ॲना पाव्हलोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आन्न पाव्हलॉव्ह

आन्न पाव्हलॉव्ह ही जगप्रसिद्ध रशियन नर्तकी होती, रशियातील सेंट पीटर्झबर्ग (सध्याचे लेनिनग्राड) येथे तिचा जन्म झाला. तिने ‘इंपीरियल स्कूल ऑफ बॅले’ या संस्थेत १८९१ पासून नृत्याचे धडे घेतले. सोकोलोव्हा, जोहान्नसन व नंतर एनरिको सेच्चेती या इटालियन नर्तकांकडे शिकून तिने नृत्यात प्रावीण्य मिळविले.


१८९९ मध्ये तिला इंपीरिअल रशियन बॅले कंपनीचे सभासदत्व मिळाले. त्याच सुमारास सेंट पीटर्झबर्गमधील मारिन्स्की थिएटरमध्ये तिचा नृत्याचा पहिला कार्यक्रम झाला. १९०६ मध्ये ‘प्राइमा बॅलेरिना’ हा सन्मान्य किताब तिला मिळाला. त्याच वर्षी तिने बॅरन व्हिक्टर एमिलोव्हिच दांद्रे याच्याशी विवाह केला. सन १९०७ च्या सुमारास ती यूरोपच्या दोऱ्यावर गेली. १९०९ मध्ये द्यागिल्येफ याच्या नृत्यसंस्थंतर्फे पॅरिसला झालेल्या कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. त्यानंतर तिने स्वतःची नृत्यसंस्था काढली. ह्या संस्थेत अनेक इंग्लिश नर्तकही होते. पुढे तिने उत्तर व दक्षिण अमेरिका, आफ्रिका, पूर्व आशियाई देश, भारत इ. ठिकाणी दौरे केले. तिने अजिंठामधील भित्तिचित्रांतील प्रसंगांवर आधारित असे बॅले बसविले होते. आधुनिक भारतीय नर्तक उदय शंकर यांच्याबरोबरचही पाव्हलॉव्हने नृत्य केले होते. हेग येथे तिचे निधन झाले. आयुष्यभर तिने नृत्यकलेची सेवा केली. बॅलेतील लयबद्धता व गतिमानता या गुणांमुळे तिची नृत्ये प्रेक्षणीय वाटत. तिच्या नृत्यातील तंत्रशुद्धताही वाखाणण्याजोगी होती. बॅले नृत्यप्रसारात तिचा मौलिक वाटा आहे. तिने जगभर प्रवास करून कित्येक देशांना बॅले या नृत्यप्रकाराचा परियच करून दिला. डॉनक्विक‌्झोट, कोप्पेलिआ, द डाइंग स्वॉन (१९०५) ही तिची काही गाजलेली नृत्ये होत.

संदर्भ[संपादन]

  1. https://vishwakosh.marathi.gov.in/20813/