चार्ल्स पर्सी स्नो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स पर्सी स्नो (किंवा सि० पी० स्नो; इ.स. १९०५ ते इ.स. १९८०) एक इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ, कादंबरीकार, शासकीय अधिकारी, व विचारवंत होते. त्यांच्या द टू कल्चर्स या १९५९ मध्ये दिलेल्या व्याख्यानासाठी ते प्रसिद्ध आहेत. या व्याख्यानात त्यांनी असा विचार मांडला की आधुनिक समाजात कला आणि विज्ञान या दोन शाखांत न भरून येणारी फूट पडली आहे. वैज्ञानिक म्हटल्या जाणाऱ्यांना साहित्य, इतिहास, चित्रकला इत्यादी क्षेत्रातल्या घडामोडींची फार थोडी माहिती असते. तसेच कला क्षेत्रात वैज्ञानिक घडामोडी माहिती नसतात. कला आणि विज्ञान या क्षेत्रांतील परस्परांविषयींच्या या अज्ञानामुळे जगातील महत्तवाचे प्रश्न सोडवण्याची आपली क्षमता कमी होते असे स्नोंचे म्हणणे होते. हे व्याख्यान पुढे दोन आवृत्तींमध्ये प्रकाशित झाले व कित्येक इतर विचारवंतांनी त्यात भर घातली. काही टिकाकारांना स्नो यांचा द टू कल्चर्समधील विचार अमान्य होता. केंब्रिज विद्यापीठातले इंग्रजीचे तत्कालीन प्राध्यापक फ्रॅंक रेमंड डेव्हिस हे द टू कल्चर्सचे प्रमुख टिकाकार होते.