१९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक (किंवा मॅकडॉनल्ड युवा विश्वचषक) ही १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकतील उद्घाटनाची स्पर्धा ऑस्ट्रेलिया मध्ये खेळविली गेली. ही स्पर्धा एकदिवसीय सामना पद्धतीने खेळविली गेली. २८ फेब्रुवारी ते ११ मार्च १९८८ दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्षांखालील ८ संघाचा सहभाग होता. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना जिंकत पहिला वहिला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला.
ऑस्ट्रेलियात युरोपियन वसाहती स्थापनेला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा भरविली गेली. नंतर ही स्पर्धा द्वैवार्षिक पद्धतीने आयोजित करण्यास सुरुवात झाली. तत्कालिन ७ कसोटी देशांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि आयसीसीच्या असोसिएट देशांच्या निवडक क्रिकेट खेळाडूंनी बनवलेला एक आयसीसी असोसिएट संघांनी यात भाग घेतला.
साखळी सामन्यांसाठी सर्व ८ संघांचा एकच गट बनविण्यात आला. गटातील प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळला व गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. सर्व संघांनी गट फेरीत ७ सामने खेळले. गट फेरीतून ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि इंग्लंड हे चार देश उपांत्य फेरीत गेले. उपांत्य फेरीतून ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत केले आणि उद्घाटनाचा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला.