतांची भक्ती पाहून कौतिकाबाईंच्या मनात आले की, अंजनीच्या पोटी जसा हनुमान जन्मला तसाच माझ्या पोटीही भक्तिसंपन्न पुत्र जन्माला यावा. त्याच रात्री त्यांना स्वप्नात साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडले. पांडुंरग आपल्याला आशीर्वाद देत आहे असे त्यांना जाणवले.

जन्म आणि बालपण

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. जन्मसमयी वाड्यामध्ये १०८ दिवे लागले, असे सांगतात. बारशाच्यावेळी मुलाचे नाव 'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. आबाजी हे कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.

लहानपणापासूनच आबाजी खूपच हुशार, अत्यंत तल्लख बुद्धी, चाणाक्ष स्मरणशक्ती आणि निर्भयी वृत्तीचा होता. भगवानबाबा लहानपणापासुनच अतिशय हुशार आणी चंचल होते. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचेच असा त्याचा निश्चयही होता. गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरूजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे.

पंढरपूरचा विठ्ठल हेच त्याचे परमदैवत होते. याच वयात त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. 'पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते' असे म्हणून त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले. विठ्ठलदर्शन झाल्यावर आबाजीचे मन गहिवरले आणि त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. भक्त पुंडलिकाच्या गावी पंढरपूरला गीतेबाबांनी आबाजीच्या गळ्यात पवितर तुळशीमाळ घातली आणि त्यांना गीतेबाबा हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. त्यानंतरही अनेकदा वारीचा आनंद त्यांनी घेतला. पंढरपूरच्या वारीवरुन गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील पवनपुत्र हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते धावतच मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.

अध्यात्म, परमार्थाबद्दलची ओढ आबाजीचे प्रपंचात मन रमू देत नव्हती. एके दिवशी सावरगावी कोणीतरी दीक्षा देणारे गुरू आले होते. ते पाहून लहान आबाजी गुरूपदेश घेण्यासाठी घरच्यांना विनवू लागला. आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरेचे गुरू म्हणून लाभले होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. तेथे वडील तुबाजीरावांनी आबाजीला माणिकबाबाच्या पायावर घातले. आबाजीने माणिकबाबांना गुरूपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. आबाजीने नारायणगडावर राहण्यांचा हट्ट धरला आणि बराच वेळा अनुग्रह दे म्हणुन आग्रह केल्यानंतर रागावून माणिकबाबांनी तू नारायणगडावरील मंदिराच्या शिखरावरून उडी मार असे म्हणाले. काही क्षणातच आबाजीने नारायणगडावरील मंदिराच्या शिखरावरून माणिकबाबांचे नाव घेत उडी मारली पण त्याला थोडेसेही खरचटले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले होते. त्याच्या साहसीपणाचे माणिकबाबांनी तोंड भरून कौतुक केले. आबाजीची भक्ती पाहून हा मुलगा अनुग्रह देण्यास योग्य आहे असा विचार करून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरूपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव 'भगवान' ठेवले.

त्याच्या मनात माणिकबाबांनी अध्यात्माला खतपाणी घालून भक्तिभाव मजबूत रुजवला. माणिकबाबांकडून घेतलेल्या गुरूपदेशाची कठोर साधना आबाजीने केली. नाथ संप्रदायाप्रमाणे गुरूशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही. भगवानबाबांना गुरूपदेश देणारे गुरु माणिकबाबा मिळाले व भगवानबाबांचे जीवन कृतार्थ झाले.

असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.

गुरु परंपरा

भगवानगडाच्या मान्यतेनुसार भगवानबाबाची गुरु परंपरा पुदिल प्रमाने आहे. नारायण → ब्रह्मदेव → अत्री ऋषी → दत्तात्रेय → जनार्दनस्वामी → संत एकनाथ → गावोबा किंवा नित्यानंद → अनंत → दयानंद स्वामी पैठणकर → आनंदॠषी → नगदनारायण महाराज → महादेव महाराज (पहिले) → शेटीबाबा (दादासाहेब महाराज) → गोविंद महाराज → नरसू महाराज → महादेव महाराज (दुसरे) → माणिकबाबा → भगवानबाबा [२]

भगवान बाबा आणखी काही विठ्ठलभक्तांना आपले गुरू मानत. बाबांचे हे गुरू असे

त्यांनी पारमार्थिक गुरू संत नामदेवबाबांना मानले होते व त्यांच्या दर्शनासाठी श्री सदगुरु मठ, मेहकरी येथे भगवानबाबा जात असत. संत नामदेवबाबांच्या वैकुंठवासानंतर त्यांच्या चाळिसाव्या हरिनाम सप्ताहाचे कीर्तन भगवानबाबांनीच केले होते. [४]

तुकोबांचा बोध लाभलेले तिसरे संत

भगवानबाबा यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी स्वप्नात येऊन बोध केला, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. यापूर्वी तुकोबांकडून स्वप्नबोध होण्याचे भाग्य निळोबा पिंपळनेरकर, बहिणाबाई शिवूरकर या दोघांनाच लाभलेले आहे. भगवानबाबा हे या परंपरेतील तिसरे स्वप्नबोधी संत ठरले आहेत. अशा प्रकारे भगवानबाबा हे थेट तुकोबांचे शिष्य ठरतात. भगवानबाबा यांच्या स्वप्नबोधाबाबत वारकऱ्यांमध्ये प्रचलित कथा अशी : भगवान बाबा अवघे ८ वर्षांचे असताना त्यांना तुकोबांनी स्वप्नबोध केला. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे भगवानबाबा यांच्या शेतात भर दुपारी ही घटना घडली. त्या दिवशी भगवानबाबा गुरे चारीत होते. दुपारी एका आंब्याच्या झाडाखाली बाबांनी गुरे बसविली. स्वत: बाबा खोडाला पाठ टेकून डोळे मिटून बसले. बाबांच्या मुखातून संतांचे अभंग गायन सुरू होते. काही क्षणांत बाबांना गुंगी आली. त्याच वेळी तुकोबांनी त्यांना दृष्टांत दिला. तुकोबांनी त्यांना हलवून जागे केले. तुकोबांनी दोनच ओळी उच्चारल्या - कार्य तुज सांगितले । लोक कल्याण वहिले ।। (अर्थ : लोकांचे कल्याण करणे, हे कार्य तुला सांगितले गेले आहे.) भगवानबाबा खडबडून जागे झाले. त्यांनी पाहिले, आंब्याचे झाड सूर्याच्या तेजाने तळपत होते.

शिक्षण

एकदा महाराष्ट्राचे थोर सत्पुरूष संतशिरोमणी ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांचे नारायणगडवर आगमन झाले. माणिकबाबांनी भगवानबाबांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी बंकटस्वामींच्या स्वाधीन केले. बंकटस्वामींनी भगवानबाबांना आळंदी येथील वारकरी संस्थेत नेले. आळंदीत त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेथे जोगमहाराज, धुंडामहाराज देगलूरकर, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर यांच्यासारख्या विद्वान सात सद्गुरूचे संग लाभले आणि भगवानबाबांचे आयुष्य पालटले. भगवानबाबांनी बंकटस्वामींना आध्यात्मिक गुरू मानले व एकनिष्ठेने मनोभावे गुरुसेवा केली. बंकटस्वामींनी भगवानबाबांना अध्यात्मसमृद्ध केले. बंकटस्वामीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तेथे त्यांनी संन्यासी धर्म स्वीकारला.

या साधनेच्या कालावधीमध्ये ते भगवंताच्या मंत्राचे पुरश्चरण करीत, हरिनामस्मरण करीत असत. नामस्मरण करून झाल्यावर त्यांच्याकडूनच भगवानबाबांनी वेदान्त, योग, भक्तियोग, विद्या, अभंग, आरत्या, भूपाळ्या, सिद्धी व अध्यात्मज्ञानांचे शिक्षण घेतले. भगवानबाबांनी १२ वर्षांत जप, तप, अनुष्ठान, हरिपाठ, ध्यान आणि वेदाध्ययनात प्रावीण्य मिळवले. यात पदे, ऋचा, वेद, स्तोत्र, व्याकरण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, पुराणे, उपनिषदे, सिद्धांतकौमुदी, ब्रह्मसूत्र, भागवत, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. वाचन करून करून अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, विचारसागर, नामदेवाची गाथा, एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा तोंडपाठ केली. त्यांनी मृदंग, टाळ वाजवणे, गायन, वादन, निरुपण, प्रवचन आदी कला आत्मसात केल्या होत्या. ब्रह्मविद्या, योगशास्त्र, अनेक विद्यांमध्ये ते पारंगत झाले.

याचवेळी भगवानबाबांचे गुरुबंधू सावरगावचे गणपतबुवा, वामनभाऊ, नेकनूरचे भागुजीबुवा यांच्या संगतीत अध्ययन करत होते. या सर्वांमुळे व्यासंग वाढून वैराग्याला प्रगल्भता, प्रखरता आली. भगवानबाबांनी अध्यात्मज्ञानांचे शिक्षण संपल्यानंतर गुरूसूचनेनुसार पुढे आपले कार्यक्षेत्र नारायणगड हे निश्चित केले.

नारायणगडावरील कार्य

आळंदीवरून नारायणगडावर भगवानबाबा परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील भाविक येऊ लागले. त्याच सुमारास बंकटस्वामींच्या कीर्तन प्रसारासाठी वार्ता कानी पडल्याने त्यांनी प्रभावित होऊन समाजप्रबोधन करण्याचा निश्चय केला. भगवानबाबा भाविकांच्या आग्रहास्तव व आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने कीर्तन करू लागले.

इ.स.१९१८ साली त्यांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू केली. तेव्हापासून नारायणगडाला 'धाकटी पंढरी' म्हणतात. इ.स.१९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. पुढे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन, कथाकथन, हरिनामजप व गाथापारायणे होत. पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले.

असेच एका दिवशी भगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे सर्वेसर्वा माणिकबाबा आजारी असल्याची बातमी भगवानबाबांना कळली तसे ताबडतोब ते नारायणगडावर आले. भगवानबाबांना पाहिल्यावर गुरुच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले. भगवानबाबांना सर्व कळले होते. माणिकबाबांनी हात उंचावून भगवानबाबांना जवळ बोलवले. 'भगवान, तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील' असे सांगितले. मरतेवेळेस माणिकबाबांनी गुरुभक्ती व शिष्य परंपरा चालू ठेवण्याची आज्ञा केली व ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, इ.स. १९३७ रोजी त्यांनी आपला देह ठेवला.

काही काळ उलटल्यानंतर तेथीलच वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी बाबांना त्रास देण्यास सुरुवात केली. भगवानबाबांवर लोभाचा आळ घेतल्यावर त्यांनी नारायणगडाचा परित्याग केला. असे असले तरी त्यांचे मन माणिकबाबांच्या चरणांशी गुंतलेले होते. या सर्व प्रकारानंतर बाबांनी तपश्चर्येस हिमालयात जाण्याचे ठरवले व ते हिमालयाकडे निघाले. खरवंडी येथील बाजीराव पाटीलांनी भगवानबाबांचे मन बदलविले व भगवानबाबांना ते धौम्यगडावर घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले व सदमार्गाला लावले.

धौम्यगडाचा जीर्णोद्धार

यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वत: वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वत:चे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वत:च्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खर्‍या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खर्‍या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.

पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. [५]

पालखी

भगवानबाबांनी आपल्या कार्यातील बराच काळ नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा या मार्गाने जाते. वाखरी येथे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला आडवे जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी पंढरपूर वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय’चा नामस्मरण करीत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. भगवानबाबांना आपल्या परंपरेचा अभिमान होता. ’मी नाथफडाचा टाळकरी आहे’ असे ते म्हणत. नाथसंस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा भगवानगडास मान आहे.

संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे.

व्यक्तिमत्त्व

भगवानबाबांची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच होती. त्यांची राहणी साधी व विचारसरणी उच्च होती. श्री संत भगवानबाबा पांढरेशुभ्र साधे धोतर, पांढराशुभ्र सदरा, पांढरा फेटा वापरत. कधी गुडघ्यापर्यंत पोचणारा कोट घालत. रुंद, भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ हाच त्यांचा थाट होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंचेपुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यांमुळे ते भारदस्त वाटत. हातांत काठी, पायात चप्पल किंवा बूट असे. ते शिस्तीचे तसेच उत्तम मनुष्यपारखी होते.

जीवनकार्य

अठराव्या शतकातील महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मराठवाड्य नजीकच असलेल्या प्रदेशात तर परिस्थिती फारच बिघडलेली होती. या प्रदेशावर मराठेशाहीच्या अस्तानंतर निजामाची राजवट प्रस्थापित झाली होती. या दशकाच्या उत्तरार्धात निजामाचे वर्चस्व वाढले. त्याबरोबर निजामाच्या आक्रमणामुळे धर्म, देवांचे उत्सव बंद पडले होते. त्यांच्या अमानुष अन्यायात, त्रासात आणि जुलमात समाज भरडला जात होता. बायका, मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हते. धर्माचे साम्राज्य बुडाले होते. धर्माचे पालन करणे समाज विसरला होता. धर्म बाटविला जात होता. आकांत, कर्मकांड आणि कर्मठपणा यात अडकलेला समाज बळी पडत होता. अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धा, मांसाहार, धर्मांतरण अशा परिस्थितीत समाज पिचून निघाला होता. समाज हीन, दीन, त्रस्त व अपमानित अवस्थेत होता. अशा समयी राजकीय अस्थिरतेच्या काळात माजलेला हाहाकार संपवण्यासाठी, धर्मसंकट पार करण्यासाठी, समाजाचे चाललेले शोषण रोखण्यासाठी, अंधश्रद्धांनी जर्जर झालेल्या समाजाला सुधारण्यासाठी, समाजाकल्याणसाठी, भावनिक एकात्मता जपण्यासाठी आणि समाजाला दिशा दाखवण्यासाठी, अधर्माच्या अंधकारातून आध्यात्मिक प्रकाशाकडे जाण्यासाठी, रूढी-परंपरेला चिकटून बसलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी तसेच अंध:कारमय जीवनात प्रकाशाचा कवडसा निर्माण करण्यासाठी गीतेतील वचनाप्रमाणे भगवानबाबा अवतरले. त्यामुळे समाजपरिवर्तनास गती आली, भागवत धर्माचे पुनरुज्जीवनासाठी प्रेरणा दिली. आधुनिक समाजप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी झटणार्‍या बाबांनी आपल्या श्रद्धा व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. बाबांनी जनतेच्या भक्तिसुरक्षाकवच म्हणून महारथीची भूमिका बजावली. त्यांनी कायम आदर्श महानायकाच्या, समाजसुधारकाच्या, सामाजिकसंतुलनाच्या भूमिकेत मार्गदर्शन केले.

भक्तिमार्गप्रसाराचे कार्य

भगवानबाबांनी भक्तिमार्गप्रसाराचा यज्ञ सुमारे इ.स.१९१८ साली चेतवला. त्यांनी आयुष्यभर भक्तिमार्गप्रसाराचे अस्मितेचा अंगार पेटता ठेवला. महाराष्ट्राच्या लाखो माणसांचे भगवानबाबा प्रमुख आधारस्तंभ होते तर वारकरी संप्रदायाचे तारणहार होते. भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती. त्यांनी असंख्य भाविकांना व्यसने, दुराचरण, दुरभिमान, कलह यांपासून सोडविले. गोरक्षण, अन्नदान, वैदिक अनुष्ठान, नामस्मरण, भजनसप्ताह, तीर्थयात्रा अशारीतीने भाविकांमध्यें धर्माबद्दल व भक्तीबद्दल जागृती केली. भगवानबाबांनी समाजात समता, बंधुता, एकात्मता, जागृती, हरिनामाची गोडी स्थापन करण्यासाठी रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कीर्तनात विठ्ठलावरील प्रेम, भक्तिभाव व भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्म व वारकरी संप्रदाय प्रसाराचे कार्य केले. भगवानबाबांनी वारकरी संप्रदायात राहून समाजपरिवर्तनाचे काम केले. भरकटलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी भगवानबाबांनी गावागावांमध्ये वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह सुरू केले. भगवानबाबा गावागावांमध्ये हिंडून सर्व स्तरांशी संपर्क साधून त्यांच्या बोलीत हृद्यसंवाद साधणारे आदर्श भक्तवात्सल्य पंथप्रसारक होते. त्यांनी भाविकांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. त्यांनी धर्माच्या वचनांचा खरा अर्थ सांगून भाविकांना सन्मार्गाला लावले. त्यांनी कीर्तनद्वारे भगवंताच्या नामस्मरणभक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. मराठेशाहीच्या अस्तानंतर एखाद्या झंझावाताप्रमाणे बाबा अवतरले व भागवत धर्माचा वारसा त्यांनी पुढे चालवला. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वाभिमानाचे, धर्मचळवळीचे स्फुर्ती चेतवण्याचे काम केले. त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानामुळे कारकिर्दीलाही वेगळा आयाम प्राप्त झाला होता व त्यांनी स्वत:ची अशी एक पकड सामान्य माणसांवर निर्माण केली होती. भागवत धर्मावरील निजामाचे आक्रमण कारणीभूत आहे अशी खात्री बाळगून भगवानबाबा यांनी कीर्तनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केली व त्यातूनच धर्मचळवळ जन्मास आली. केवळ आपल्या कीर्तनद्वारे आणि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर जबर पकड बसविण्याच्या बाबांच्या व्यक्तिमत्त्वातील लौकिक गुण याची इतिहासाला अत्यंत गौरवाने दखल घ्यावी लागली.

अहिंसावादाची शिकवण

जिवंत प्राण्यांचा बळी देणे धार्मिक भावनेने हा धर्म नसून महान अधर्म आहे. मराठवाड्यात देवतांपुढे बोकडांची हत्या करण्याची रुढी-परंपरा त्यांनी बंद पाडली आणि समाजाला अहिंसावादाची शिकवण दिली. माजलगाव, पाथर्डी, धारूर, केज, शेगाव यांसह अनेक गावांतील पशुहत्या त्यांनी बंद केली. माळ घालणाऱ्याला मांसाहार करशील का? असा प्रश्न विचारुन त्याचं नकारात्मक उत्तर आल्यावरच ते त्याला माळ घालीत. वंजारी समाजातील मांस खाण्याच्या प्रथेला भगवानबाबांनी विरोध केला. आजही वंजारी समाजात माताभगिनी त्यांचे श्रद्धेने पालन करतात. गोहत्याबंदीची भावना त्यांनी रुजविली व त्या काळातील रूढी-परंपरेला छेद दिला. देवाची खरी भक्ती समजावण्यासाठी आपले आयुष्य जनसेवेला अर्पिले.

धर्मनिरपेक्षतेची शिकवण

भगवानबाबापुढे सर्व लोक समान होते. भगवानबाबा हे मानवतेचे मोठे पुरस्कर्ते प्रतीक होते. त्यांनी धर्मसहिष्णूता, धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली.बाबांनीही आयुष्यभर याच भूमिकांचा पुरस्कार केला. मानवतेची ज्योत मनामनात तेवत ठेवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. समाजव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सातत्याने सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम केले. भगवानबाबांचे नाव इतके लोकप्रिय झाले की ते आपलेच संत आहेत असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटे. त्यांच्या भाविकांमध्ये अनेक जाती, धर्म आणि पंथांचे लोक आहेत. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा भक्त-परिवार वाढत चालला. त्यांनी सामाजिक तेढ निर्माण झालेल्या चिंचाळा गावात दोन समाजांत समेट घडवून आणली. एका गावात दैवताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती, तेथे मुस्लिम मिस्त्री असल्यामुळे संयोजकांनी त्याला विरोध केला, तो भगवानबाबांनी अमान्य करत त्या मुस्लिम मिस्त्रीलाच ते काम करू दिले. जातपात, उच्चनीचता, जातीभेद, धर्मभेद व पंथभेद दूर करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. ते धर्मप्रबोधनाचे उद्गाते ठरले. समाजात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता, आदरभाव, एकदुसर्‍याबद्दल प्रेमाची भावना, दया, क्षमा, शांतता, त्यागी वृत्ती आणि भक्ती या ज्या संकल्पना आहेत, त्याचा खोलवर विचार केल्यास ही धर्मनिरपेक्षतेची शिकवण भगवानबाबांनी बहाल केली.

समाजप्रबोधनचे कार्य

माणसाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे तसेच सर्वमध्ये ज्यांना भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे असे स्पष्ट सांगणारे ,कीर्तनातून देव दगडात नसून तो माणसांत आहे हे भगवानबाबांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. खरे तत्त्वज्ञान बहुजन समाजापुढे आल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणामुळे खरा देव समजला. बहुजन समाजातील अनेक वाईट चालिरीती कीर्तनाच्या माध्यमातून पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एक रोकडा धर्म दिला. तिच खरी भक्ती आणि देवपूजा सांगितली. भगवानबाबांनी अत्यंत अडाणी, दीनदुबळ्या समाजाला नवचैतन्य दिले. दीनदुबळ्या समाजाला नवा आशेचा किरण दाखवला. समाजातील चुकीच्या, कालबाह्य प्रथा, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी, अन्यायकारक परंपरा, अज्ञान, दुर्गुण, दोष, बुवाबाजी, गंडेदोर, अंगारा धुपार व जातीभेद वर्णव्यवस्था दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांनी अनेकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. भगवानबाबा शैक्षणिक विकास व कृषिविकास करू इच्छिणाऱ्यांसाठी हितैषी होते. आयुष्याचा प्रत्येक दिवस सार्थकी लावण्याची पराकाष्ठा करणारा लोकशिक्षक व लोकनेता त्यांच्यात दडला होता. आपल्या कीर्तनद्वारे तसेच कार्याच्या माध्यमातून जनकल्याणाची धुरा सांभाळत होते. जनसामान्यांवर उदात्त सुसंस्कार करण्याचे जणू व्रतच भगवानबाबांनी घेतले होते. त्यांनी जनकल्याणाचे व्रत स्वीकारले. प्रतिकूल परिस्थितीतही टीकेचे व निंदेचे प्रहार झेलत जनकल्याणाचे व्रत अखंडपणे विचलीत न होता पूर्ण केले. जनकल्याणाची कामे सर्वांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा समाजाला पटवून दिला. त्यांनी समाजातल्या घटकांचा उद्धार कसा होईल याविषयी समाजप्रबोधन केले. ओळख नसलेल्या सर्वसामान्यांना अस्तित्व मिळवून देणारे व माणसे घडविणारे ते चालते बोलते विद्यापिठ होते. सामाजिक परिवर्तनाचे ते शिल्पकार ठरले. समाजप्रबोधनचे चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा वारसा त्यांनी जपला.

शिक्षणप्रसाराचे कार्य

कोणत्याही दानापेक्षा ज्ञानदान हे सहस्रपटीने श्रेष्ठ आहे. हे दान जनतेस अर्पण करून या दानामुळे समाजाचा सर्वागीण विकास होण्यास मदत होते. म्हणून मनुष्यजीवन दिशाहीन बनले असते. तत्कालीन समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. हे धोरण लक्षात घेऊन बाबांनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. भगवानबाबांनी खेडोपाडी हिंडून समाजात शिक्षणाचा प्रसार केला. ते शिक्षणाचा प्रसार होऊन समाज सुबुद्ध व्हावा अशी जनहिताची कळवळ जपणारे शिक्षणमहर्षी होते. भगवानबाबांनी सामान्य माणसाला अज्ञानापासून दूर करण्यासाठी जागोजागी शाळा, वसतिगृहे इत्यादी असंख्य बांधकामे केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकले पाहिजे यासाठी त्यांनी शाळा काढल्या. समाज साक्षर व्हावा यासाठी त्यांनी शाळामोहीम काढली. विद्यावाघिणीचे दूध कष्टकरी कामकरी यांच्या मुलांना मिळाले पाहिजे. याच उद्दात हेतूने भगवानगडावर शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. औरंगाबादला वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते केले. औरंगाबादलाच भगवान होमिओपॅथी कॉलेजची स्थापना त्यांनी केली.

त्यांनी अनेक मुलींना शाळेत घातले. त्या मुली शिकल्या व त्यांनी आपले चांगले संसारही थाटले, हे दगडाबाईच्या प्रसंगावरुन आपल्या लक्षात येते. या दगडाबाईनी त्यांच्या विषयीची गौरवगीते, भक्तिगीते व अभंग लिहिले. आपला वंजारी वेष घालूनच वारीला पंढरपूरला वारकऱ्यांबरोबर घेण्याविषयीही भगवानबाबांनी तिला सांगितले. त्यांना आपल्या वारकरी परंपरेचा अभिमान होता. 'माझ्या दिंडीत असे वारकरी आहेत, याचा मला अभिमान वाटतो ' असे भगवानबाबा म्हणाले होते. ते वाक्य व तो विचार समाज परिवर्तनाच्या व सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने मोलाचे ठरले. याच दगडाबाईचा १९७४ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुरस्कार देऊन सत्कार केला यामागे भगवानबाबांचीच प्रेरणा होती. बाई इंदिरा गांधींना भेटल्या व प्रत्येक तांड्याला पाण्याची सोय करा अशी त्यांनी विनंती केल्यावर प्रत्येक तांड्यावर दोन हापसे बसविले गेले. [६] [७]

भगवानबाबांचे उपदेश

अमोघवाणीने केलेली भगवानबाबांची कीर्तने समाजाला तळागाळातून ढवळून काढणारी आणि म्हणून समाजाला योग्य दिशा देणारी ठसठशीत असत. कीर्तन म्हणजे भगवानबाबा व भगवानबाबा म्हणजे कीर्तन असे समीकरण या दशकांत रुढ झाले होते. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. अंतकरणापर्यंत पोहोचणारा कीर्तनकार असे त्यांचे वर्णन करतात. भगवानबाबा निर्मळ मनाचे, सचोटीचे, धैर्यवान, पारदर्शक, दृढनिश्चयी, दूरदृष्टी, स्पष्टवक्तेपणा, परखड वक्तृत्व, जनमनावर पकड, भागवत धर्म अस्मितेची रोकठोक विचार, विसंगतीवर मार्मिक भाष्य करणारे उत्तम वक्ते दशस्त्रेषू व्यक्तीमत्व होते. प्रेमवात्सल्यता, कोमलता, सहनशीलता, करुणा, त्यागीवृत्ती, समर्पणता, सहिष्णुता, रसाळ, निर्भयता, प्रासादिकता आदी भावना भगवानबाबांच्या कीर्तनात प्रकर्षाने दिसून येत. तत्त्वचिंतनता, सोपेपणा, तर्कशुद्धता, सदाचारी, परिपक्व, मनमोकळी, विचारी, स्पष्टवक्ती, समृद्ध शब्दरचना, नेटकी मांडणी, दिलदार शैली, विचारांची रेखीव प्रकटीकरण, वैभवशाली शब्दांची उधळण अशा भाषाशैलीत कीर्तने करत. त्यांच्या कीर्तनात भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात. प्रत्येकाशी ते भावनिक नात्याने जोडले गेले होते. आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून लोकजागृतीचा करत. त्यांनी सर्व क्षेत्रांत कीर्तने गाजविली. जवळपास चार दशके त्यांनी कीर्तनद्वारे तमाम समाजाच्या हृदयावर राज्य केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सच्चेपणामुळे त्यांच्या कीर्तनला गर्दी होत गेली. भगवानबाबांनी पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. या अखंड हरिनाम सप्ताहास लाखो लोकांनी गर्दी केली होती. या सप्ताहापासूनच भगवानबाबा आणि कीर्तनासाठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये हे इथे जुळलेले गणित फ़िसकटले नाही अशी विलक्षण लोकप्रियता असलेले भगवानबाबा हे एक संस्थानच होते. आपल्या कीर्तनातून ते संत अभंगांचा मुबलक वापरही करत.

भगवानबाबा कीर्तनात नेहमी उपदेश साधे, सोपे सांगत. सत्कर्म, सत्याचरण, परोपकार, न्याय, प्रीती आणि कर्तव्यकर्म यांचे पालन करा, कर्ज काढून व प्रपंचाकडे दुर्लक्ष करून भगवंत भेटीसाठी तीर्थक्षेत्रास जाणे ही सर्वात मोठी चूक आहे. गळ्यात तुळशीमाळ घाला, भगवंताचे चिंतन करा, परमार्थ वाढवा, मुलांना चांगले शिक्षण द्या, चोरी करू नका, उपाशी राहा पण कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, लाचार बनू नका, पशुहत्या करू नका, हिंसा करू नका, जातिभेद व अस्पृश्यता मानू नका असे रोखठोकपणे जनतेला सांगणारे समाजउद्धारक कर्मयोगी होते. त्यांनी जनसेवा हीच भगवंतची सेवा आहे म्हणून माणसाने गोरगरीबांना, दीनदलित, गरीब, दरिद्री माणसांशी माणसांसारखे वागावे तथा मुक्या प्राण्यांवर दया दाखवावी इत्यादी गोष्टींची शिकवण दिली. हाच संदेश प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान प्रत्येक मानवाला माणसांसारखे जगण्यास भाग पाडले. त्यांच्या विचाराने समाजात फार मोठे परिवर्तन झाले. एक नवीन पिढी अधिक त्यांनी घडविली.

वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह

भगवानबाबांनी इ.स. १९३४ साली वार्षिक नारळी हरिनाम सप्ताहाला पखालडोह या गावी सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येकवर्षी एक गाव अशी या सप्ताहांची मालिका चालू झाली. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले. भगवानगडाची उभारणी झाल्यावर इ.स. १९५१ साली नाथापूर येथे पहिला नारळी अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला तर इ.स. १९६४ साली शिंगोरी येथे भगवानबाबांच्या हस्ते शेवटचा हरिनाम सप्ताह पार पडला. भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भाविक ज्ञानेश्वरीपारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथा, भजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भाविकांना पुरणपोळी व दूध दिले गेले.

# वर्षे गावाचे नाव
इ.स. १९३४ पखालडोह
इ.स. १९३५ लाखेफळ
इ.स. १९३६ साक्षाळ पिंप्री
इ.स. १९३७ खर्डा गितेवाडी
इ.स. १९३८ शिरसमार्ग
इ.स. १९३९ पाडळी
इ.स. १९४० शिरुर कासार
इ.स. १९४१ तांदळवाडी
इ.स. १९४२ मूर्ती
१० इ.स. १९४३ गुळज
११ इ.स. १९४४ पोखरी मैदा
१२ इ.स. १९४५ खांबा
१३ इ.स. १९४६ नाथापूर
१४ इ.स. १९४७ मूर्ती
१५ इ.स. १९४८ नाथापूर
१६ इ.स. १९४९ मादळमोही
१७ इ.स. १९५० तरडगव्हाण
१८ इ.स. १९५१ नाथापूर
१९ इ.स. १९५२ तिंतरवणी
२० इ.स. १९५३ शेकटे
२१ इ.स. १९५४ बोरगाव
२२ इ.स. १९५५ राळसांगवी
२३ इ.स. १९५६ तागडगाव
२४ इ.स. १९५७ आरगडे गव्हाण
२५ इ.स. १९५८ जोड हिंगणी
२६ इ.स. १९५९ मूर्ती
२७ इ.स. १९६० थेरला
२८ इ.स. १९६१ लिंबा
२९ इ.स. १९६२ आंमोरा
३० इ.स. १९६३ कंडारी
३१ इ.स. १९६४ शिंगोरी
७५ इ.स. २००८ भगवानगड
७९ इ.स. २०१२ सावरगाव (चकला)
८० इ.स. २०१३ येळी (ता. पाथर्डी)

भगवानबाबांवर आरोप

भगवानबाबा नारायणगडावर असताना त्यांची कीर्ती दूरवर पसरली. या कीर्तीमुळे समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना त्रास झाला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून हत्येचा प्रयत्न झाला. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या रोषालाही भगवानबाबांना बळी पडावे लागले. यातूनच त्यांच्यावर काही आरोप करण्याचाही प्रयत्न झाला.

यातील प्रमुख आरोप म्हणजे 'भगवानबाबा ब्रिटिश सरकारसाठी खबऱ्याचे काम करतात, निजामाला मदत करतात, स्वातंत्र्यलढ्यात अडचणी आणतात.' असा आरोप त्यावेळी बीड जिल्ह्यात आलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे भगवानबाबांच्या विरोधकांनी केला. नाना पाटलांनी 'प्रति सरकार' स्थापन केलेले होते व ते शेतकरीवर्गात 'पत्री सरकार' या नावाने प्रसिद्ध होते. ब्रिटिश अधिकारी, रझाकार यांना वठणीवर आणण्यासाठी किंवा त्यांचे खबरे म्हणून काम करणाऱ्यांना नाना पकडत आणि त्यांच्यावर दहशत बसवण्यासाठी एका लांब कातड्याच्या खेटराने (ज्याला सुंदरी किंवा भरमाप्पा म्हटले जाई) भयंकर मार देत. त्याचबरोबर पालथे पाडून पाय घोट्याजवळ बांधून तळपायावर काठीने जबर मार देत. (शेतकरी बैलाला अशा प्रकारे बांधून त्यांच्या पायातील नख्यांना लोखंडी पत्री ठोकतात. याच प्रकाराला पत्री म्हणतात.) भगवानबाबांविषयीच्या आरोपांची माहिती मिळाल्यावर भगवानबाबांना चांगलीच शिक्षा करायची असे ठरवून क्रांतिसिंह नाना पाटील नारायणगडावर भगवानबाबांकडे गेले. त्या ठिकाणी भगवानबाबा आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यात चर्चा झाली. नानांना भगवानबाबांच्या डोळ्यातील प्रामाणिकता, करारीबाणा व सत्यवचनीपणा दिसला. भगवानबाबांविषयी आपल्याला चुकीची माहिती मिळाली हे नानांनी कबूल केले व भगवानबाबांचा निरोप घेऊन ते निघून गेले.

भगवानबाबांच्या प्रेरणेने थेरला, वडझरी, बेलसूर, चिंचपूर, पिंपळनेर, कारंजवण, खोकरमोह या व अशा अनेक गावांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान नोंदविले होते. हा कट फसल्यानंतर विघ्नसंतोषींनी भगवानबाबांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला.

समाधी

अनेक वर्षे बाबांची कीर्तनकारणे भ्रमंती सुरू असताना त्यांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले, अभ्यास केला आणि समाजाचे विदारक चित्र दिसल्यावर ते बाबांनी कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन केले. समाजातील अनेक वाईट प्रथा, चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला. अंध:कारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला. इ.स. १९६५ च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते, त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वास्थ्यामुळे भगवानबाबांना पुणे जिल्ह्यातील, रुबी हॉल क्लिनिक इथे औषधपाण्याकरिता दाखल केले. भगवानबाबा ह्दयविकाराने आजारी असताना उपचार करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक इस्पितळातील डॉ.के.बी.ग्रँट व त्यांची टीम दाखल झाली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हा ज्ञानेश्वरीचे पारायण करत असे. तेथेच सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी समाधिस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. तीन वेळा‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय’हा जयघोष करून आत्मा पांडुरंगचरणी विलीन केला व देह ठेवला. लाखोंचा पोशिंदा अनंताकडे झेपावला. त्या भूमीला धरणीकंपसारखा भासला. १९१८ च्या दशकामध्ये तमाम समाजाच्या ह्रदयाला हात घालत जवळपास चार दशके महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पसरलेली धर्मचळवळ शांत झाली. भागवत धर्मात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचे उत्तुंग कीर्तनकार व्यक्तिमत्त्व हरपल्याने शोककळा पसरली. अटकेपार जावून डौलाने फडफडणारा जरीपटका स्थंबावरून अनंताकडे झेपावला. भगवानबाबा हे भागवत धर्मप्रसाराचे कार्यकारणातले एक पर्व होते आणि त्या पर्वाची सांगता झाली. भगवानबाबा नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला. एका युगाचा अंत झाला. एक वादळ शांत झाले. झंझावात विरून गेला. शतकानुशतके वाट पहावी लागलेला भागवत धर्माच्या सूर्याच्या अंत झाला. वारकरी संप्रदायाचा आधारवड गेला. भागवत धर्माचा वटवृक्ष उन्मळून पडला. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अध्याय संपला. शुन्यातून सार्मथ्य निर्माण करणारा कुशल संघटक तारा हरपला. सामान्य माणसासाठी झटणारा एक सिंह गमावला. कीर्तनातून निघणारे सूर पांडुरंगचरणी विलीन केला होता. तब्बल पंचेचाळीस वर्षे वा त्याहूनही अधिकचा प्रदीर्घकाळ महाराष्ट्रात ज्या भगवानगडावर त्यांनी कीर्तने गाजविले ते सुन्न पडले. बाबांच्या निमित्ताने जनतेला त्यांचा ‘देव’ गवसला होता. त्यांची शैली, भाषा, व्यक्तिमत्त्व, बाणा हा पुन्हा होणे नाही. प्रखर अलौकिक भागवत भक्तीचा विचार देणार्‍या एका विचारसुर्याचा अस्त झाला. सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरला.

