Jump to content

ॲस्टर पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲस्टर पटेल (जन्म - १७ मार्च १९३२, नवी दिल्ली) - ॲस्टर पटेल या ऑरोविल फाउंडेशनच्या वीस वर्षे नियामक मंडळ सदस्य होत्या.[]

जीवन

[संपादन]

दिल्ली विश्वविद्यालयामध्ये तत्त्वज्ञान आणि मनोविज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या डॉ. इंद्र सेन यांनी आपल्या कन्येचे नाव मीरा असे ठेवले होते. पुढे श्रीमाताजींनी त्यांचे नामकरण ॲस्टर असे केले. १९३८ साली डॉ. इंद्र सेन हे श्रीअरविंद यांच्या विचारांनी प्रेरित झाले आणि १९४५ मध्ये ते श्रीअरविंद आश्रमात कायमस्वरूपी राहायला आले. त्यांच्या पत्नी लीलावती या दिल्ली विद्यापीठातील पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. बालमानसशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्या दिल्लीतील मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्या व त्यांची दोन मुले (ॲस्टर पटेल व धाकटा भाऊ विनय वर्मा) १९४३ सालीच आश्रमात राहू लागले होते. []

शिक्षण

[संपादन]

त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी श्रीमाताजींनी घेतली होती. शांतिनिकेतनमधील इतिहासतज्ज्ञ श्री. शिशिर कुमार मित्र यांचे मार्गदर्शन ॲस्टर यांना लाभले. []

बालवयातील ॲस्टर यांना ए.बी.पुराणी, दिलीप कुमार रॉय यांसारख्या ज्येष्ठ साधकांचा सहवास लाभला होता. श्रीमती मार्गारेट वूड्रो विल्सन ऊर्फ निष्ठा यांचा सहवास ॲस्टर यांना लाभला होता. त्या ऍस्टर यांना अमेरिकेच्या इतिहासातील गोष्टी सांगत असत.

श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथेच ॲस्टर यांचे शिक्षण झाले. तेथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि इंटिग्रल सायकॉलॉजी या विषयांचे अध्ययन केले.

इ. स. १९६२ ते १९७० या कालावधीत [] ॲस्टर यांचे उच्च शिक्षण पॅरिस येथे झाले. [] श्रीअरविंद आणि हेनरी बर्गसन यांचा तौलनिक दर्शनविचार हा त्यांच्या पीएच.डी साठी संशोधनाचा विषय होता. या विषयाला युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमध्ये प्रथमच मान्यता देण्यात आली होती. युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमधून ॲस्टर यांना तौलनिक तत्त्वज्ञान या विद्याशाखेच्या अंतर्गत पीएच.डी मिळाली. []

१९७० मध्ये संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्यांना संयुक्त राष्ट्रसंघ, न्यू यॉर्क येथे विश्व युवा संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांनी तेथे श्रीअरविंद आश्रमाचे आणि ऑरोविलचे प्रतिनिधित्व केले. [][]

कार्य

[संपादन]

तरुणपणी त्या त्यांचे वडील डॉ. इंद्र सेन यांच्याबरोबर साहाय्यक म्हणून काम करत असत. श्रीअरविंद यांचे कार्य विविध विद्यापीठात पोहोचविण्याचे कार्य डॉ. सेन यांनी हाती घेतले होते. त्या कार्यात सचिव या नात्याने त्या सहभागी झाल्या होत्या.[]

पुढे त्या श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे शिक्षक म्हणून कार्यरत झाल्या. जगभरातील विद्यापीठांमध्ये त्या श्रीअरविंद यांच्याविषयी व्याख्याने देत असत. तसेच तत्त्वज्ञान, इंटिग्रल सायकॉलॉजी, शिक्षण, योग या विषयांवर त्यांनी संशोधन निबंध लिहिले आहेत. []

१९७२ साली ॲस्टर यांना बनारस हिंदू विद्यापीठात श्रीअरविंद अध्यासनाच्या प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली.[]

पुढे त्या ऑरोविल येथील कार्याशी जोडल्या गेल्या. १९७१ मध्ये श्रीमाताजींच्या प्रेरणेने ऑरोविल येथे, भारत निवास मध्ये भारतीय संस्कृती संशोधन केंद्र आणि भारतीय अभ्यास केंद्र स्थापन झाले.१९८४ मध्ये त्याच्याशी संबंधित जबाबदारी ॲस्टर यांच्यावर सोपविण्यात आली. [] []

ग्रंथसंपदा

[संपादन]

द प्रेझेन्स ऑफ टाइम (२००६) []

पुरस्कार व सन्मान

[संपादन]
  • २००५ साली त्यांना त्यांच्या कार्यासाठी श्रीअरविंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]
  • २०१८ साली त्यांना ऑरोरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. [][]

पूरक

[संपादन]

ॲस्टर पटेल यांच्या दोन मुलाखती

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Aster Patel: "Inwardly, Auroville is blossoming" | Auroville". auroville.org. 2025-02-20 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g "Interview with Aster Patel by Anie Nunnally". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-18 रोजी पाहिले.
  3. ^ a b "A talk by Aster Patel remembering The Mother". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-20 रोजी पाहिले.
  4. ^ a b auromaa (2022-02-27). "Aster Patel: Auroville, a New Field of Experience". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2025-02-18 रोजी पाहिले.
  5. ^ a b c "Aster Patel: Presenter at AUM 2011". www.collaboration.org. 2025-02-20 रोजी पाहिले.
  6. ^ "Dr. Aster Patel awarded the "Auro Ratna Award" for the year 2018 – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2019-05-09. 2025-02-18 रोजी पाहिले.