मॅरिलिन मनरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅरिलिन मनरो

मॅरिलिन मन्रो
जन्म १ जून १९२६
लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका
मृत्यू ५ ऑगस्ट १९६२
ब्रेंटवूड, लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका


मॅरिलिन मनरो (जन्मनाव नॉर्मा जियान मॉर्टेन्सन; १ जून १९२६ - ५ ऑगस्ट १९६२) ही १९५० च्या दशकात अनेक यशस्वी व्यावसायिक बोलपटांमधून प्रसिद्धीस आलेली आणि प्रमुख ‘प्रणय प्रतीक’ बनलेली अमेरिकी अभिनेत्री, मॉडेलगायिका होती.

मॉडेल म्हणून कारकिर्दीस प्रारंभ केलेल्या मॅरिलीनला सन १९४६ मध्ये एका चित्रपटासाठी ट्वेंटिएथ-सेंच्युरी फॉक्स ने करारबद्ध केले. काही दुय्यम भूमिकांनंतर १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या दी ॲस्फाल्ट जंगल आणि ऑल अबाऊट ईव्ह या दोन चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीस आली. सन १९५२ मध्ये डोंट बॉदर टु नॉक या चित्रपटात तिला मुख्य भूमिका मिळाली. नायगारा या सन १९५३ मधील अतिनाट्यात्मक चित्रपटात तिच्या मादकपणाचा प्रभावी वापर मुख्य भूमिकेत दिसला. ‘डंब ब्लॉंड’ (बुद्धीपेक्षा सौंदर्यावर भर देणारी पिंगट केसांची नायिका) ह्या तिच्या प्रतिमेचा जन्टलमेन प्रिफर ब्लॉंड्स (१९५३), हाऊ टू मॅरी अ मिलियेनर (१९५३) व द सेवन इयर इच (१९५५) या चित्रपटांमध्ये करण्यात आला. आपल्या कौशल्यांमध्ये भर घालण्यासाठी ॲक्टर्स स्टुडिओमध्ये जाऊन तिने अभ्यास केला. बस स्टॉप (१९५६) मधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केले आणि गोल्डन ग्लोबचे नामांकन तिला मिळाले. सन १९५९ मधील सम लाइक इट हॉट या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.

मॅरिलिनच्या आयुष्याची अखेरची वर्षे आजारपण, वैयक्तिक समस्या आणि कामातील कुचराईसाठी उठून दिसतात. मुख्यतः निद्रानाशावर वापरल्या जाणाऱ्या बार्बिट्युरेट्स गटातील औषधांच्या अधिक मात्रेने तिचा झालेला मृत्यू संशयास्पद ठरला. अधिकृतरीत्या ‘बहुधा आत्महत्या’ असे या मृत्यूचे वर्गीकरण झालेले आहे. मृत्यूनंतरच्या काळात तिच्याकडे पॉप व सांस्कृतिक प्रतीक म्हणून तसेच आदर्श अमेरिकी लैंगिक प्रतीक म्हणून बघितले जाते.