भरतमुनींचे रससूत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रस विचार हा भारतीय साहित्यशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा विचार आहे. भरतपूर्व काळापासून काव्यातील रसाच्या महत्त्वाच्या स्थानाबद्दल साहित्यशास्त्रकारांनी निश्चिती केली आहे. परंतु काव्यातून ही रसनिष्पत्ती कशी होते याविषयी भरतमुनींनी मांडलेल्या सूत्राला संस्कृत साहित्यशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. भरतोत्तर काळात या रससूत्राचे अनेक भाष्यकारांनी आपापल्या परीने अर्थ लावण्याचे प्रयत्न केले आहेत.

भरतमुनींचे प्रसिद्ध रससूत्र पुढीलप्रमाणे :

विभावानुभाव व्यभिचारी संयोगात् रसनिष्पत्ती |

विभाव, अनुभाव व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसाची निष्पत्ती होते.

दैनंदिन व्यवहारात आपण अनेक घटना कार्यकारणनिबद्ध अशा घडताना पाहतो. परंतु लौकिक व्यवहारातील हे कार्यकारणादी निकष जसेच्या तसे रसविषयक व्यापाराला लावणे अयोग्य ठरेल. त्यामुळे काव्यात किंवा नाट्यात एखाद्या रसाची प्रतीती आपल्याला येते तेव्हा ती कशी येते, तिचे स्वरूप कसे असते, हे समजावून घेताना रसनिष्पत्तीस कारणीभूत ठरणारी कारणे, त्यामुळे घडणारी आणि सामान्यतः प्रतीतीला येणारी कार्ये आणि ती कार्ये घडून येण्यास सहाय्यभूत होणारी कारणे या गोष्टींना नाटकात अनुक्रमे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव असे म्हणतात. भरतमुनींच्या रससूत्रानुसार विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसाची निष्पत्ती होते.

भरतमुनींना येथे संयोग म्हणजे केवळ एकत्र येणे अपेक्षित नसून विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या एकजीवतेतून होणारा संयोग अपेक्षित आहे. हा संयोग वरवरचा नसून पानक रसांसारखा असतो. ज्याप्रमाणे पानामध्ये विविध घटकांचे मिश्रण असते. परंतु त्यापासून एक वेगळीच रुची तयार होते. ही रुची एकजीव मात्र अन्य घटकांपेक्षा स्वतंत्र असते. त्याचप्रमाणे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून या घटकांपेक्षा भिन्न मात्र एकरूप अशा रसाची निष्पत्ती होते. येथे भरताने जाणीवपूर्वक निष्पत्ती हा शब्द वापरला आहे. तो निर्मिती हा शब्द वापरत नाही. कारण रस हे मानवी मनात मुळातच वास करत असतात. फक्त त्यांना चेतना मिळाली की हे रस मनात पुन्हा उफाळून येतात. यालाच रसाची निष्पत्ती असे म्हणतात. रसाच्या निष्पत्तीत कारक चेतना देण्याचे काम विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव हे घटक करतात. भरतमुनींच्या रससूत्रात केवळ विभाव, अनुभव आणि व्यभिचारी यांचा उल्लेख झालेला असला तरी त्यामध्ये स्थायीभाव अनुस्यूत आहेत. कदाचित भरतपूर्व काळात झालेल्या आचार्यांनी स्थायीभावाचा विस्तृत विचार केलेला असावा. त्यामुळेच रससूत्रात स्थायीभावाची पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता भरतमुनींना वाटली नसावी. मात्र त्यांनी विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भावांसोबतच  अष्टसात्त्विक भावांचेही विवेचन केले आहे. हे अष्टसात्त्विक भाव दृश्य स्वरूपात प्रचितीला येणारे शारीरिक स्वरूपाचे आणि व्यभिचारी भावांशी समतुल्य असतात. भरतमुनींचे रससूत्र समजून घेण्यासाठी हे सर्व घटक समजावून घेणे गरजेचे आहे.

१.   स्थायी भाव[संपादन]

स्थायीभाव म्हणजे रसाचा प्रारंभबिंदू. मानवी मनात काही काही विशिष्ट भाव किंवा चित्तवृत्ती नित्य वास करीत असतात. त्यांना चेतक भेटला की त्या प्रकट होतात, जागृत होतात. पुन्हा पुन्हा चेतना मिळाल्यास वस्तुस्थितीचा विसर पडून हे स्थायीभाव / चित्तवृत्ती परिपुष्ट होतात. त्यामुळे आपल्याला रसाची प्रतीती येते, रसास्वाद जाणवतो. कोणत्याही विरुद्ध व अविरुद्ध भावांनी त्यांचा विच्छेद होत नाही. म्हणूनच भरतमुनींनी 'यथा नराणां नृपतिः शिष्याणांच यथा गुरूः | एवं ही सर्व भावानां स्थायी भावः महान् इह ||' अशा शब्दात स्थायीभावाचे महत्त्व सांगितले आहे. तर विश्वनाथाने स्थायीभावांना आस्वादरुपी अंकुर पसरविणारे कंद असे म्हटले आहे. (आस्वादाङ्कुरकन्दः असौ भावः स्थायी इति संमतः |) मात्र हे स्थायीभाव म्हणजे लौकिक जीवनातील मुलभूत प्रेरणा किंवा उपजत भावना नव्हेत तर ते फक्त लौकिक भावनांशी संवादी असतात हे लक्षात ठेवावे लागते. हे स्थायीभाव आठ प्रकारचे आहेत.

रतिहासेश्च शोकश्च क्रोधोत्साहौ भयं तथा |

जुगुप्सा विस्मयश्चेति स्थायिभावाः प्रकीर्तितः ||

भरतमुनींनी चार प्रमुख रस सांगितले आहेत. या चार प्रमुख रसांपासून चार उपरस निर्माण होतात. यातील प्रमुख रस आणि उपरसांपासून रति, हास, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा आणि विस्मय हे आठ स्थायीभाव निर्माण होतात. ते असे :

भरतप्रणीत मूलभूत रस आणि उपरस यांपासून निर्माण झालेले आठ स्थायीभाव :

रस    :     शृंगार         वीर          हास्य          अद्भुत        रौद्र         करुण         बीभत्स     भयानक

भाव  :      रती         उत्साह         हास           विस्मय       क्रोध         शोक          जुगुप्सा        भय

साहित्यकृती किंवा नाट्यकृतीचा आस्वाद घेत असताना हे भाव मनात जागृत होऊन त्यांची रसिकाच्या मनात सुखमय चर्वणा झाली की रसाची निष्पत्ती होते.

२.   विभाव[संपादन]

विभाव म्हणजे रसाच्या निष्पत्तीचे कारण होय. विभावामुळे वाचिक, आंशिक आणि सात्त्विक अशा तीन प्रकारच्या अभिनयाची प्रचिती येते. लोकव्यवहारात एखाद्या चित्तवृत्तीचा उद्भव झाल्याचा आपण अनुमान करतो, हा अनुमान आपण कार्यकारणभावाच्या आधारे करत असतो. उदा० एका उद्यानात एक तरुणी आपल्या प्रियकराची वाट पाहत आहे. तिचा प्रियकर तिला दुरून येताना दिसतो. त्याला पाहताच तिच्या डोळ्यांचे विलास सुरू होतात. तिच्या गालावर लाली उमटते. ती आपल्या पदराशी चाळा करते. तेवढ्यात तो प्रियकर तिच्या जवळ येतो. येथे प्रियकराचे दर्शन हे प्रेयसीच्या प्रणयोद्भवाचे कारण आहे. तर हे दृश्य पाहणारे रसिक हे प्रेयसीची चित्तवृत्ती आणि तिच्या अवयवांची हालचाल पाहून तिच्या प्रियकराच्या येण्याचे अनुमान करतो. येथे प्रेयसीच्या प्रणयोद्भवाचे कारण आणि आपण केलेला तर्क हे दोन्ही लौकिक आहेत. लौकिक व्यवहारात ज्या गोष्टींना कारण असे म्हणतात त्यांना काव्यात / नाट्यात विभाव असे म्हणतात. हे विभाव दोन प्रकारचे असतात. १) आलंबन विभाव २) उद्दीपन विभाव

१)    आलंबन विभाव :[संपादन]

ज्यांवर रसाची निष्पत्ती अवलंबून असते त्याला आलंबन विभाव असे म्हणतात. उदा: प्रेयसी आणि तिचा प्रियकर यांच्या एकमेकांना भेटण्यातून रती या स्थायीभावाची निष्पत्ती होते. त्यामुळे ते दोघे आलंबन विभाव ठरतात.

२)    उद्दीपन विभाव :[संपादन]

आलंबन विभावाच्या उद्दीपनास उपयुक्त ठरणाऱ्या अन्य परिस्थितीस उद्दीपन विभाव असे म्हणतात. (थोडक्यात काव्यगत पात्राचे भाव ज्या कारणांमुळे उद्दीपीत होतात त्यांना उद्दीपन विभाव असे म्हणतात.) उदा: प्रेयसीस तिच्या प्रियकराचे दर्शन उद्यानात होते. येथे उद्यान, तेथे उमललेली फुले आदी उद्दीपन विभाव ठरतात.

३.   अनुभाव[संपादन]

अनुभाव म्हणजे विभावांमध्ये निष्पन्न झालेल्या चित्तवृत्तींचे दृश्य परिणाम होत. उपरोक्त उदाहरणात प्रेयसीच्या डोळ्यांचे विभ्रम, गालावर चढणारी लाली, पदराशी होणारा चाळा हे नाट्यगत अनुभाव आहेत. रती, हास, शोक इ. स्थायीभावांना व्यक्त करणाऱ्या आशयाची कृती व हालचाली म्हणजे अनुभाव होय. ते विभावांमध्ये निष्पन्न भावांच्या मागोमाग येतात म्हणून त्यांना अनुभाव असे म्हणतात. एखाद्याच्या कृतीवरून, हालचालींवरून आपण त्याच्या भावनांची ओळख करून घेत असतो. उदा: विरहव्याकूळ नायिकेचे हुंदके देणे, क्रोधात डोळे लाल होणे इत्यादीवरूनच प्रेक्षकाच्या लक्षात येते की अनुभाव म्हणजे भावजन्य कार्ये होत. या अनुभावांचे अंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य असे चार प्रकार पडतात. यातील अंगिकमध्ये शारीरिक कृती, हालचाली आणि हावभाव यांचा समावेश होतो. तर वाचिकमध्ये संवाद, संभाषण यांचा समावेश होतो. सात्त्विक अनुभावांमध्ये सूक्ष्म मानसिक क्रियांचा समावेश होतो. तर आहार्य अनुभावांमध्ये वेशभूषेतील पर्यावरण अभिप्रेत आहे.

४.   व्यभिचारी भाव[संपादन]

हे भाव कोणत्याही एका रसाशी एकनिष्ठ नसतात. ते अनेकविध रसांमध्ये कायम संचार करत असतात. त्यामुळेच त्यांना व्यभिचारी किंवा संचारी भाव असे म्हणतात. स्थायीभाव हे स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारे असतात, मात्र व्यभिचारी भाव हे स्वतंत्रपणे न उद्भवता कोणत्याही स्थिर स्वरूप असलेल्या चित्तवृत्तीच्या अनुषंगाने उद्भवत असतात. भरताने तेहतीस प्रकारचे व्यभिचारीभाव सांगितले आहेत. यांचे चौदा शारीरिक अवस्था, तीन ज्ञानात्मक अवस्था आणि सोळा भावनात्मक मनोविकार असे प्रकार पाडता येतात. यातील शारीरिक अवस्थेत मरण, व्याधी, ग्लानी, श्रम, आलस्य, निद्रा, स्वप्न, अपस्मार, उन्माद, मद, मोह, जडता, चपलता, प्रबोध यांचा, ज्ञानात्मक अवस्थेत स्मृती, मति, वितर्क यांचा तर भावनात्मक मनोविकारांमध्ये हर्ष, अमर्ष, धृती, उग्रता, आवेग, निर्वेद, विषाद, औत्सुक्य, चिंता, शंका, असूया, त्रास, गर्व, दैन्य, अवहीथ्त आणि क्रीडा यांचा समावेश होतो. मुख्य स्थायी नाट्यभावाला पोषक आणि त्याच्या अनुषंगाने आस्वाद्य होणारे नाट्यभाव म्हणजे उपरोक्त व्यभिचारी भाव होत.

५.   अष्टसात्त्विक भाव[संपादन]

विशिष्ट चित्तवृत्तीच्या अभिनयाच्या वेळी प्रकट करावयाचे भाव म्हणजे अष्टसात्त्विक भाव होत. हे भाव अनुभावाप्रमाणेच परिणामरूप आहेत. मात्र भारताने त्यांचा अनुभावातच समावेश करण्याऐवजी त्यांची स्वतंत्र चर्चा केली आहे. सात्त्विक भावांची महती सांगताना भरताने नाट्यं सत्त्वे प्रतिष्ठितम् असे म्हटले आहे. श्रेष्ठ अभिनय हा सत्त्वातिरिक्त असावा असा भरताचा आग्रह आहे. सत्त्व म्हणजे समाहित किंवा साम्यावस्थत झालेले मन सत्त्वामुळे नाट्यातील केवळ नाट्यधर्मी अशा सुखदुःखांचा परिणामही खऱ्या शारीरिक क्रियेतून प्रकट होतो. त्यामुळेच रसोत्कर्ष अधिक उत्कट होऊ शकतो. या सात्त्विक भावांची संख्या ८ आहे. यात स्वेद (घाम), स्तंभ (एकाच जागी थिजून जाणे), रोमांच (अंगावर काटा उभा राहणे), स्वरभंग (आवाजात बदल होणे), कंप (शरीराला कंप फुटणे), वैवर्ण्य (चेहऱ्याचा रंग बदलणे), अश्रू (डोळे भरून येणे) आणि प्रलय (मूर्च्छित होणे) यांचा समावेश होतो.

भरतमुनींच्या मते उपरोक्त विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव आणि अष्टसात्त्विक भाव यांच्या संयोगातून रसिकाच्या मनातील स्थायीभाव परिपुष्ट होतात आणि रसाची निष्पत्ती होते. ज्याप्रमाणे वाळलेल्या लाकडाला अग्नीचा स्पर्श होताच ते पेट घेते त्याप्रमाणे रसिकाशी हृदयसंवादी असणाऱ्या भावाचा काव्यनाट्यात अविष्कार होताच रसिकाच्या मनाला तो व्यापून टाकतो. नाट्यभाव म्हणजे मानवी मनोविकार नसले तरी ते या मनोविकारांशी संवादी असतात. मानवी भावनांशी ते पूर्णतः जुळतात म्हणूनच रसिकाला त्यापासून प्रत्यय येतो. लाकडात मुळचा अग्नी असतोच, बाहेरच्या अग्नीशी संपर्क येताच सर्व लाकूड पेट घेते. त्याचप्रमाणे सर्व नाट्यशरीर रसाने फुलून जाते. रसिकाच्या हृदयामध्ये बीजरूपाने असलेल्या मानवी भावनांचा संवादी अशा कविगत भावनांशी संयोग होताच त्याला रसाची प्रतीती येते. नाट्यभाव हे लौकिक भावांना संवादी असले तरी ते कार्यकारण भावाने निष्पन्न होत नाहीत. विभावादींच्या योगे त्यांचे अभिनयन होते. रसिकाच्या अंतःकरणात त्याचे व्यक्तिगत भाव जागृत झालेले नसतात. तर तो साधारण्याच्या पातळीवरून अभिव्यक्त भावांचा आस्वाद घेत असतो.

भरतमुनींच्या या रससूत्रावर दृहिणीच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. या रससूत्राचे आपापल्या पद्धतीने अर्थ लावण्याचे प्रयत्न अनेक साहित्यशास्त्रकारांनी केलेले आहेत. यांमध्ये भट्टलोल्लट, श्रीशंकुक, भट्टनायक आणि अभिनवगुप्त या भाष्यकारांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. यात भट्टनायकाने उपचित किंवा परिपुष्ट स्थायी म्हणजे रस अशी मांडणी केली आहे. तर श्रीशंकुक रसाच्या निष्पत्तीस रसाची अनुमिती मानतो. भट्टनायकाने रसनिष्पत्तीच्या व्यापाराला भोगीकरण व्यापार असे संबोधले आहे. अभिनवगुप्ताने मात्र रसनिष्पत्तीच्या सिद्धांताला प्रथमच मानवी मनाची जोड देत साधारणीकरणाच्या सिद्धांताची मांडणी केली आहे. यावरूनच भारतीय साहित्यशास्त्रातील भरतमुनींच्या रससूत्राचे महत्त्वपूर्ण स्थान आपल्या लक्षात येते.  [१][२]

भरतमुनींवरील पुस्तके[संपादन]

  • अभिनय चिंतन : भरतमुनी ते बर्टोल्ड ब्रेख्त (डाॅ. पराग घोंगे) . या पुस्तकाला महाराज्य राज्य शासनाचा २०१८ सालचा श्री.के. क्षीरसागर पुरस्कार मिळाला आहे
  1. ^ गाडगीळ स. रा. : काव्यशास्त्रप्रदीप
  2. ^ जोग, रा. श्री. : अभिनव काव्यप्रकाश