त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचे पार्थिव पुण्याहून भगवानगडावर आणले गेले. उत्त्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची विनंती केली गेली. परंतु भीमसिंह महाराजांनी 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी ह.भ.प. मामासाहेब दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार भीमसिंह महाराज यांनी केले.

भगवानबाबांचा कीर्तने ऐकलेले मंडळी आपल्या लाडक्या सम्राटाच्या बाबांचे जाण्याने. भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी, भगवानबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंड्या, टाळ, पखवाज, मृदंग, तालमणी घेऊन आली होती. लाडक्या बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून भगवानगडावर भाविक येत होते. पार्थिवाची प्रतिक्षा करीत भर ऊनात भगवानगडावर कानाकोपर्‍यात बसले. त्यातही जनसागर उपस्थितीमुळे गर्दी आवरणे पोलिसांनाही अवघड ठरले. जनसागर उसळल्यामुळे बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यास उशीर होत होता तरीही सकाळपासून बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी आसुलेले भाविक जागचे हलत नव्हते. भाविकांचा महासागर पार करीत बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यात आले. जनसागर त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. सांयकाळी सुमारास रथातून पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आल्यानंतर परत या परत या भगवानबाबा बाबा परत या...एकच बाबा.भगवानबाबा...भगवानबाबांचा जयजयकाराच्या घोषणा सुरु झाल्या व या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागू लागली. दर्शन घेताना सर्व भाविक भावनाविवश झाले होते व भाविक अक्षरश: धाय मोकलून रडत होते. कुणी हात जोडून तर कुणी डोळे बंद करून गहिवरले होते. आर्त हाक घालण्यास भाविकांनी सुरुवात करताच भगवानगडही हेलावले. आपल्या लाडक्या बाबांला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले. भाविक निघालेल्या अंत्ययात्रेत सामिल होत होते. जसजशी अंत्ययात्रा पुढे सरकत होती, तसतसे भाविक आणखीनच भावूक होत होते. अंत्यविधी सुरु झाल्यानंतर अनेक भाविकांना शोक अनावर झाला व यावेळी अनेक भाविकांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. जनसागर जणू शोकसागरात बुडाला होता. सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. लाखो भाविकांचाही अश्रुंचा बांध फुटला होता. अंत्यविधी झाल्यानंतर रात्री मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित राहून जयजयकाराच्या घोषणा देत होते. नंतर लाडक्या बाबांचे पार्थिव विठ्ठलाच्या मंदिराजवळच येथे आणण्यात आले. तेथेच श्री संत भगवानबाबाची संगमरवरी पाषाणबांधणी समाधी बांधली गेली व भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरली.

श्रीक्षेत्र भगवानगडावर भगवानबाबा यांची समाधी गीतेतील वचनाप्रमाणे अजूनही भाविकांना दिशा दाखवत आहे. समाधीनंतरही भाविकांची काळजी घेण्याबरोबरच पांडुरंगचरणी विलीन झाल्याकारणाने लाखो भाविकांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद, दर्शन आणि मार्गदर्शन लाभत आहे. भगवानबाबा आज देखील अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भाविकांच्या सदैव पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. भगवानबाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक जपताना दिसतात आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही. आजही त्यांच्या समाधीला पाहून भाविक भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. भक्तिभावात एकरूप झालेल्याना भाविकांना बाबांच्या समाधीजवळ त्यांच्या विठ्ठलनामाचा गजर ऐकू येतो असे बोलले जाते. भगवानगडावर आल्यावर प्राप्त होणारी मनःशांतीमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

योगियाची संपदा... त्याग आणि शांती प्रसन्न आचार्य... उभयलोकी किर्तीसोहळामान सम्राट... ईश्वर विभूती... प्रकाशमान... ब्रह्मचारीरूप गुरुवर्य... सर्वश्री... वैराग्यमुर्ती... समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे... समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे... प्रबोधनाचा महामेरु... भक्तिरसाचा सागर... मायेचा पाझर... पंढरीचा अखंड वारकरी... तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे... परोपकारी... भक्तीचा गड उभारणारे... भजन-कीर्तन, प्रवचनाची गंगा... शुद्ध आचरणाचा पितामह... स्नेहप्रेमाचे सम्राट...परमविठ्ठलभक्त ... ऐश्वर्यसंपन्न संत... ह.भ.प. श्री भगवानबाबांचे कार्य अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषण भगवानबाबांनी कमी केले होते. अध:पतित समाजाला सन्मार्गावर आणले होते.

संत श्री भगवानबाबांचे चमत्कार

भगवानबाबांनी अनेक चमत्कार केले. भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता भगवानबाबांकडून अनेक चमत्कार घडले.

|| बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ||

त्यातील एक म्हणजे त्यांनी पाण्यावर बसुन ज्ञानेश्वरी वाचली. पाण्यावर तरंगून भगवानबाबांनी ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याचे बोलले जाते. ह्या घटनेतूनच भाविकांना भगवानबाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली.

बालपणीही त्यांनी अनेक चमत्कार केले. एकदा अगदी लहान असताना त्यांनी भूक लागलेल्याला स्वतःच्या हाताने भाकरी जमिनीतून काढून दिले असे बोलले जाते.

संत श्री भगवानबाबांची मंदिरे

भगवानबाबांची कीर्ती वाढत गेल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भगवानबाबांची मंदिरे स्थापन झालेली आहेत. पंढरपुर, पैठण अशा बऱ्याच ठिकाणी बाबांचे मठ आहे.

  • पंढरपूर येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
  • आळंदी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थान बांधण्यात आले आहे.
  • बीड जिल्ह्यातील बार्शी रोड भागात "राष्ट्रसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले.
  • बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर सभाग्रह आहे.
  • बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील करेवाडी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे.
  • बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यांत "संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान" बांधण्यात आले आहे.
  • इ.स. २०११ मध्ये बीड जिल्ह्यातील जोडहिंगणी येथे भाविकांसाठी भगवानबाबांचे मंदिर बांधण्यात आले. [८]
  • बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतल्या नागझरी परिसरात २५ वर्षापूर्वी काही भक्तांनी एकत्रित येऊन भगवानबाबांचे मंदिर उभारले. [९]
  • बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी या गावी संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. [१०]
  • औरंगाबाद जिल्ह्यातील रामनगर भागात संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. [११]
  • औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यांत संत भगवानबाबा यांचे मंदिर आहे. [१२]
  • औरंगाबाद जिल्ह्यातील ता. फुलंब्री परिसरात लिंगदरी भागात भगवानबाबा मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. [१३]
  • पश्‍चिम महाराष्ट्रातील गोंदवले शहरालगत बोरजाईवाडी परिसरात श्री संत भगवान बाबा मंदिराच्या पायाभरणीचा प्रारंभ करण्यात आला. [१४]

श्रीक्षेत्र भगवानगडाचे उत्तराधिकारी

भीमसिंह महाराज

भगवानबाबाच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून भीमसिंह महाराज यांनी भगवानगडाची जबाबदारी ४० वर्षे सांभाळली. त्यानी भगवानबाबांच्या चालिरिती पुढे जोपासल्या. ९ नोव्हेंबर २००३ रोजी भीमसेन महाराजांचा मृत्यु झाला.

नामदेवशास्त्री सानप

भीमसिंह महाराजच्या मृत्यूनंतर नामदेवशास्त्री सानप यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचे काम केले. नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व थोर कीर्तनकार आहेत. तेथुन पुढे गडाचा विकास वाढिस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या. नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापिठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्याऱ्या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे.

माध्यमांतील चित्रण

चित्र:भगवानबाबा टपाल तिकिट.jpg
भारतीय टपाल खात्याने काढलेले भगवानबाबांचे टपाल तिकिट

वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. [१५]

दिवंगत प्रमोद महाजन यांनी टपाल तिकीट काढून भगवानबाबांचे जगात नाव पोहचविले. [१६]

संत भगवानबाबा यांच्यावर भक्तिगीतांची व्हिडिओ सीडी प्रसिद्ध गायक मुरली कुटे याने तयार केली आहे. [१७]

संत भगवानबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेल्या पोवाडा प्रसिद्ध शाहीर कल्याण काळे याने तयार केली आहे.

चित्रपट

संत भगवानबाबा यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी भगवानबाबांच्या जीवन व कार्यावर आधारित असलेल्या राजयोगी भगवानबाबा या मराठी चित्रपटाची निर्मिती शेवगाव (जि. अहमदनगर) येथील शिक्षक उमेश घेवरीकर व मफिज इनामदार यांनी केली आहे. हा चित्रपट १३ जून, इ.स. २०१० या दिवशी प्रथम प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण, संवादलेखन, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती.[१८]

दयानिधी संत भगवानबाबा चित्रपट: विसाव्या शतकातील महान संत भगवानबाबा यांच्या जीवनावर आधारित 'दयानिधी संत भगवानबाबा' या चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यातील आजिनाथ ढाकणे, भरत डोंगरे व ऋषिकेश बाम निर्मित असलेल्या या चित्रपटात बीड जिल्यातील नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. भगवानबाबा यांच्या भूमिकेत ऋषिकेश बाम, संत वामनभाऊ महाराज यांच्या भूमिकेत रविंद्र महाजनी आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्ठीतील जेष्ठ अभिनेते कुलदीप पवार, रवी पटवर्धन, सुहाशिनी देशपांडे, अतुल अभ्यंकर, मुक्ता पटवर्धन , श्रेयश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा व भरत डोंगरे यांनी विविध भूमिका केल्या आहेत. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड येथे या चित्रपटाच्या DVD चे प्रकाशन करण्यात आले. आता हि DVD सर्वत्र उपलब्ध आहे .

दूरचित्रवाहिनी मालिका

भगवानबाबांच्या जीवनचरित्रावर आधारित 'भगवानबाबा (दूरचित्रवाहिनी मालिका)', साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून प्रसारित होत आहे. डॉ. विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत आहेत. मालिकेचे प्रक्षेपण दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ पासून चालू झाले. या मालिकेचे पहिल्या २० भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे (सप्टेंबर २०१२). सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. पुणे येथील द टायगर फिल्म्स अँन्ड एन्टरटेनमेंटतर्फे रमेश सस्ते यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. विलास उजवणे यांच्याबरोबरच प्रकाश धोत्रे, राघवेंद्र कडकोळ, रवी पटवर्धन, वृंदा बाळ, पोपट चव्हाण, निकिता कुलकर्णी, सीमा पिसे, महेश शेजवळ हे कलाकारही या मालिकेत काम करीत आहेत. [१९]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://santeknath.org/shishya%20parampara.html. १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://santeknath.org/shishya%20parampara.html. १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.ahmednagarpride.com/shri_sadguru_math_mehkari_ahmednagar.html. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://www.lokprabha.com/20090116/utsav.htm. ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ http://www.esakal.com/esakal/20120413/5597400571699500850.htm. १३ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-gopinath-munde-in-aurangabad-2892212.html. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://72.78.249.125/esakal/20120318/4676052005247762753.htm. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ http://www.marathwadaneta.com/marathwadaneta/20120730/4734408838160743221.htm. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ http://www.marathwadaneta.com/MarathwadaNeta/20100901/4991628411172069006.htm. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ http://www.dainikekmat.com/articledetailshow.php?&id=40934&cat=Aurangabad. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ http://marathi.yahoo.com/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-185017165.html. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ http://72.78.249.187/esakal/20120222/5562846932547982880.htm. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ http://www.esakal.com/eSakal/20100118/5678370165266959814.htm. २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ http://www.esakal.com/esakal/20120121/5109931532599966684.htm. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-gopinath-munde-in-aurangabad-2892212.html. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-gopinath-munde-driver-murali-kute-2220575.html. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ http://72.78.249.107/esakal/20100608/5747127513402627397.htm. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ http://72.78.249.107/esakal/20120413/5378440327690557355.htm. २० सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

हेही पाहा

बाह्य दुवे